आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदाच्या पहिल्या सहामाहीत आयपीओंची भरभरून कमाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - देशातील कंपन्यांनी चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीमध्ये प्राथमिक समभाग विक्रीतून (आयपीओ) 1,050 कोटी रुपयांचा निधी उभारला आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षाच्या तुलनेत या निधी संकलनात 36 टक्क्यांनी वाढ झाली आहे.


सप्टेंबरअखेर संपलेल्या सहा महिन्यांमध्ये आयपीओच्या माध्यमातून 16 कंपन्यांनी भांडवल बाजारात 1,050 कोटी रुपयांचा निधी गोळा केला असल्याचे ‘प्राइम डेटाबेस’च्या आकडेवारीमध्ये म्हटले आहे. मागील आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत 13 कंपन्यांनी एकूण 772 कोटी रुपयांचा निधी उभारला होता.


चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत भांडवल बाजारात आलेल्या 16 आयपीओंपैकी 15 लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातील होते हे विशेष. पण जस्ट डायल या एकाच बिगर एसएमई आयपीओने 919 कोटी रुपयांचा निधी उभारला. एकूण निधी संकलनामध्ये त्याचे प्रमाण 87 टक्के आहे.


विविध क्षेत्रांतील कंपन्यांमध्ये माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचे वर्चस्व जास्त असून या तीन आयटी कंपन्यांनी 1,927 कोटी रुपयांचा निधी उभारला असून एकूण निधी संकलनामध्ये त्याचे प्रमाण 29 टक्के आहे. किरकोळ गुंतवणूकदारांमधील निरुत्साह, शेअर बाजारातील चढ- उतार, अनिश्चिततेचे वातावरण यामुळे बड्या कंपन्या आयपीओच्या माध्यमातून निधी उभारणे टाळत असल्याचे मत भांडवल बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
प्राइम डेटाबेसचे व्यवस्थापकीय संचालक प्रणव हाल्दिया यांच्या मते दुय्यम बाजारपेठेत एकूणच वातावरण अनिश्चिततेचे असून प्राथमिक बाजारपेठेला वर्षाच्या उरलेल्या महिन्यांमध्ये संजीवनी मिळेल असे वाटत नाही. सरकारकडून निर्गुंतवणुकीबद्दल कोणतीही पावले उचलली जात नसल्यामुळेदेखील प्राथमिक बाजारपेठेत निरुत्साह असल्याचे ते म्हणाले.


दहा कंपन्यांचे वेटिंग
बाजार नियंत्रक सेबीकडून मान्यता मिळालेल्या आणि ही मंजुरी संपण्याच्या वाटेवर असलेल्या 14 कंपन्यांना चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत 4,500 कोटी रुपयांचा निधी उभारणे अपेक्षित आहे. सेबीकडून मंजुरी मिळालेल्या 3,800 कोटी रुपयांचा निधी उभारण्याचा विचार तसेच अन्य 10 कंपन्यांनी सेबीकडे अर्ज केलेल्या 10 कंपन्यांनी 3,100 कोटी रुपयांचा निधी उभारण्याचा विचार केला आहे.


मिटकॉनचा आयपीओ आज
सल्ला आणि अभियांत्रिकी सेवा क्षेत्रात कार्यरत असलेल्या पुण्यातील मिटकॉन कन्सल्टन्सी अँड इंजिनिअरिंग सर्व्हिसेस ही कंपनी 15 ऑक्टोबरला भांडवल बाजारात प्रवेश करीत आहे. लघु आणि मध्यम उद्योगातील या कंपनीचा देशपातळीवर विस्तार करण्याचा मानस आहे. कंपनी प्रत्येकी 10 रुपये किमतीचे समभाग आणत असून त्याची प्रति समभाग 51 रुपये अधिमूल्याने विक्री करण्यात येणार आहे. एकूण समभागांपैकी अर्ध्याहून अधिक समभाग किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव असतील. आयएसओ प्रमाणपत्र प्राप्त असलेली ही कंपनी आयपीओतून 25 कोटी रुपयांचे भांडवल उभारणार आहे. या भांडवलाचा विनियोग बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, नवी दिल्ली आणि अहमदाबाद येथे कार्यालये आणि दोन पर्यावरण प्रयोगशाळा उभारण्यासाठी करण्यात येणार आहे. ही समभाग विक्री 18 ऑक्टोबरला बंद होणार असून समभागांची नोंदणी रार्वोय शेअर बाजारात करण्यात येणार आहे.