आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्हीएस-बीएमडब्ल्यू कराराने दोघांचाही फायदा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


भारतीय दुचाकी वाहन बाजारात 1990 दशकाच्या अखेरीस उदयास आलेल्या बहुतेक संयुक्त उपक्रमांनी आता वेगळे होऊन स्वतंत्र मार्ग स्वीकारला आहे.
हीरोने होंडाशी आणि बजाजने कावासाकीपासून फारकत घेतली. त्याचप्रमाणे टीव्हीएसने सुझुकीबरोबरची भागीदारी संपवली आणि हीच मालिका पुढेही सुरूच आहे.

आधी भागीदाराच्या द्वाराने भारतात आलेल्या जपानी कंपन्या आता स्वतंत्ररीत्या कारभार करण्यास पसंती देत आहेत. यात या कंपन्यांना विविध स्तरांवर यश मिळत आहे. यात सर्वप्रथम बाजी मारली ती होंडाने. होंडा सध्या देशातील तिस-या क्रमांकाची मोटारसायकल निर्माती कंपनी आहे. या विदेशी कंपन्यांशी घेतलेल्या फारकतीमुळे भारतीय कंपन्यांचेच नुकसान झाले आहे. बजाज वगळता बहुतेक कंपन्या नव्या तंत्रासाठी विदेशी भागीदाराच्या शोधात आहेत. तांत्रिक पातळीवर नेहमीच एक पाऊल पुढे असणा-या बजाजने ऑस्ट्रियाची स्पेशालिस्ट बाइक निर्माती केटीएममधील हिस्सा खरेदी केला आहे.

या आठवड्याच्या प्रारंभीच टीव्हीएस आणि बीएमडब्ल्यू मोटराड यांच्यात नवा संयुक्त उपक्रमविषयक करार झाल्याचे वृत्त आहे. या मैत्रीतून दोन्ही कंपन्यांना ब-याच अपेक्षा आहेत. एकीकडे टीव्हीएसला अद्ययावत तंत्रज्ञान मिळेल, तर बीएमडब्ल्यूचा प्रीमियम मोटारसायकलच्या क्षेत्रात प्रवेश होईल. या क्षेत्रात सध्या बजाज-केटीएम अत्यंत आक्रमकरीत्या विस्तार करत आहेत. तसेच बीएमडब्ल्यूला कमी खर्चात आणि सुस्थापित, दर्जाचा निर्मिती तळ मिळणार आहे. 650 पेक्षा कमी क्षमतेच्या सीसी मोटारसायकल क्षेत्रात बीएमडब्ल्यूला स्वत:चा पोर्टफोलिओ वाढवता येईल. सध्या बीएमडब्ल्यू या क्षेत्रात नाही. बीएमडब्ल्यूच्या मोटारसायकल विभागाचा वाढीचा दर गेल्या वर्षी केवळ 3 टक्के आहे. हा दर वाढवण्यासाठी कंपनी नव्या बाजारपेठांच्या शोधात आहे.

करारानुसार टीव्हीएस या प्रकल्पात 142 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. तर बीएमडब्ल्यू मोटराड बर्लिन येथे विकास तसेच प्रॉडक्ट टेस्टिंगसाठी गुंतवणूक करणार आहे. या कराराअंतर्गत इक्विटी गुंतवणूक होणार नाही तसेच रॉयल्टी दिली जाणार नसल्याचे दोन्ही कंपन्यांनी जाहीर केले. या संयुक्त उपक्रमासाठी टीव्हीएसच्या म्हैसूर किंवा होसूर येथील प्रकल्पात उत्पादन होईल. यातील पहिली मोटारसायकल 2015 मध्ये रस्त्यावर येण्याची शक्यता आहे. करारानुसार टीव्हीएस आणि बीएमडब्ल्यूकडून मोटारसायकलींचे विविध प्रकारचे मॉडेल्स विकसित करण्यात येणार आहेत. आपल्या स्वतंत्र वितरण व्यवस्थेद्वारे दोन्ही कंपन्या या दुचाकींची विक्री करणार आहेत.

ही भागीदारी देशातील दुचाकी वाहन क्षेत्रासाठी आदर्श ठरू शकते. विदेशी कंपन्यांशी भागीदारी करून देशी कंपन्या नवे तंत्र देशात आणू शकतात. आपला किफायतशीर उत्पादन तळ त्या उपलब्ध करून देऊ शकतात. तसेच टीव्हीएस आणि बीएमडब्ल्यूप्रमाणे आपला ब्रँड स्वतंत्ररीत्या वितरण व्यवस्थेद्वारे विक्री करू शकतात.
लेखक ब्रिटनस्थित ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील पत्रकार आहेत.