मुंबई - नव्या चारपदरी महामार्ग प्रकल्पाच्या अंमलबजावणीमुळे उस्मानाबाद आणि सोलापूर विभागातील औद्येगिकीकरणाला एक नवा आयाम मिळणार आहे. हा महामार्ग थेट राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या बाजारपेठांना जोडला जाणार असल्याने या भागात नवीन उद्योग आकर्षित होण्याबरोबरच मालवाहतूक आणि अन्य सेवांचा खर्चही लक्षणीय कमी होण्यास मदत होणार आहे.
राज्यातल्या राष्ट्रीय महामार्ग - ९ च्या पट्ट्यातील सोलापूर - कर्नाटक सीमांना जोडणार्या १०० किलोमीटर लांबीच्या महामार्गाच्या चौपदरीकरणाला प्रारंभ झाला आहे. रस्ते आणि महागार्ग क्षेत्रात कार्यरत असलेल्या श्रेई इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स लिमिटेडच्या पुढाकारातून सोलापूर टोलवेज कंपनीला या प्रकल्पाचे काम मिळाले आहे. सोलापूरला स्थिर आर्थिक वाढ आणि सामाजिक विकासाच्या दृष्टीने भक्कम पायाभूत सुिवधांची गरज आहे.
साखर, हातमाग, यंत्रमाग आणि सूतगिरण्यांचे प्रमुख केंद्र असलेल्या या क्षेत्रासाठी जलद वाहतुकीचे जाळे आणि बाजारपेठांशी संपर्क होणे महत्त्वाचे आहे. प्रकल्पामुळे या विभागातील व्यापार उदिमांच्या क्षमतेत भर पडण्याबरोबरच मालवाहतूक व अन्य सेवा खर्चात बचत होण्यास मदत होईल, असा विश्वास श्रेई इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्सच्या पायाभूत प्रकल्प विकास विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बजरंगकुमार चौधरी यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केला.
महामार्ग प्रकल्पाचा फायदा काय?
- उस्मानाबाद, सोलापुरात नवीन उद्योग येण्यास भविष्यात वाव.
- द्राक्षे, डाळिंब यांसारखा शेतमाल थेट बाजारापर्यंत जाण्यात चालना मिळणार.
- लहान, मध्यम उद्योगांचा विकास - हातमाग, यंत्रमाग, चादरी- टॉवेलचे उत्पादन करणार्या सूतगिरण्या, साखर कारखाने (३१ पेक्षा जास्त), तेलबिया उत्पादक.
- या भागातील लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये उत्पादकता आणि स्पर्धात्मकता सुधारण्यास मदत.
- फाउंड्री आणि अन्य बड्या उद्योगांची देशाच्या पश्चिम, उत्तर, दक्षिण भागातील वाहन उत्पादन विभागांपर्यंत मालवाहतुकीची गरज भागवली जाणे शक्य.
- महामार्ग प्रकल्पामुळे महत्त्वाच्या राष्ट्रीय बाजारपेठांशी जाेडले जाणार.
असा आहे प्रकल्प
- राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्प टप्पा ३ अंतर्गत बांधा, वापरा, हस्तांतरित करा तत्त्वावर श्रेई इन्फ्राला कंत्राट.
- पूर्ण होण्याचा अपेक्षित कालावधी : २४ महिने,
- एकूण खर्च : ८८२.६२ कोटी रु.,
- सवलत कालावधी : २५ वर्षे,
- चारपदरी महामार्गाची लांबी : १००.०६ कि.मी.