आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीसीएस, विप्रोच्या नफ्याने खुलली बाजाराची कळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - तिस-या तिमाहीत विप्रो, टीसीएसने केलेल्या चांगल्या आर्थिक कामगिरीमुळे बाजारातील मरगळ अखेर झटकली गेली. माहिती तंत्रज्ञान समभागांना आलेल्या मागणीमुळे गेल्या दोन सत्रांतील घसरण थांबून सेन्सेक्सने 141 अंकांची वाढ नोंदवली.
प्रारंभीच्या सत्रात सेन्सेक्सने 21,001.13 अंकांची नीचांकी पातळी गाठली होती. परंतु अचानक माहिती तंत्रज्ञान समभागांची खरेदी सुरू झाल्यानंतर सेन्सेक्स दिवसअखेर 141.43 अंकांनी वाढून 21,205.05 अंकांच्या पातळीवर बंद झाला. अगोदरच्या दोन सत्रांत 225.87 अंकांची घसरण झाली होती. राष्‍ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांकदेखील 42.30 अंकांची वाढ होऊन 6303.95 अंकांच्या पातळीवर बंद झाला.
सॉफ्टवेअर सेवा निर्यातीत आघाडीवर असलेल्या टीसीएसने शुक्रवारी जाहीर केलेल्या तिस-या तिमाही आर्थिक निकालांमध्ये निव्वळ नफ्यात 27 टक्के वाढ झाली. बाजारात झालेल्या खरेदीत कंपनीच्या समभाग किमतीत 5.5 टक्क्यांनी वाढ झाली. सेन्सेक्स यादीतील कंपन्यांमध्ये टीसीएसने सर्वाधिक कमाई केली. शेअर बाजाराच्या कामकाजात संमिश्र वातावरण होते. आशियाई शेअर बाजारातील नरमाईमुळे सकाळच्या सत्रात बाजारात मरगळ होती. चीनमधील जीडीपीच्या निराशाजनक आकडेवारीनंतर आशियाई शेअर बाजारांतील उत्साह गेला. परंतु कामकाजाच्या अखेरच्या सत्रात झालेल्या खरेदीमुळे बाजारातील वातावरण बदलले. बँका आणि माहिती तंत्रज्ञान समभागांची चांगली खरेदी झाल्यामुळे बाजारात चांगली वाढ झाल्याचे मत व्हेरासिटी ब्रोकिंग सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख जिग्नेश चौधरी यांनी व्यक्त केले.
टॉप गेनर्स : सेसा स्टरलाइट, आयटीसी, टाटा मोटर्स, भेल, स्टेट बँक, महिंद्रा अ‍ॅँड महिंद्रा.
टॉप लुझर्स : रिलायन्स इंडस्ट्रीज, कोल इंडिया, टाटा पॉवर
क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती : माहिती तंत्रज्ञान - + 2.83 टक्के, तंत्रज्ञान - + 2.50 टक्के, बहुराष्‍ट्रीय कंपन्या - + 1.08 टक्के, बँक - +0.75
दिल्लीत सोने-चांदी चकाकले
लग्नसराई व स्टॉकिस्टांकडून आलेली मागणी यामुळे सोमवारी सराफा बाजारात तेजी दिसून आली. राजधानी दिल्लीच्या सराफ्यात सोने तोळ्यामागे 20 रुपयांनी वाढून 30,200 झाले. चांदी किलोमागे 50 रुपयांनी चकाकून 42,250 झाली. सराफा व्यापा-यांनी सांगितले, लग्नसराईने मौल्यवान धातूंची मागणी वाढली आहे. त्यामुळे सोन्याच्या किमती वाढल्या. सिंगापूर बाजारात सोने औंसमागे 0.5 टक्क्यांनी वाढून 1260.07 डॉलरपर्यंत पोहोचले.
रुपया घसरून 61.62 वर
मुंबई : आयातदारांकडून डॉलरला आलेल्या मागणीमुळे सोमवारी रुपया आपटला. डॉलरच्या तुलनेत रुपयाने आठ पैसे गमावत 61.62 ही पातळी गाठली. शुक्रवारी रुपया 61.54 या पातळीत होता. अल्पारी फायनान्शियल सर्व्हिसेसचे सीईओ प्रमित ब्रह्मभट्ट यांनी सांगितले की, तेल आयातदारांकडून डॉलरची मागणी वाढल्याचा फटका रुपयाच्या मूल्यावर झाला.