आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्थिक नियोजन केव्हा होऊ शकते अयशस्वी ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जे लोक आर्थिक नियोजनानुसार काम करत नाहीत, त्यांच्याकडे एकच तर्क असतो : केवळ नियोजन केल्याने काहीच साध्य होत नाही. शेवटी भविष्याविषयी कोण काय जाणतो, असा विचार करणा-यांसाठी आर्थिक नियोजन काहीच कार्य करू शकत नाही. खरे तर नियोजनाच्या मूळ संरचनेत काहीच गडबड नसते. कोणतीही आर्थिक योजना अयशस्वी होण्यामागे त्या व्यक्तीच्या सवयी ब-याच प्रमाणात कारणीभूत असतात. आर्थिक नियोजन बिघडवणा-या व अयशस्वी करणा-या काही बाबींविषयी ...

1. खर्च करण्याची प्रवृत्ती : व्यक्तीचे आर्थिक आयुष्य त्या व्यक्तीच्या खर्च करण्याच्या प्रवृत्तीशी निगडित असते. अधिक खर्च करण्याची सवय केवळ जीवनशैलीवरच प्रभाव टाकते असे नव्हे, तर त्या व्यक्तीची विविध आर्थिक उद्दिष्टे आणि विम्याच्या गरजांवर प्रभाव टाकते. अशा स्थितीत ती व्यक्ती अत्यंत कमी प्रमाणात बचत करू शकते. दीर्घकाळासाठीच्या गुंतवणुकीत सातत्य राहत नाही. खर्चाच्या सवयीमुळे गुंतवणुकीतून बाहेर पडावे लागते.

2. बचत आणि गुंतवणूक : गुंतवणुकीच्या साधनांची निवड आणि त्याच्या व्यवस्थापनाची पद्धत यावरही आर्थिक नियोजनाचे यश अवलंबून असते. प्रत्येक असेट वर्गाची आपली ठरावीक वैशिष्ट्ये आणि जोखीम असते. गुंतवणुकीच्या साधनांची निवड व्यक्तीची जोखीम धारण करण्याची क्षमता आणि लक्ष्य साध्य करण्यासाठी राहिलेला अवधी यावर अवलंबून असते.

कोणत्याही गुंतवणुकीसाठी विविध असेट वर्गांबाबत पुरेशी माहिती असणे आवश्यक असते. त्याबरोबरच गुंतवणुकीवर नियंत्रण असणे गरजेचे आहे. नाही तर कसलेही आर्थिक नियोजन यशस्वी होणार नाही.

3. आपत्काळासाठी व्यवस्था : जर एखादी व्यक्ती संकटकाळासाठी वेगळ्या रकमेची तरतूद करत नसेल तर कोणतेही आर्थिक नियोजन अयशस्वी ठरू शकते. केवळ लक्ष्य साध्य करण्यासाठी नियोजन करणे सर्वार्थाने चुकीचे आहे. दीर्घकाळातील उद्दिष्टांसाठी बचत न करणे आणि योग्य प्रमाणात विमा संरक्षण न घेण्यामुळे संकटकाळात बचतीतूनच पैसे काढण्याची वेळ येते.

4. वित्तीय सल्लागार : आर्थिक नियोजनाचे यश व अपयश वित्तीय सल्लागाराच्या कुशलतेवरही अवलंबून असते. मित्र, कुटुंबीय, विमा, म्युच्युअल फंड एजंट, बँक रिलेशनशिप मॅनेजर, शेअर ब्रोकर, अकाउंटंट आदींपैकी कोणीही वित्तीय सल्लागार असू शकतो. मात्र, तुमची बचत आणि गुंतवणुकीची काळजी घेण्यासाठी तो कुशल असावा. चुकीचा सल्लागार निवडल्यास तुमचे नियोजन बिघडणार हे निश्चित आहे.

जर तुम्ही तुमच्या गुंतवणुकीबाबत गंभीर असाल तर आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा. बजेटनुसार खर्च करा. आपल्या गरजा निश्चित करा आणि स्वत:ला त्यावर केंद्रित करा. एवढे जरी केले तरी तुमच्या बहुतेक व्यक्तिगत आर्थिक समस्यांचे निराकरण होईल.
लेखक मान्यताप्राप्त गुंतवणूक मार्गदर्शक असून द फायनान्शियल प्लॅनर्स इंडियाचे सदस्य आहेत.