आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uday Kulkarni Article About Share Market Liquidity

रोखता घटक अर्थात लिक्विडिटी फॅक्टर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेअर बाजारात ‘लिक्विडीटी’ या शब्दाला : विशिष्ट अर्थ आहे. लिक्विडीटी म्हणजे शेअर्सच्या खरेदीसाठी या बाजारात येणारा पैसा. वैयक्तिक कंपन्यांच्या शेअरचा भाव त्यांच्या व्यवसायातील कामगिरीनुसार व इतर अनेक जे निकष आपण बघितले, त्यानुसार असायला हवा. पण मार्केटमध्ये तेजी आहे की मंदी त्यानुसारही या भावांवर काही परिणाम होतोच.

लिक्विडीटी म्हणजे शेअर्सच्या खरेदीसाठी या बाजारात येणारा पैसा
बुल रन व बेअर फेज
मार्केटमध्ये तेजी असेल त्यालाच ‘बुल रन’ असेही म्हटले जाते आणि मंदी असेल तर त्याला मार्केट ‘बेअर फेज’ मध्ये आहे म्हटले जाते. देशांतर्गत आर्थिक परिस्थितीत फार मोठे बदल झालेले नसतात तरी मंदीत असलेले मार्केट अचानक तेजीत येते किंवा अचानक तेजीतून मंदीत जाते. यामागे कारणीभूत असतो हा रोखता (लिक्विडीटी) घटक. समजा अचानक खूप बडे गुंतवणूकदार बाजारात आले आणि त्यांनी फार मोठ्या प्रमाणात शेअर्सची धडाधड खेरदी सुरू केली तर मागणी जास्त म्हणून भाव वाढत जातात आणि तेजी येते. उलट बाजारातून त्यांनी पैसे काढून घेणे सुरू केले म्हणजे शेअर्स विकून टाकायला सुरवात केली तर त्यामुळे भाव खाली येतात. आता बाजारात गुंतवणूक करणारे कोण कोण असतात? किरकोळ गुंतवणूकदार, हाय नेटवर्थ इन्व्हेस्टर (एचएनआय) म्हणजे धनाढ्य व्यक्ती हे वैयक्तिक स्तरावर गुंतवणूक करत असतात.

‘फ्यूचर अ‍ॅँड ऑप्शन’चे व्यवहार
‘ट्रेडिंग’ करणारे आणि ‘फ्यूचर अ‍ॅँड ऑप्शन’चे व्यवहार करणारे तर रोज उलाढाल करत असतात. याशिवाय देशी वित्तीय कंपन्या (डोमॅस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर डीआयआय) उदाहरणार्थ: म्युच्युअल फंड्स गुंतवणूकदार असतात. तसेच एलआयसी ही सरकारी विमा कंपनी फार मोठी गुंतवणूकदार आहे, शिवाय ती अनेक वर्षांपासून गुंतवणूक करत असल्याने तिच्या गुंतवणुकीचे मूल्यही प्रचंड आहे. नवीन आलेल्या खासगी विमा कंपन्या गुंतवणूकदार आहेत. खुद्द केंद्र सरकारची अनेक सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक आहे. आणि या सर्वात जास्त महत्त्वाचे किंवा बडे गुंतवणूकदार म्हणजे परदेशी वित्तीय संस्था (फॉरिन इन्स्टिटयुशनल इन्व्हेस्टर - एफआयआय). मुख्यत: या अमेरिकेतील वित्तीय संस्था असल्या तरी ब्रिटन आणि इतर देशातील संस्थाही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतात.

सबप्राइम व दिवाळखोरीचा फुगा
डिसेंबर 2007 च्या शेवटपर्यंत आणि जानेवारी 2008च्या सुरवातील मार्केटमध्ये खूप तेजी होती, ती एफआयआयच्या गुंतवणूकीमुळे. नंतर अमेरिकेत सबप्राईम नावाचा फुगा फुटला. तिथल्या अनेक बड्या वित्तसंस्था संकटात सापडल्या काही दिवाळखोरी गेल्या, काहींना अमेरिकेच्या सरकारने पैसे ओतून वाचवले. पण या संस्थांनी आपली इतर देशातील गुंतवणूक विकून टाकणे सुरू केले. जगभर मंदीचे वातावरण सुरू झाले. 9 जानेवारी 2008 रोजी 20869 अंकांपर्यंत गेलेला आपला सेंसेक्स 9 मार्च 2009 या दिवशी 8160 अंकांपर्यंत खाली घसरला. अनेक शेअरचे भाव फार मोठ्या प्रमाणात खाली आले. एफआयआयच्या गुंतवणूकीतून बाहेर पडण्यामुळे याची सुरवात झाली पण भाव खाली यायला लागल्यामुळे इतरांनीही शेअर्स विकून टाकायला सुरवात केली व त्याचाही वाईट परिणाम झाला.

इमर्जिंग मार्केट :
आपल्या देशातील गुंतवणूक ही विकसित होत असलेल्या म्हणजे ‘ इर्मजिंग मार्केट’ अर्थात उगवत्या बाजारामधील गुंतवणूक असते. त्यांच्या देशातील गुंतवणुकीतून त्यांना जितका लाभ मिळेल त्यापेक्षा खूप जास्त लाभ अशा इर्मजिंग मार्केटमधील गुंतवणूकीतून त्यांना मिळू शकतो आणि त्या अपेक्षेनेच ते येतात. त्यांची आर्थिक ताकदही प्रचंड असते. विविध कारणांनी हे एकदम यायला सुरुवात करतात किंवा पैसे काढून घ्यायला सुरुवात करतात. बाजारात मग त्याप्रमाणे तेजी किंवा मंदी येते. विशेषत: या संस्था मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करत असल्याने त्यांच्या भावावर परिणाम होतो.

अनैसर्गिक फुगवट्यामुळे मंदी
कंपन्यांच्या उत्पादनांची कमी विक्री, त्यामुळे त्यांचे उत्पन्न व नफा कमी अशी अवस्था होती. यामुळे शेअरचे भाव खाली येणे साहजिक. परंतु त्या प्रमाणात भाव खाली येण्याऐवजी ते अगदी 90 टक्क्यांनी खाली आले याचा अर्थ मुळात ते वर गेले होते, तोच एक फुगवटा (बबल) होता. मुख्यत: एफआयआयच्या खरेदीमुळे तो आला होता. एकदा तेजी दिसल्यावर मग सगळेजण त्याबरोबर वाहवत जातात तसे झालेले होते. त्यामुळे फंडामेंटल्स म्हणजे कंपन्यांची कामगिरी याला बाजूला सारणारा हा लिक्विडीटी घटक आहे.

परदेशी संस्थाच्या पैशाने तेजी
या मंदीनंतर मुख्यत: अमेरिकेच्या सरकारच्या पैशाच्या पाठबळावर तेथील वित्तसंस्थानी टिकाव धरला व आर्थिक स्थितीत सुधारणा होणेही सुरू झाले. एफआयआयनीही परत इथे गुंतवणूक करणे सुरू केले. एप्रिलमध्ये तर मोदी सरकार येणार या अपेक्षेने खूप पैसा बाजारात आला. इतरांनाही खरेदी सुरू केली. नंतर 16 मे रोजी भाजप - मोदींचे सरकार प्रचंड बहुमत निवडून आल्यामुळे तर या परदेशी वित्तीय संस्थांनी बाजारात आणखी पैसा आणला. आताच्या तेजीचे हे महत्वाचे कारण आहे. एफआयआय आणि डीआयआय यांनी रोजच्या रोज किती रकमेची खरेदी-विक्री केली ते आकडे सेबीच्या वेबसाईटवर आपल्याला मिळतात.