आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअरचे विभाजन (स्प्लिट)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोनस शेअर्स व राइट्स शेअर्स यांची माहिती घेतल्यानंतर शेअरची संख्या व शेअर कॅपिटल (भागभांडवल) यावर परिणाम करणा-या इतर काही बाबी बघू. शेअरचे विभाजन (स्प्लिट), पुनर्खरेदी (बाय बॅक) व नोंदणी रद्द करणे (डिलिस्टिंग) या अशा तीन बाबी आहेत. यापैकी शेअर विभाजन (स्प्लिट) याची माहिती आज घेऊ. शेअरचे विभाजन (स्प्लिट) म्हणजे शेअरचे जे दर्शनी मूल्य (फेस व्हॅल्यू) आहे ते विभाजित करणे, उदा. गोदरेज प्रॉपर्टीजच्या शेअरचे दर्शनी मूल्य 10 रुपये होते. हे दर्शनी मूल्य 5 रुपये करण्याबाबत कंपनीने 23 मार्च 2013 ला घोषणा केली व ते आता 21 नोव्हेंबर 2013 पासून 5 रुपये झाले आहे. इथे लक्षात घेण्याची बाब म्हणजे यामुळे दोन गोष्टी घडतात. ज्यांच्याकडे रेकॉर्ड डेटला दर्शनी मूल्य 10 रुपये असलेले गोदरेज प्रॉपर्टीजचे शेअर होते त्यांना त्या बदल्यात दुप्पट शेअर मिळतात. 10 रुपयांच्या एका नोटेऐवजी 5 रुपयांच्या दोन नोटा आपल्याला मिळतात अगदी तसेच हे; पण दर्शनी मूल्य 10 रुपयांऐवजी 5 रुपये झाल्यामुळे शेअरचा भावही त्याच प्रमाणात खाली येतो. गोदरेज प्रॉपर्टीजबाबत 20 नोव्हेंबर 2013 ला शेअरचा भाव 380 रुपये होता, तो 21 नोव्हेंबर 2013 ला 180 रुपये झाला. इथे जसे 10 रुपये दर्शनी मूल्य 5 रुपयांत विभाजित करण्यात आले, तसे ते 2 रुपये, 1 रुपया इत्यादी प्रमाणातही विभाजित केले जाऊ शकते. हा निर्णय त्या, त्या कंपनीचा असतो.


कंपन्यांचा हेतू व अपेक्षा : कंपन्या त्यांचा शेअर असा विभाजित करतात त्यामागे त्यांचा हेतू असतो, खरेदी-विक्रीसाठी जास्त संख्येने शेअर मार्केटमध्ये उपलब्ध व्हावेत. तसेच शेअरचा भाव कमी झाल्यामुळे त्यांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार जास्त प्रमाणात होतील अशीही त्यांची अपेक्षा असते. साधारण पंधरा-वीस वर्षांपूर्वी अनेक कंपन्यांच्या शेअरचे दर्शनी मूल्य 100 रुपये असायचे आणि त्या वेळेस जशी आपल्या अर्थव्यवस्थेची व शेअर मार्केटची स्थिती होती, त्यामुळे शेअरचे भावही कमी असायचे. यात सुधारणा झाल्यानंतर जसे शेअरचे भाव वाढायला लागले, तसे कंपन्यांना शेअरचे विभाजन करणे आवश्यक वाटायला लागले. हे विभाजन होत गेले नसते, तर शेअरचे भाव किरकोळ गुंतवणूकदारांना किती न परडवणारे झाले असते, ते टाटा मोटार्सच्या शेअरच्या उदाहरणाने समजून घेऊ. जानेवारी 1996 मध्ये टाटा मोटार्सच्या शेअरचे दर्शनी मूल्य 100 रुपये होते. ते त्या वर्षी 10 रुपये करण्यात आले व 1 शेअरच्या बदल्यात 10 शेअर देण्यात आले. पुन्हा सप्टेंबर 2011 मध्ये हे 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर 2 रुपये दर्शनी मूल्य असे विभाजित करण्यात आले. या 2 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या टाटा मोटार्सच्या एका शेअरचा भाव 29 नोव्हेंबर 2013 ला 398 रुपये आहे. समजा टाटा मोटार्सच्या शेअरचे दर्शनी मूल्य आज 10 रुपये असते, तर हा एका शेअरचा भाव 398 गुणिले 5 बरोबर 1,990 रुपये असता व जर दर्शनी मूल्य आजही 100 रुपये असते, तर हाच भाव प्रतिशेअर 19,900 रुपये राहिला असता. म्हणजे अगदी एक लाख रुपये गुंतवूनदेखील फक्त 5 शेअर विकत घेता आले असते आणि यामुळे किरकोळ गुंतवणूकदार या शेअरपासून दूर राहिले असते.


बाजारात शेअरच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार होत राहणे म्हणजेच लिक्विडिटी असणे महत्त्वाचे असते. शेअर मार्केट म्हटल्यावर प्रथम अनुस्यूत तत्त्व हेच आहे की, घेतलेले शेअर कधीही विकता आले पाहिजेत. इल-लिक्विड म्हणजे खरेदी-विक्रीचे व्यवहार फार कमी प्रमाणात होत असतील, तर असे शेअर टाळण्याकडे लोकांचा कल असतो.
शेअरची संख्या वाढली तरी भागभांडवल वाढतेच असे नाही : कंपनी, गुंतवणूकदार व खरेदी-विक्रीचे व्यवहार या दृष्टिकोनातून शेअरचे विभाजन का केले जाते ते बघितले. शेअरच्या विभाजनामुळे कंपनीच्या शेअरची संख्या त्या प्रमाणात वाढते; पण फक्त संख्या वाढते, कंपनीचे भागभांडवल (कॅपिटल) मात्र वाढत नाही. ते आहे तितकेच राहते. गोदरेज प्रॉपर्टीजच्याच उदाहरणावरून हे समजून घेऊ. विभाजन होण्यापूर्वी या कंपनीच्या शेअरची संख्या होती, 9,96,16,780 शेअर (9 कोटी 96 लाखांपेक्षा जास्त). त्या वेळेस याचे दर्शनी मूल्य 10 रुपये होते म्हणून जारी केलेले (इश्यूड कॅपिटल) होते 99,61,67,800 रुपये, (99 कोटी 61 लाख 67 हजार 800 रुपये). आता शेअरचे दर्शनी मूल्य 5 रुपये झाल्यामुळे शेअरची संख्या दुप्पट झाली म्हणजे 9,96,16,780 गुणिले 2 बरोबर 19,92,33560 शेअर. या प्रत्येक शेअरचे दर्शनी मूल्य 5 रुपये असल्याने जारी केलेले (इश्यूड कॅपिटल) तितकेच म्हणजे 99,61,67,800 रुपये (99 कोटी 61 लाख 67 हजार 800 रुपये) राहते.


शेअरचे विभाजन (स्प्लिट) केल्यामुळे त्याचा भाव आधी त्या प्रमाणात कमी येतो. मात्र, नंतर त्याबद्दल चांगली भावना निर्माण झाल्याने मग भाव चढता राहतो, असा एक समज आहे; परंतु प्रत्यक्षात ब-याचदा भाव विभाजना आधीपासूनच वाढत असतात. आधी जर ते खाली जात असतील, तर विभाजनानंतरही खाली जात राहतात. म्हणजे विभाजनाआधी जो भावाचा कल होता, तोच नंतरही सुरू राहतो.
शेअर विभाजनामुळे ईपीएस, बुक व्हॅल्यू इत्यादी रेशिओ बदलतात.
मात्र पीई रेशिओ बदलत नाही, हे समजून घेऊ.
० ईपीएस म्हणजे र्अर्निंग पर शेअर अर्थात प्रतिशेअर मिळकत आणि
० अर्निंग म्हणजे करोत्तर नफा म्हणून :
० ईपीएस = कर दिल्यानंतरचा नफा भागिले इश्यू केलेले शेअर
० गोदरेज प्रॉपर्टीजबाबत बघितले, तर शेअर विभाजनामुळे त्यांच्या इश्यू केलेल्या शेअरची संख्या दुप्पट होते. मात्र, अर्निंग म्हणजे करोत्तर नफा आहे तितकाच राहतो त्यामुळे आधीच्या तुलनेत त्याचा ईपीएस निम्मा होईल. तसेच पीई रेशिओ म्हणजे प्राइस टू अर्निंग रेशिओ अर्थात शेअरची प्राइस (भाव) भागिले ईपीएस आणि ईपीएस निम्मा होतो, तसे त्याचा भावही निम्मा होतो हे आपण बघितले. त्यामुळे पीई रेशिओ मात्र बदलत नाही. ईपीएसप्रमाणेच बुक व्हॅल्यूही शेअर विभाजनाच्या प्रमाणात बदलते.
० एखाद्या कंपनीच्या शेअरचा भाव एकदम खाली आला तर त्यामागे शेअरचे विभाजन, बोनस शेअर्स, राइट्स शेअर्स इत्यादी काही कारणे आहेत का बघावे तसेच शेअर विभाजनानंतर त्याच कंपनीच्या दोन-तीन वर्षांच्या रेशिओंची तुलना करायची असेल तरी या बाबींचा परिणाम लक्षात घेऊन तुलना करावी.