आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आठवड्यात आल्या सहा नव्या कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रुपयाची घसरण सुरूच आहे आणि अर्थव्यवस्था वाढीसाठी संघर्ष करताना दिसत आहे. अशा परिस्थितीतही भारतीय बाजारात या आठवड्यात सहा नव्या कार दाखल झाल्या आहेत. मंदीसदृश वातावरणाकडे दुर्लक्ष करत ऑटो कंपन्यांनी विविध सेगमेंटमध्ये आक्रमकपणे नव्या गाड्यांचे सादरीकरण केले आहे. यात हॅचबॅक, एसयूव्ही पासून ते लक्झरी कारपर्यंत सर्व प्रकारचा समावेश आहे. या आठवड्यात किमान सहा नव्या गाड्या बाजारात आल्या आहेत.
किमतीच्या दृष्टीने विचार केल्यास सर्वात स्वस्त कार म्हणून मारुतीच्या वॅगन-आर स्टिंगरे कारचा प्रथम क्रमांक लागतो. या कारची किंमत 4.10 लाख ते 4.67 लाख रुपयांदरम्यान आहे. या कारचे इंजिन 998 सीसीचे असून तीन मॉडेल्स उपलब्ध आहेत. कंपनी लवकरच याचे सीएनजी व्हर्जन बाजारात आणणार आहे. या कारमध्ये अनेक नवे फीचर्स बसवण्यात आले आहेत. यात स्लीम आणि स्लीक क्रोम फिनिश्ड ग्रिल, लार्ज एअर ड्रम आणि री डिझाइन्ड फॉग लँप हाउसिंग यांचा समावेश आहे. या सेगमेंटमध्ये प्रथमच प्रोजेक्टर हेड लँप देण्यात आले आहेत.
यानंतर क्रमांक लागतो तो फोक्सवॅगनच्या क्रॉस पोलो कारचा. या हॉट हॅचबॅक कारची किंमत 7.75 लाख रुपये आहे. ज्या ग्राहकांना स्पोर्टी लूकसह प्रीमियम हॅचबॅक आवडते त्या ग्राहकांसाठी कंपनीने ही कार तयार केली आहे. या कारमध्ये क्रोमसह नवीन क्रॉस ग्रिल, नव्या सिल्व्हर रंगातील क्रॉस फ्रंट आणि रिअर बम्पर्स आणि पाच तारांचे व्हील देण्यात आले आहे.


दूरच्या प्रवासासाठी रफ-टफ कार पसंद करणा-यासाठी टाटा मोटर्सने आपली सफारी एसयूव्ही नव्या रूपात आणली आहे. या टाटा सफारी स्टोर्म एक्सप्लोरर एडिशनच्या फीचर्समध्ये मजबूत फ्रंट नज गार्ड, बॉनेटवर खास सही यांचा समावेश आहे. या विशेष आवृत्तीचे डोअर वाइजर्स खास पद्धतीने तयार करण्यात आले आहेत. कार अत्यंत वेगात असतानाही खिडकी काही प्रमाणात उघडी ठेवता येणार आहे. यात 2-डिनटक-स्क्रीन इन्फोट या सुविधा देण्यात आल्या आहेत. यामुळे आयपॅड, आयफोन, यूएसबी स्टिक्स, मेमरी कार्ड आणि पोर्टेबल हार्ड डिस्क कनेक्टिव्हीटी सुलभ होणार आहे. कंपनीने या सफारीची प्रारंभीची किंमत 10.86 लाख रुपये निश्चित केली आहे.


एसयूव्हीच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे. निस्सान कंपनीने आपली रीडिजाइन्ड स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल टेरेनो बाजारात आणली आहे. कंपनीने याची किंमत 10 लाख रुपयांहून कमी ठेवण्याची शक्यता आहे. सप्टेंबरपासून या कारसाटी आगाऊ नोंदणी प्रक्रिया सुरु होणार आहे. ऑक्टोबरच्या मध्यात ही कार रस्त्यांवर दिसण्याची शक्यता आहे. टेरेनो दिसायला डस्टर प्रमाणेच असली तरी काही वेगळे स्टाइलिंग फीचर्स यात आहेत. कारच्या दर्शनी बाजूस अँग्युलर हेडलॅम्प, ग्रिल आणि बम्पर आहेत.


जर्मनीची लक्झरी कार निर्माती कंपनी ऑडीने आपल्या बेबी एसयूव्ही क्यू -3 चे स्पेशल व्हर्जन सादर केले आहे. याची किंमत 24.99 लाख रुपये आहे. यात डी-ट्युन्ड चार सिलिंडरचे इंजिन आहे. यामुळे स्टॅँडर्ड क्यू-3 च्या 180 पीएस शक्तीच्या तुलनेत 142 पीएस शक्ती देते. आराम आणि सुविधांच्या बाबतीत क्यू एस काही प्रमाणात उजवी ठरते. मात्र, लेदर कव्हर्ड मल्टी फंक्शन स्टेअरिंग व्हील, पॉवर अ‍ॅडजेस्टेबल ड्रायव्हर सीट, फोल्ड आउट 6.5 इंच मीडिया स्क्रीन, एलईडी इंटेरिअर लायटिंग पॅकेज आणि व्हाइस डॉयलॉग सिस्टिम अशा फीचर्समुळे कारधारकांच्या पैशांचा पूर्ण मोबदला मिळणार आहे.


तुम्हाला अत्यंत शाही स्वारीची आवड आहे, तर सुपर लक्झरी कार बनवणा-या रोल्स रॉयसने रिथ कार आणली आहे. या कारची किंमत 4.6 कोटी रुपये आहे. या कारमध्ये 6.6 लिटरचे ट्विन टर्बो व्ही 12 इंजिन असून ते 632.5 पीएसची शक्तीसह 800 एनएमचे टॉर्क देते. रिथ कार 4.4 सेकंदात 100 किलोमीटर प्रतितास असा वेग घेते.
लेखक ब्रिटनस्थित ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील पत्रकार आहेत.