आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीर्घकालीन गुंतवणूक चांगली, पण शेअर विकणेही आवश्यक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तम चालत असलेल्या कंपन्यांचे शेअर विकणेसुद्धा हिताचे असते :
दीर्घकालीन गुंतवणुकीची चांगली व उणे अशा दोन्ही बाजू आपण बघितल्या. मुख्यत: बारट्रॉनिक्स, श्री अष्टविनायक सिनेव्हिजन अशा कंपन्यांच्या बाबतीत व्यवस्थापनावरच आरोप झाले, त्यांच्यावर विश्वास राहिला नाही तर 3 आय इन्फोटेकबाबत तिच्यावर कर्जाचा फार मोठा बोजा होऊन तोट्यात असल्याने दीर्घकालीन गुंतवणुकीच्या नावाखाली हे शेअर होल्ड करून ठेवू नयेत, ते विकून टाकावे हे लक्षात घेतले. पण केवळ अशा समस्याग्रस्त कंपन्यांचेच शेअर विकून टाकावेत असे नाही, तर उत्तम चालत असलेल्या कंपन्यांचे शेअर विकणेसुद्धा हिताचे असते. दीर्घकालीन गुंतवणूक करा, ते फार चांगले, असे सातत्याने सांगितले जाते. त्यामुळे छोटे गुंतवणूकदार, निदान त्यातील काहीतरी यांचा असा समज होतो शेअर घ्या आणि होल्ड करून ठेवा. इतकेच नाही तर काही लोक समजतात, शेअर घ्या आणि विसरून जा. पण ही धारणा व धोरण योग्य नाही. दीर्घकालीन गुंतवणूक हा काही पवित्र मंत्र नाही की, ज्याच्या विरुद्ध जाणे म्हणजे पाप आहे. शेअर मार्केटमध्ये आपण गुंतवणूक करतो तो ते पैसे मिळवण्यासाठी याचे भान असणे आवश्यक आहे.
दीर्घकालीन गुंतवणुकीबाबत प्रथम एक खूणगाठ बांधा की, शेअर घ्या व विसरून जा हा जमाना आता गेलेला आहे :
दीर्घकालीन गुंतवणुकीबाबत प्रथम एक खूणगाठ बांधा की, शेअर घ्या व विसरून जा हा जमाना आता गेलेला आहे. गुंतवणुकीचा वेळोवेळी आढावा घेत राहणे फार गरजेचे झालेले आहे. विशेषत: असा आढावा घेत राहणे सोपे झालेले असल्याने तसे न करणे चूक आहे व आपल्या हिताचे नाही. आपल्याकडे जे शेअर आहेत त्यांचा वेगवेगळ्या वेबसाइटवर विनामूल्य पोर्टफोलिओ बनवता येतो. त्यासाठी शेअर्सचा खरेदी भाव, तारीख, शेअरची संख्या, एकूण रक्कम इत्यादी तपशील द्यावा लागतो. त्यानंतर साइटवरील या आपल्या पोर्टफोलिओवर लॉग-ईन केले की, त्या शेअर्सचा सध्याचा भाव, खरेदी भावापेक्षा तो वर किंवा खाली आहे, एकूण नफा की तोटा हे बघायला मिळते. एका वेबसाइटवर असा पोर्टफोलिओ बनवून त्या पोर्टफोलिओकडे रोज नाही तरी ठरावीक दिवसांनी अवश्य नजर टाकावी. कोणते शेअर खाली घसरत आहेत, कोणते वर जात आहेत बघावे, त्याची कारणे साइटवरून व इतर मार्गाने जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. शेअर खूप घसरत असेल तर स्टॉप लॉसचा विचार करावा. भाव खूप वर गेलेला असेल तर त्याचा ईपीएस, पीई रेशो काय आहेत बघावे. पीई रेशिओ अवास्तव फुगलेला असेल व त्यासाठी योग्य कारण नसेल तर निदान अंशत: विकून नफा खिशात टाकणे चांगले. बहुधा असा शेअर कालांतराने खाली घसरू शकतो. भाव खाली आला, नंतर पीई रेशिओ रास्त असेल व कंपनीचे फंडामेंटल्स बदलले नसतील, शेअर घेण्यायोग्य असेल तर असा शेअर पुन्हा घेण्याचा विचार करावा, म्हणजे चांगली कंपनी असेल तर तिचा शेअर हातातून निसटणार नाही. विकणे व खरेदी करणे हे जमणे मात्र आवश्यक आहे. जमणे म्हणजे तशी मानसिकता असणे. बहुधा शेअर खाली यायला लागला व योग्य व्हॅल्युएशनला आला तरी भाव आणखी खाली येईल म्हणून वाट बघत थांबणे असे घडते. त्यावर मात करता येणे जमले पाहिजे. तसेच विकून टाकलेला चांगला शेअर घेण्याऐवजी झटपट नफा देईल असा दुसरा कोणताच भलताच शेअर (मोमेंटम शेअर म्हणजे ज्याच्या भावात लवकर लवकर चढ-उतार होतात असा) घ्यावासा वाटतो, तेही टाळता आले पाहिजे.
निदान थोडे तरी शेअर विकून नफा खिशात टाकणे आवश्यक आहे, हे पथ्य पाळले पाहिजे :
शेअर बाजारात तेजी सुरू होते, तेव्हा अनेक शेअरचे भाव वाढत जातात. ते उचित (रिझनेबल) असतील तर ठीक, पण शेअरचे भाव व व्हॅल्युएशन यांचा संबंध राहत नाही, पीई रेशिओ अवास्तव फुगतो, त्याला बबल म्हणतात. ही धोकादायक स्थिती असते. 1990 ते 2008 या काळात मार्केटमध्ये तीन मोठे घोटाळे झाले. त्यापैकी हर्षद मेहता हा पहिला. त्याही वेळेस अनेक शेअरचे भाव अफाट वाढले. हर्षद मेहताने त्याबाबत रिप्लेसमेंट थिअरी नावाची एक आचरट कल्पना मांडली आणि भले भले जणू ती फार चमकदार कल्पना असल्यासारखे तिच्या मागे गेले. हर्षदचे म्हणणे होते, एसीसीसारखी सिमेंट तयार करणारी मोठी कंपनी आता उभी करायची असेल तर त्यासाठी जी गुंतवणूक व खर्च लागेल तो एसीसीच्या शेअरचा भाव. ही अशास्त्रीय व कोणताही आर्थिक आधार नसलेली कल्पना होती. पण हर्षदला वाढवत नेलेल्या शेअरच्या भावांचे समर्थन करायचे होते म्हणून त्याने ती मांडली. नंतर त्याने अफरातफर करून बॅँकांचे हजारो कोटी रुपये वापरून कृत्रिम तेजी आणली होती असे बिंग फुटल्यावर मग पूर्ण मार्केटच कोसळले. ते सावरायला अनेक वर्षे लागली. अनेक अनुभवी तज्ज्ञांच्याही हा घोटाळा आधी लक्षात आला नाही. त्यांचेही नुकसान झाले. त्यामुळे छोट्या गुंतवणूकदारांना तो ओळखता येईल व मार्केट कोसळण्याआधीच ते त्यातून बाहेर पडतील अशी अपेक्षा चूक आहे. पण हा घोटाळा व नंतरचे घोटाळे याच्या अनुभवाच्या आधारावर त्यांनी सावध राहणे व शेअरचे भाव अवास्तव वाढले, त्यांचा व्हॅल्युएशनशी संबंध राहिला नाही तर निदान थोडे तरी शेअर विकून नफा खिशात टाकणे आवश्यक आहे, हे पथ्य पाळले पाहिजे.
दीर्घकालीन गुंतवणूक ही चांगली बाब आहे, पण नफावसुली हीसुद्धा वाईट गोष्ट नाही. या लेखात आपण त्याबाबतची सर्वसाधारण कारणे बघितली. पुढील लेखात विशिष्ट कारणे बघू.