आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Uninor Close Down In Mumbai,but Its Work Contiue State

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

युनिनॉर मुंबईत बंद, राज्यात सुरू राहणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - युनिनॉर या मोबाइल सेवा पुरवठादार कंपनीने शनिवारी मध्यरात्रीपासून कामकाज बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे कंपनीच्या मुंबईतील जवळपास 18 लाख ग्राहकांचा संपर्क तुटला आहे. मात्र, राज्यात या कंपनीच्या ग्राहकांना सध्या काहीही धोका नसल्याने त्यांची सेवा कायम सुरू राहणार आहे. नवीन टूजी स्पेक्ट्रम मिळवण्यात अपयशी ठरलेल्या तसेच लिलाव प्रक्रियेत सहभागी न झालेल्या मोबाइल कंपन्यांनी आपली सेवा तातडीने बंद करावी, असा सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर युनिनॉरला हा निर्णय घ्यावा लागला आहे.

तातडीने कामकाज बंद करा आणि कामकाज क्रमश: बंद करण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यासाठी तात्पुरता परवानाही मिळणार नाही, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यावाचून कोणताही पर्याय आमच्याकडे नाही. त्यामुळे आम्ही आमचे नेटवर्क तातडीने बंद करीत असल्याचे युनिनॉरचे व्यवस्थापकीय संचालक सिगव्हे ब्रेक्के यांनी शनिवारी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे स्पष्ट केले.

गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने युनिनॉरचे 22 तसेच अन्य दूरसंचार कंपन्यांचे 100 परवाने रद्द केले होते. दूरसंचार मंत्री असताना ए. राजा यांच्या कार्यकाळात हे परवाने देण्यात आले होते. न्यायालयाच्या निर्णयानुसार परवाने रद्द केल्याने मुंबईतील सेवा खंडित झाली.

टेलिविंग्जकडे हस्तांतरण
युनिनॉरला 20 वर्षांच्या कालावधीसाठी नवीन स्पेक्ट्रम मिळाला असल्यामुळे महाराष्‍ट्र आणि गोव्यातील सहा मंडलांसह गुजरात, उत्तर प्रदेश पूर्व-पश्चिम, बिहार, झारखंड, आंध्र प्रदेशातील कायम चालू राहणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. या राज्यांतील युनिनॉरचा मोबाइल सेवा व्यवसाय ‘टेलिविंग्ज कम्युनिकेशन्स’कडे हस्तांतरित करण्याची टेलिनॉरची प्रक्रिया सध्या सुरू आहे.

टेलिनॉरचे सहा स्पेक्ट्रम
‘युनिनॉर’मध्ये सर्वाधिक भांडवली हिस्सा असलेली ‘टेलिनॉर’ ही कंपनी आपल्या टेलिविंग्ज कम्युनिकेशन्स या नवीन कंपनीसह गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या स्पेक्ट्रमच्या लिलावामध्ये सहभागी झाली होती. या लिलावात टेलिनॉरने सहा मंडलांमधील स्पेक्ट्रम पटकावले होते.
कर्मचा-यांना इतरत्र नोकरी
मुंबईतील कर्मचा-यांना नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कंपनी सर्व प्रकारे मदत करील. अन्य मंडलांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही कंपनीने म्हटले आहे.