Home »Business »Personal Finance» Understand Credit Card Statement

क्रेडिट कार्डचे स्टेटमेंट समजून घ्या

अदिल शेट्टी | Feb 20, 2013, 00:00 AM IST

  • क्रेडिट कार्डचे स्टेटमेंट समजून घ्या


क्रेडिट कार्डधारकांना दर महिन्याला त्याचे स्टेटमेंट मिळते. यात दर्शवलेल्या थकबाकीच्या आकड्याकडेच बहुतेक जण लक्ष देतात.पूर्ण स्टेटमेंट वाचले जात नाही. त्यामुळे स्टेटमेंटमधील चूक किंवा फसवणूक किंवा चुकीच्या रकमेविषयीच्या माहितीकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. काही जणांना स्टेटमेंट समजून घेण्यात अनेक अडचणी येतात.हे स्टेटमेंट समजून घेण्यासाठी उपयुक्त माहिती देत आहोत...

* क्रेडिट कार्ड क्रमांक : हा 16 अंकी क्रमांक कार्डवर खडबडीत अक्षरांत लिहलेला असतो. ऑनलाइन पेमेंट तसेच चेकद्वारे रक्कम भरताना या क्रमांकाची आवश्यकता असते. हा क्रमांक लक्षात ठेवावा. कारण कार्ड चोरी तसेच इतर फसवणुकीच्या घटनांत त्याची सूचना बँकेला देणे सोयीस्कर ठरते.
* क्रेडिट लिमिट :एका कार्डवरील खरेदीची तसेच पैसे देण्या-घेण्याची कमाल मर्यादा म्हणजे क्रेडिट लिमिट
* अव्हेलेबल क्रेडिट लिमिट : आपले क्रेडिट लिमिट आणि खर्च करण्यात आलेली रक्कम यातील फरक म्हणजे उपलब्ध क्रेडिट लिमिट. जर एखाद्याची क्रेडिट लिमिट एक लाख रुपये आहे आणि त्याने 20 हजार रुपये खर्च केले आहेत, तर त्याची अव्हेलेबल क्रेडिट लिमिट 80 हजार रुपये असेल.
* पेमेंट ड्यू डेट :या तारखेपर्यंत कार्डसंबंधीची रक्कम भरायची असते. म्हणजेच या तारखेपर्यंत बँकेला ती रक्कम मिळायला हवी. चेकद्वारे करण्यात आलेला भरणाही या तारखेपर्यंतच बँक खात्यात जमा व्हायला हवा.
*स्टेटमेंट डेट : क्रेडिट कार्डचे बिल ज्या दिवशी जारी होते ती तारीख म्हणजे स्टेटमेंट डेट. थकबाकीची रक्कम पेमेंट ड्यू डेटपर्यंत जमा केली नाही तर स्टेटमेंट डेटपासून त्यावर व्याज आकारले जाते.
* कॅश अ‍ॅडव्हान्स / कॅश लिमिट :याअंतर्गत कार्डद्वारे एका विशिष्ट मर्यादेपर्यंत एटीएममधून रोख रक्कम काढता येते. सर्वसाधारणपणे क्रेडिट लिमिटच्या 30 टक्के या प्रमाणात कॅश लिमिट असते. अशा कॅश अ‍ॅडव्हान्सवर 2.5 ते 3 टक्क्यांपर्यंत एकरकमी शुल्क आकारण्यात येते. व्याजही त्याच दिवसापासून सुरू होते. हे व्याज खरेदीवरील व्याजापेक्षा जास्त असते.
*टोटल अमाउंट ड्यू :हे क्रेडिट कार्डवरील एकूण थकबाकी दर्शवते. कार्डवर उधार घेतलेली रक्कम म्हणजे टोटल अमाउंट ड्यू.
*मिनिमम अमाउंट ड्यू : क्रेडिट कार्डवरील एकूण थकबाकीपैकी बँकेला चुकती करायची किमान रक्कम म्हणजेच मिनिमम अमाउंट ड्यू. याचे प्रमाण एकूण थकबाकीच्या 5 ते 20 टक्क्यांपर्यंत असू शकते. याचा भरणा न केल्यास थकबाकीदार समजण्यात येते. असे झाल्यास विलंब शुल्क आकारण्यात येते.
*ट्रांझेक्शन डिटेल्स : यात क्रेडिट कार्डद्वारे करण्यात आलेली खरेदी तसेच भरणा याची माहिती असते. यातच व्याज, वार्षिक शुल्क, विलंब शुल्क आदी माहिती असते.
* रिवॉर्ड पॉइंट : कार्डद्वारे करण्यात आलेल्या खरेदीवर रिवॉर्ड पॉइंट मिळतात. बिलात त्याची माहिती असते. यात ओपनिंग बॅलन्स, वापरण्यात आलेले पॉइंट्स आणि शिल्लक पॉइंट्स याची माहिती असते. गरजेनुसार पॉइंट्सचा वापर करता येतो. बँक / कंपनीनिहाय रिवॉर्ड पॉइंट विविध पद्धतींनी देण्यात येतात.
...तर यानंतर येणारे क्रेडिट कार्ड स्टेटमेंट वाचण्यासाठी मुद्दाम वेळ काढा. यामुळे केवळ फसवणुकीलाच आळा बसेल असे नव्हे तर आपला कॅश फ्लोही चांगला बनवण्यास मदत होईल. क्रेडिट कार्ड स्टेटमेंट वाचल्यामुळे आपण क्रेडिट कार्डचा वापर नेमका कसा करत आहोत, हेही लक्षात येण्यास मदत होईल. तसेच टोटल अमाउंट ड्यू, मिनिमम अमाउंट ड्यू नेमके किती आहे हेही कळेल.


लेखक bankbazaar.com चे सीईओ आहेत.
adhil.shetty@dainikbhaskargroup.com

Next Article

Recommended