आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाटा पॉवर पवन ऊर्जा उद्योगात 180 कोटी गुंतवणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - एकात्मिक विद्युत निर्मिती क्षेत्रात अग्रेसर असलेल्या टाटा पॉवर या कंपनीने 180 मेगावॉट वीज निर्मिती करण्यासाठी पवन ऊर्जा उद्योगात 180 कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक योजना आखली आहे. त्याचबरोबर 2013-14 अखेरपर्यंत 50 मेगावॅटपेक्षा जास्त वीजनिर्मिती करण्यासाठी सौरऊर्जा निर्मिती युनिटस् उभारण्याचा विचार देखील कंपनीने केला आहे.

कंपनीकडून केल्या जाणा-या एकूण वीजनिर्मितीपैकी 25 टक्के वीज शुद्ध ऊर्जा स्त्रोतांपासून निर्माण करण्याच्या कंपनीच्या धोरणाला अनुसरुन ही गुंतवणूक करण्यात येत आहे. दरवर्षी साधारणपणे 150 ते 200 मेगावॅट पवनऊर्जा व 50 मेगावॅट सौरऊर्जा निर्माण करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे कंपनीच्या व्यवसाय आणि अपारंपरिक ऊर्जा विभागाचे मुख्य व्यावसायिक अधिकारी राहुल शाह यांनी सांगितले. शाह पुढे म्हणाले की, आयात केल्या जाणा-या कोळशाच्या किंमतीत वाढ होत असल्याने पारंपारिक ऊर्जा निर्मिती खर्चात वाढ होत असल्याने सध्या पवन ऊर्जा उद्योगात चांगली संधी आहे. ग्रिडचे भाडे वाढल्याने त्यामध्ये व सौर ऊर्जा भाड्यामध्ये फारसा फरक उरणार नाही व लवकरच ग्रिड आणि सौर ऊर्जा भाडे प्रति युनिट जवळपास 1 रुपया इतके असेल असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. सध्या पवनऊर्जा प्रकल्प उभारणीचा खर्च प्रति मेगावॅट 6 ते 6.2 कोटी आहे तर सौरऊर्जेसाठीचा हा खर्च प्रति मेगावॅट 9 ते 10 कोटी रुपये आहे.

प्रकल्पपूर्तीसाठी प्रयत्न
संपूर्ण भारतात, विशेषत तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्‍ट्र व गुजरातमध्ये टाटा पॉवरची पवनऊर्जा क्षमता जवळपास 376 मेगावॅट व सौरऊर्जा क्षमता 30 मेगावॅट आहे. टाटा पॉवरची सर्व वीज स्थानिक राज्य वितरण कंपन्यांसोबत करण्यात आलेल्या वीज खरेदी करारांनुसार विकली जाते. सौरऊर्जा योजना आखत असलेल्या इतर राज्यांमध्येही आपले प्रकल्प उभारण्यासाठी टाटा पॉवरचे प्रयत्न सुरू आहेत.

खर्च कमी होतोय....
इतर ऊर्जा प्रकल्पाच्या तुलनेत सौर ऊर्जेसाठी खर्च जास्त आहे. सौर ऊर्जेसाठीसाठी वापरण्यात येणा-या युनिट्सचा खर्च दोन वर्षांपूर्वी प्रति युनिट 16 रुपये होता, आता त्यात जवळपास 50 टक्के घट होऊन तो 7 रुपये प्रतियुनिट झाला आहे. युरोप व अमेरिकेत फोटोव्होल्टाइक पॅनेल्सच्या मागणीत झालेली घट व चीनमध्ये होणारे अतिरिक्त उत्पादन या दोन मुख्य कारणांमुळे या किमती कमी झाल्या असल्याकडे शाह यांनी लक्ष वेधले.