आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकांनो सोन्यातील गुंतवणुकीपासून ग्राहकांना परावृत्त करा- अर्थमंत्री चिदंबरम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सोन्यावरील आयात शुल्क आठ टक्क्यांपर्यंत वाढवूनदेखील सरकाला या मौल्यवान धातूची चिंता सतावत आहे. इंडियन बॅँक्स असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत खुद्द अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना सोन्याची वाढती आयात परवडणारी नसल्याचे सांगून आपल्या ग्राहकांना सोन्यात गुंतवणूक करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करा, असा मोलाचा सल्ला द्यावा लागला आहे.
सोन्यातील गुंतवणूक करण्याचा सोस कमी करण्यात बॅँकांना महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागणार आहे. त्यामुळे सोन्याची खरेदी किंवा गुंतवणूक करण्यास आपल्या ग्राहकांना उत्तेजन देऊ नका, अशी माझी सर्व बॅँकांना विनंती असल्याचे ते म्हणाले.
रिझर्व्ह बॅँकेने सोन्याच्या नाण्यांची विक्री न करण्याबाबत अगोदरच बॅँकांना सल्ला दिला आहे. त्यामुळे अन्य धातूंप्रमाणेच सोनेही एक धातू बनेल आणि तांबे किंवा पितळेच्या तुलनेत थोडासा जास्त चकाकणारा तो असेल असा एक दिवस येईल अशी आपल्याला आशा वाटते असेही ते म्हणाले. एप्रिल, मे या दोन महिन्यांत अनुक्रमे 142 टन आणि 162 टन सोने आयात झाले. गेल्या वर्षात महिन्याला सरासरी 70 टन असे प्रमाण होते, परंतु यंदाच्या वर्षात पहिल्या दोनच महिन्यांत सरासरी 152 टन सोने आयात झाले. हे सगळे कितपत सहन करणार आणि या सोन्याच्या आयातीची रक्कम कशी फेडणार असाही सवाल त्यांनी या वेळी केला. त्यामुळे रिझर्व्ह बॅँक आणि सरकारला कडक उपाययोजना करण्यावाचून दुसरा कोणताही पर्याय नाही असेही म्हणाले.

अन्नधान्याची महागाई घटेल
महागाई कमी झालेली असली तरी अन्नधान्याची महागाई अद्याप जास्त आहे. रब्बी हंगामातील पिके बाजारात आल्यामुळे ही महागाई कमी होईल अशी आशा चिदंबरम यांनी व्यक्त केली आहे. घाऊक किमतीवर आधारित महागाई आणि मुख्य महागाईत लक्षणीय घट झालेली असून ग्राहक वस्तू निर्देशांकाचा पाराही उतरला असला तरी तो अद्याप चढ्या पातळीवर असल्याकडे चिदंबरम यांनी लक्ष वेधले.