आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्हीएस -बीएमडब्ल्यू बनवणार मोटारसायकल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशातील चौथ्या क्रमांकाची दुचाकी निर्मिती कंपनी टीव्हीएस मोटार्स आणि जर्मनीची ऑटो क्षेत्रातील दिग्गज बीएमडब्ल्यू कंपनी यांच्यात मोटारसायकल निर्मितीबाबत नुकताच करार झाला. त्यानुसार टीव्हीएस भारतात 500 सीसी पेक्षा कमी शक्तीच्या मोटारसायकली विकसित करणार आहे. या करारानुसार निर्मित पहिली मोटारसायकल 2015 पर्यंत भारतीय रस्त्यावर धावण्याची अपेक्षा आहे. करारानुसार टीव्हीएस सुमारे 142 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
बीएमडब्ल्यू या मोटारसायकलींचा विकास आणि चाचण्यांसंदर्भातील खर्च उचलणार आहे. बीएमडब्ल्यू मोटोरोडचे अध्यक्ष स्टीफन शेलर यांनी सांगितले, टीव्हीएस बरोबरच्या या करारमुळे छोट्या आणि कमी क्षमतेच्या इंजिन विकासाचा लाभ कंपनीला होईल. यामुळे कंपनी कमी क्षमतेच्या मोटारसायकल विकसित करण्यात यशस्वी होईल. दोन्ही कंपन्या या मोटारसायकलींचे वेगवेगळे मॉडेल्स आपापल्या वितरकांच्या मार्फत विक्री करतील.
टीव्हीएसला फायदा
तपापूर्वी सुझुकी मोटार कॉर्पोरेशन या जपानी भागीदाराशी फारकतीनंतर टीव्हीएसला बीएमडब्ल्यूच्या रूपाने नवा जर्मन साथीदार मिळाला आहे. बीएमडब्ल्यूच्या हाय एंड बाइक्समध्ये तांत्रिक बाबींचा वापर करून कंपनी 250 ते 500 सीसी इंजिन क्षमतेच्या नवीन मोटारसायकल बाजारात आणणार आहे. तसेच बीएमडब्ल्यू या ब्रँडचा फायदाही टीव्हीएसला मिळणार आहे. भारतीय बाजारातील यामाहा, हीरो व होंडा यांच्या स्पर्धेत टीव्हीएस उत्तम मोटारसायकल बाजारात आणू शकेल.
बीएमडब्ल्यू कंपनीला फायदा
बीएमडब्ल्यू आतापर्यंत केवळ हाय एंड बाइक्ससाठीच ओळखली जात असे. मात्र, जगात कमी इंजिन क्षमतेच्या मोटारसायकलींचा बाजार तेजीत आहे. या मोटारसायकलींना मागणीही चांगली आहे. भारत, दक्षिण तसेच पूर्व आशिया, युरोप आणि अमेरिका येथे 250 ते 500 सीसी मोटारसायलकची मोठी बाजारपेठ आहे. टीव्हीएसबरोबरच्या भागीदारीमुळे बीएमडब्ल्यूला या बाजारपेठांत आपले उत्पादन सादर करण्याची संधी मिळणार आहे.