आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोमॅटो 5 रुपयांना 2 किलो; शेतकरी हवालदिल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - येथील महात्मा जोतिबा फुले भाजी मंडईमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून भाजीपाल्याची स्वस्ताई कायम आहे. सध्या पाच रुपयांना दोन किलो टोमॅटो विकण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे.

यंदा चांगला पाऊस झाल्याने पाण्याची उपलब्धता व गत नोव्हेंबरच्या अगोदरपर्यंत भाज्यांत तेजी असल्याने शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची लागवड केली आहे. परिणामी, बाजारात भाजीपाल्याची आवक वाढून भाव घसरले आहेत. सध्या दिवसाला 15 ते 20 टन विविध प्रकारच्या भाज्या विक्रीला येत आहेत. हा सर्व माल स्थानिक शेतकर्‍यांनी पिकवलेला आहे. काकडी, शेपू, मेथी, फ्लॉवर या भाज्यांचे दर तर मोठ्या प्रमाणात खालावले आहेत.

चार महिन्यांपूर्वी पन्नाशी पार केलेल्या टोमॅटोचे भाव यंदाच्या मोसमातील नीचांकी पातळीवर गेले आहेत. त्यामुळे त्याला प्रतिकिलो दोन ते तीन रुपयांचा भाव मिळू लागला आहे. पर्यायाने शेतकरी अडचणीत आला आहे. टोमॅटो विक्रीतून लागवडीचा एकूण खर्च व आडत-हमालीही निघत नसल्याने हे पीक तोट्यात गेले आहे. त्यामुळे चाकूर तालुक्यातील जानवळ शिवारातील शेतकरी तर दुय्यम प्रतीचे टोमॅटो बाजारात विक्री करण्यापेक्षा जनावरांना चारा म्हणून घालू लागले आहेत. उन्हाळ्याची चाहूल लागल्याने लिंबाची मागणी वाढली आहे. त्यामुळे लिंबूचे दर वधारले आहेत. 10 रुपयांच्या आसपास विकले जाणारे लिंबू 30 ते 35 रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहे.

बीडमध्ये टोमॅटोचा ‘लाल चिखल’
अनिल भंडारी । बीड

बीडच्या भाजी बाजारात एक आठवड्यापासून मंदीच्या तडाख्यात टोमॅटोचा लाल चिखल झाला आहे. दहा दिवसांपूर्वी टोमॅटोचे भाव 10 रुपये किलो होते; परंतु दिवसेंदिवस आवक वाढल्याने दर गडगडले. येथील ठोक बाजारात तीन ते चार रुपये किलो दराने 20 किलोचे कॅरेट विकत आहेत. किरकोळ बाजारात पाच रुपये किलो भाव आहे. रोज चार ते पाच टन संकरित व गावरान टोमॅटोची तालुक्यातून आवक होत आहे. पोषक हवामानामुळे पालेभाज्या व फळभाज्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्याने आवक वाढली. दोन महिन्यांपासून उठाव नसल्याने शेवगा, भेंडी वगळता अन्य भाज्यांच्या भावात नेहमी घसरण राहिल्याने भाजी उत्पादकांना आर्थिक फटका बसलेला असतानाच आता टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली असल्याचे भाजी विक्रेते समीर बागवान यांनी सांगितले.


औरंगाबादेत 8 रुपये भाव
गेल्या पंधरा दिवसांपासून आवक प्रचंड वाढल्यामुळे टोमॅटोच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. महिन्यापूर्वी 40 रुपये किलो असणारे टोमॅटो आता किरकोळ बाजारात आठ रुपये किलोप्रमाणे विक्री होत आहेत. घाऊक बाजारात टोमॅटो 350 ते 450 रुपयांना दहा किलोप्रमाणे विक्री होत आहेत.

नगर : टोमॅटो 2 रु किलो
नगर । गेल्या पंधरा दिवसांपासून आवक प्रचंड वाढल्यामुळे गुरुवारी टोमॅटोचे भाव अक्षरश: 2 ते 3 रुपये किलोपर्यंत उतरले. त्यामुळे शेतकर्‍यांवर टोमॅटो मातीमोल विकण्याची वेळ आली. नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी टोमॅटोची साडेतीन ते चार कॅरेट आवक झाली.

नगर येथे संगमनेरसह पुणे जिल्ह्यातील मंचर, जुन्नर, आळेफाटा परिसरातून टोमॅटोची आवक होते. पंधरा दिवसांपूर्वी टोमॅटो पंधरा रुपये किलो होते. गुरुवारच्या लिलावात टोमॅटो चक्क 2 ते 3 रुपये किलोपर्यंत खाली उतरले. आवक वाढल्याने टोमॅटोचे भाव घसरल्याची माहिती बाजार समितीचे सचिव अभय भिसे यांनी दिली.