आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tax Department Watch On Royal Wedding Event ,latest News In Divya Marathi

शाही विवाह सोहळ्यांवर सेवाकर विभागाची नजर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली-देशात शाही विवाह सोहळ्यांची सध्या टूम आहे. या विवाह सोहळ्यांवर आता सेवाकर विभागाची करडी नजर राहणार आहे. अप्रत्यक्ष कर संकलनाच्या उद्दिष्टानुसार उत्पन्न न मिळाल्याने वैतागलेल्या अधिकार्‍यांनी आता शाही विवाह सोहळ्यांचा शोध सुरू केला आहे. या सोहळ्यांच्या माध्यमातून करोडो रुपयांचा सेवाकर मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आवश्यकता आहे ती वाजणार्‍या बँडवर बारकाईने लक्ष ठेवण्याची.
केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याच्या मते, मोठय़ा शहरांतून घरीच विवाह सोहळ्याचे आयोजन करण्याचे प्रमाण लक्षणीय प्रमाणात घटले आहे. छोटा विवाह समारंभही कार्यालय किंवा एखाद्या टुमदार हॉलमध्ये करण्याचे प्रमाण वाढले आहे. कोणतेही मंगल कार्यालय किंवा हॉलमध्ये लग्न करायचे म्हटले तर जेवणा-खाण्याच्या खर्चापासून ते लायटिंग, डीजे, मुलांसाठी करमणुकीचे कार्यक्रम, वरमाला, मंडप आदींची व्यवस्था करावी लागते.
बँडबाजाची व्यवस्था करता आली नाही तर ती व्यवस्थाही कार्यालयाकडून पुरवली जाते. केवळ त्याची किंमत मोजण्याची तयारी ठेवावी लागते. सध्या मोठय़ा या सर्व व्यवस्था व सुविधांसाठी 800 ते 1000 रुपये प्रति ताट किंवा थाळी असा दर आहे. यात किमान 500 थाळींची हमी द्यावी लागते. समजा तुमची वर्‍हाडी मंडळी 500 पेक्षा कमी आली तरी 500 थाळींची किंमत मोजावी लागते. समजा जास्त मंडळी आली तर जास्त पैसे मोजावे लागतात.
किमान पाहुण्याच्या संख्येचा विचार केल्यास एक विवाह सोहळा किमान चार ते पाच लाख रुपये तरी हॉल किंवा कार्यालय चालकाला द्यावे लागतात. या सर्वांवर सेवा कर लागतो आणि तो भरल्यास कोट्यवधीची कमाई सेवाकर विभागाला होऊ शकते. हे झाले सर्वसाधारण विवाहाबाबत मात्र लग्न सोहळा शाही असेल तर यापेक्षा जास्त खर्च येतो.
या अधिकार्‍याने एका सर्वेक्षणाचा हवाला देत सांगितले, सध्या देशातील शाही विवाह सोहळ्यांची बाजारपेठ सुमारे 38 अब्ज डॉलर आहे. यातील किमान 2000 लग्ने अशी आहेत ज्यात बॉलीवूडचे कलावंत सहभागी असतात. या एका कलावंताला एक ते दोन कोटी रुपये मानधन मिळते.
याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक संगीतकार अशा सोहळ्यात हजेरी लावतात. त्यांचे मानधनही तगडे असते. लग्नघरातील व्यक्तींसाठी नामवंत फॅशन डिझायनरकडून पोशाख आणि खास डिझाइन केलेले दागिने केले जातात. अशा शाही विवाह सोहळ्यासाठी एकूण 10 ते 12 कोटी रुपये खर्च येतो.
यावरील सेवाकर किती जण भरतात हा खरा प्रश्न आहे. अनेक सोहळ्यांच्या बाबतीत 10 लाखांचा खर्च केवळ 60 हजार दर्शवण्यात आला आहे.
अधिकारी लागणार कामाला
सेवाकराच्या दिल्ली आयुक्तालयातील एका अधिकार्‍याने सांगितले, देशातील एकूण शाही विवाह सोहळ्यांपैकी 60 टक्के विवाह दिल्लीच्या आसपास होतात. असे सोहळे जेथे होतात अशा हॉलमालकांची तसेच विवाह आयोजित करणार्‍या मंडळींची चौकशी केल्यास वास्तव खर्चाचा आकडा लक्षात येईल. तसेच ज्या क्षेत्रात विवाह सोहळे होतात तेथे अधिकार्‍यांनी जाऊन किती सोहळे होत आहेत, ते सेवाकर विभागात नोंदणीकृत आहेत का, याची चाचपणी केल्यास बराच सेवाकर मिळण्याची शक्यता आहे.