आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Textile Industry Has Capacity To Help Rupee Recovery

रुपयाच्या वाढीसाठी वस्त्रोद्योगाला हवी बळकटी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - चालू खात्यातील वाढलेल्या तुटीच्या समस्येतून बाहेर पडण्याबरोबरच सातत्याने घसरत असलेल्या रुपयाला बळकटी देण्याची वस्त्रोद्योगाची क्षमता आहे. वस्त्र क्षेत्राला अनुकूल अशी धोरणे आखण्याबाबत जलद निर्णय घेऊन त्याची तातडीने अंमलबजावणी केली तरच हे शक्य होऊ शकते, असे मत केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री डॉ. के. एस. राव यांनी व्यक्त केले.

मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती करून देशाच्या जीडीपीमध्ये मोलाची भर घालण्याची वस्त्रोद्योगाची क्षमता आहे. परंतु हे साध्य करण्यासाठी या क्षेत्राला एकात्मिक करण्याबरोबरच एक भक्कम अशी साखळी तयार करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे केवळ कच्च्या मालाची निर्यात न करता तयार उत्पादने, रिटेल गारमेंट, तयार कपडे यांची निर्यात करावी यावरही डॉ. राव यांनी भर दिला. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘टेक्सकॉन 201’ परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
मागील वर्षात वस्त्रोद्योग क्षेत्राची 33.7 अब्ज डॉलरची निर्यात झाली होती, परंतु पुढील वर्षात या निर्यातीमध्ये 30 टक्क्यांनी वाढ होऊन ती 43.7 अब्ज डॉलर जाईल, अशी हमी मी पंतप्रधानांना दिली आहे. व्यापक उत्पादन सुविधा, पुरेसे मनुष्यबळ, स्थानिक पातळीवरील वाढती मागणी लक्षात घेता देशातील वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये फार मोठ्या संधी आहेत याकडेदेखील त्यांनी लक्ष वेधले.
वस्त्र मंत्रालयाच्या सहसचिव सुनयना तोमर म्हणाल्या की, स्पर्धात्मकता आणि पायाभूत सुविधांचा अभाव या दोन गोष्टी वस्त्रोद्योग क्षेत्राच्या प्रगतीच्या आड येत आहेत. यावर उपाय म्हणून सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून ‘टेक्स्टाइल क्लस्टर’ची निर्मिती करण्यात आली आहे.


कृती योजना

वस्त्रोद्योग क्षेत्रातील कामगारांच्या समस्या आणि निर्यातीला चालना देण्याचे विविध मार्ग सुचवण्यासाठी वस्त्रोद्योग क्षेत्राशी निगडित मंत्र्यांचा गट लवकरच आपला कृती योजना अहवाल पुढील 10 ते 12 दिवसांत पंतप्रधान कार्यालयाला सादर करणार असल्याचेही राव यांनी स्पष्ट केले.