आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- वाढत्या महागाईचा आणखी एक फटका बसणार आहे. देशातील आघाडीच्या मोबाईल सेवा पुरवठादार कंपन्यांनी विविध टॅरिफमध्ये दरवाढ केली असून मोफत मिळणा-या सुविधाही कमी करण्यात आल्या आहेत.
भारती एअरटेल या देशातल्या अग्रगण्य दूरसंचार कंपनीने मोबाईल कॉलच्या दरात दुप्पट वाढ केली आहे. भारती एअरटेलने प्रति मिनिट एक रुपयांवरुन कॉलरेट दुपटीने वाढवून थेट दोन रुपये केल्याची माहिती आहे. याशिवाय इंटरनेटसाठी 2जी डाटा टॅरिफमध्येही वाढ केली आहे. याशिवाय 10 ते 20 टक्क्यांनी मोफत मिनिटेही कमी केली आहेत.
आयडिया मोबाईलने काही झोन्समधल्या प्रमोशनल ऑफर्स रद्द केल्या असून परिणामी दरवाढ लागू केली आहे. आयडियाने सरसकट दरवाढ केली नसून ठराविक झोन्समध्ये केल्याचे सांगण्यात येत आहे. कंपनीकडून अधिकृत प्रतिक्रीया मिळू शकली नाही. बहुतांश कंपन्यांनी प्रमोशनल ऑफर्समधील सुविधा घटविल्या आहेत.
गेल्या 3 वर्षांमध्ये भारतात मोबाईल कॉलदर मोठ्या प्रमाणात घटले होते. इतर सर्वक्षेत्रात दरवाढ होत असताना मोबाईल क्षेत्रात याउलट चित्र होते. खर्च वाढल्यामुळे दरवाढ अटळ होती, असे एअरटेलच्या प्रवक्त्यांनी सांगितले. मोबाईल सेवा पुरवठादार कंपन्यांमधील प्राईसवॉर कमी झाले असून आता आणखी दरवाढ नाकारता येत नाही. सध्याची वाढ ठराविक झोन्समध्ये झाली असली तरी काही काळात देशातल्या सर्व 22 सर्कल्समध्ये लागू करण्यात येईल. मोबाईल कंपन्या कॉल रेट्समध्ये वाढ करत असल्याच्या वृत्तानंतर शेअर बाजारामध्ये या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आली असून आयडिया, भारती, रिलायन्स आदी दूरसंचार कंपन्यांचे शेअर्स 3 ते 4 टक्क्यांनी वधारले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.