आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Union Government Concentrate Fundamental Project

अर्थचक्राला गती देण्यासाठी केंद्राची पायाभूत प्रकल्पांवर नजर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अर्थव्यवस्थेची चक्रे गतिमान करतानाच गुंतवणूकदारांचे मनोबल उंचावण्यासाठी केंद्र सरकारने पुढील सहा महिन्यांत दीड लाख कोटी रुपयांचे प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे. नियोजन आयोगाशी सल्लामसलत केल्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने निश्चित केल्यानुसार या प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यात येणार असून त्यामध्ये रेल्वे, द्रुतगती मार्र्ग, बंदरे, विमानतळ, ऊर्जा आणि पारेषण अशा काही महत्त्वाच्या क्षेत्रांचा समावेश आहे.
गुंतवणूकदारांच्या मानसिकतेत सुधारणा करण्यासाठी पायाभूत क्षेत्रातील गुंतवणुकीला गती देणे गरजेचे असल्याचे मत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी व्यक्त केले आहे. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत 2013-14 वर्षात पायाभूत प्रकल्प राबवण्याचे निश्चित करण्यात आले. या वेळी नियोजन आयोगाचे अध्यक्ष मॉँटेकसिंग अहलुवालिया, ऊर्जा, कोळसा, रेल्वे, रस्ते, नौकानयन आणि नागरी वाहतूक खात्यांचे मंत्री उपस्थित होते. पायाभूत प्रकल्पांचा आढावा घेतल्यानंतर मंत्रिमंडळाकडून मान्यता मिळाल्यावर पुढील सहा महिन्यांत हे प्रकल्प राबवण्यात येणार असल्याचे नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मॉँटेकसिंग अहलुवालिया यांनी सांगितले.

हे आहेत गुंतवणूक प्रस्ताव
मुंबई उन्नत रेल्वे मार्ग : 30,000 कोटी रु.
आंतरराष्ट्रीय विमानतळ (भुवनेश्वर, इम्फाळ) : 20,000 कोटी रु.
ऊर्जा आणि पारेषण प्रकल्प : 40,000 कोटी रु
लोकोमोटिव्ह प्रकल्प : 5,000 कोटी रु.
इस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर : 10,000 कोटी रु.
बंदर प्रकल्प : 10,000 कोटी रु.

सार्वजनिक - खासगी भागीदारीतून आठ हरित विमानतळ प्रकल्प : नवी मुंबई, जुहू (मुंबई), गोवा, कन्नूर, पुणे (राजगुरूनगर, चाकण), श्रीपेरुमबुदूर, बेल्लारी, राजगड.
दोन आंतरराष्ट्रीय विमानतळांव्यतिरिक्त 50 नवीन कमी खर्चातील लहान विमानतळांची उभारणी.
येथे उभारणार कमी खर्चातील विमानतळ : महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, झारखंड, बिहार, पंजाब, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, मध्य प्रदेश, राजस्थान.