आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपल्या कुटुंबासाठी असा निवडा योग्य टर्म प्लॅन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर आणि मृत्यू या दोन अशा बाबी आहेत, ज्या कोणालाही टाळता येत नाहीत. आपण कर नियोजन करू शकतो.मात्र, मृत्यूबाबत काय?त्यासाठी नियोजन करता येते का? बहुतेकजण हे नियोजन करत नाहीत. आपले काही बरे वाईट होणार नाही, असे ते गृहीत धरतात. अशा स्थितीत घरातील कमावत्या व कर्त्या व्यक्तीचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबासमोर जीवन कसे व्यतित करायचे हे संकट उभे राहते.


आयुर्विम्याद्वारे अशा जोखमीत विमाधारकाच्या कुटुंबाला संरक्षण मिळते. यासाठी साधारण टर्म प्लॅन सर्वात उत्तम साधन आहे. मात्र, चांगल्या टर्म प्लॅनची निवड कशी करावी किंवा कोणता टर्म प्लॅन स्वस्त पडेल ?असे प्रश्न मनात येतात. बहुतेकांना याचे उत्तर मिळत नाही. तसे पाहिले तर एखादा टर्म प्लॅन खूपच चांगला आहे, असे म्हणता येत नाही. समजा सध्या एखादी पॉलिसी खूपच चांगली वाटत असली तरी आगामी कालात ती तशीच राहील याची खात्री देता येत नाही. त्यामुळे चांगला टर्म प्लॅन निवडताना काही मूलभूत बाबींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्या बाबी अशा...


क्लेम सेटलमेंट गुणोत्तर : केवळ टर्म प्लॅनच नव्हे तर कोणतीही विमा योजनेच्या निवडीसाठी ही उत्तम चाचणी मानली जाते. विमाधारकाच्या मृत्यूनंतर क्लेमची रक्कम त्याच्या कुटुंबीयांना दिली जाते. क्लेमच्या रकमेमुळे आर्थिक संरक्षण मिळते. मात्र, एखाद्या कंपनीने क्लेमच नाकारला तर, अशा स्थितीत विम्याचा उद्देश निष्फळ ठरेल. त्यामुळे कोणताही विमा खरेदी करण्यापूर्वी आयआरडीए किंवा इतर संकेतस्थळावरून विविध विमा कंपन्यांच्या क्लेम सेटलमेंटचे प्रमाण कसे आहे, हे जाणून घ्या. ज्या कंपनीचे क्लेम सेटलमेंटचे प्रमाण अधिक तेवढे त्या कंपन्यांचे क्लेमची रक्कम देण्याचे प्रमाण जास्त असल्याचे मानले जाते.


क्लेम रद्द होण्याची शक्यता कमी करा : बहुतेकवेळा विमा एजंट विमा पॉलिसीचा फॉर्म भरण्याची घार्ई करतात. पॉलिसी रद्द होऊ नये, यासाठी ते पूर्ण माहिती फॉर्ममध्ये भरत नाहीत. आगामी काळात असे फॉर्म क्लेम रद्द करण्याचे मुख्य कारण ठरू शकतात. विमा एजंटांना फॉर्म भरण्याची घाई करू देऊ नका. फॉर्ममधील सर्व माहिती अचूकपणे भरा.


अर्जात माहिती लपवू नका : जर तुम्हाला धूम्रपान किंवा दारूचे व्यसन असेल तर तसे नमूद करा. आपण आजारी पडलात तर (आजार किरकोळ असला तरी) त्याची माहिती द्या.समजा तुमच्याकडे युलिप, एन्डोवमेंटसह इतर आयुर्विमा पॉलिसी असताल तर त्याची माहिती द्या. या बाबींकडे लक्ष दिले तर क्लेम रद्द होण्याची शक्यता कमी होते.


टर्म प्लॅनचे दोन भाग करा : या धोरणामुळे अनेक फायदे होतील- 1. समजा नोकरी किंवा काही अपघात घडल्यास, उत्पन्नाचा स्रोत आटू शकतो. प्रीमियमचा बोजा वाटू लागतो. अशा काळात एक पॉलिसी बंद करता येते.
2.समजा एकाद्या कंपनीने क्लेम नाकारला किंवा देण्यासाठी विलंब लावला तर दुस-या कंपनीचा क्लेम मिळून आर्थिक अडचण येणार नाही.
3. समजा एखाद्या कंपनीने माहिती अपुरी असल्याच्या कारणावरून क्लेम नाकारला व दुस-या कंपनीने दिला तर त्याआधारे पहिल्या कंपनीविरुद्ध विमा लोकपालाकडे तक्रार करता येते. क्लेम मिळण्याची शक्यता वाढते.
या बाबींकडे लक्ष घातल्यास एका चांगल्या टर्म प्लॅनची निवड करण्यात अडचण येत नाही. त्यामुळे कुटुंबाला आर्थिक संरक्षण मिळते.
लेखक मान्यताप्राप्त गुंतवणूक मार्गदर्शक असून द फायनान्शियल प्लॅनर्स इंडियाचे सदस्य आहेत.