आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Value Fund : Long Term Investment Best Alternative

व्हॅल्यू फंड : दीर्घकाळ गुंतवणुकीचा उत्तम पर्याय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाने आपल्याकडे यशस्वी व्हॅल्यू फंड असतानाही अलीकडेच आणखी एक व्हॅल्यू फंडाची श्रेणी सुरू केली आहे. दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्ट असणा-या गुंतवणूकदारांना याची थीम समजण्यास थोडे कठीण जात आहे. या फंडांची थीम कडकपणे अमलात आणण्याचा दावा प्रत्येक कंपनी करते, मात्र तसे करणे कंपनीला जमत नाही. त्यामुळे व्हॅल्यू फंड काय आहे हे समजून घेऊया आणि मग त्यात गुंतवणूक करायची
की नाही याचा निर्णय घेऊ.
व्हॅल्यू फंड म्हणजे काय : ज्या कंपन्यांची पायाभूत रचना मजबूत आहे आणि ज्या कंपन्यांना बाजारात अत्यंत प्रतिष्ठा आहे अशा कंपन्यांत बहुतांश इक्विटी म्युच्युअल फंड गुंतवणूक करतात. अशा कंपन्या शेअर बाजारात लोकप्रिय असतात आणि जास्त परतावा देण्याची त्यांची क्षमता असते. चतुर फंड व्यवस्थापक अशा कंपनीत मध्यम अवधीसाठी गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवण्याची संधी सोडत नाही.
याउलट, काही कंपन्यांची पायाभूत रचना भक्कम असते, मात्र शेअर बाजारात या कंपन्यांचे मूल्य अत्यंत कमी असते. अशा कंपन्यांच्या शेअर्सना शेअर अंडर प्राइस्ड किंवा अंडरव्हॅल्यूड समभाग असे संबोधले जाते. अशा कंपन्यांचे अर्निंग पर शेअर (प्रति समभाग मिळकत : पी-ई गुणोत्तर) अत्यंत कमी असते आणि मुख्य प्रवाहातील गुंतवणूकदार या समभागांकडे काहीशा तुच्छतेने पाहतात. या कंपन्या संकटकाळातून जात असतील किंवा त्यांच्या उत्पन्नात घट झाली असेल. मात्र, अशा कंपन्यांना प्रगल्भ कंपन्या मानले जाते. त्यांचा कारभार सध्या थंडावला असला तरी सध्याच्या कमाईतून गुंतवणूकदारांना लाभांश देण्याला त्या कंपन्या प्राधान्य देतात. डिव्हिडंड इन्कम आणि कॅपिटल अ‍ॅप्रिसिएशन सातत्याने वाढवण्यावर या कंपन्यांचा भर असतो. अशा कंपन्याचे समभाग मूल्य सातत्याने अंडरव्हॅल्यूड राहणार नाही याबाबत व्हॅल्यू फंड कंपन्यांचे व्यवस्थापक आशावादी असतात. जेव्हा बाजारात या समभागांचे मूल्य वधारते तेव्हा व्यवस्थापक त्यातून फायदा कमावतात. अशा कंपन्यांतील वृद्धीऐवजी सुरक्षेला व्हॅल्यू फंडात महत्त्वाचे स्थान असते.
अनेक कंपन्या या संकल्पनेला चिकटून राहण्याचा दावा करतात, मात्र यापैकी फारच कमी कंपन्या या संकल्पनेनुसार काम करतात. सध्या आयसीआयसीआय प्रुडेन्शियल डिस्कव्हरी फंड, टेम्पल्टन इंडिया इक्विटी इन्कम फंड आणि क्वांटम लाँग टर्म इक्विटी फंड यांसारखे काही फंड व्हॅल्यू आणि ग्रोथ या संमिश्र संकल्पनेनुसार कार्यरत आहेत. डिव्हिडंड यील्ड फंडांनाही व्हॅल्यू फंड मानले जाते.
परतावा : भविष्यकाळातील लाभांश आणि कॅपिटल अ‍ॅप्रिसिएशनमधून उत्पन्न मिळवणे हा व्हॅल्यू फंडाचा उद्देश असतो. या फंडांच्या परताव्यात जास्त चढ-उतार नसतात आणि ग्रोथ फंडाच्या तुलनेत परतावा कमी असतो. दीर्घकाळासाठी अशा प्रकारच्या फंडातून चांगला परतावा मिळतो. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल डिस्कव्हरी फंड स्थिर कामगिरी नोंदवणारा असून या संकल्पनेनुसार तो यशस्वी ठरला आहे.
गुंतवणूक करावी का : व्हॅल्यू फंडात काही आव्हानेही असतात. काही फंड व्हॅल्यू फंडाच्या नावाने आले, मात्र त्या संकल्पनेला चिकटून राहिले नाहीत. त्यामुळे अशा योग्य फंडांची निवड करणे गुंतवणूकदारांसाठी अवघड असते. दुसरे आव्हान म्हणजे, यात गुंतवणूकदारांना खूप संयम बाळगावा लागतो. तेजीच्या काळातही अशा फंडांची कामगिरी कमकुवत असते. काही वेळा फंड व्यवस्थापकाच्या चुकाही भोवतात. अशा फंडाचा उद्देश दीर्घकाळासाठी असतो, त्यामुळे दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणा-यांसाठी या फंडातील
गुंतवणूक उत्तम पर्याय आहे. आपल्या पोर्टफोलिओतील 15 ते 20 टक्के हिस्सा व्हॅल्यू फंडात गुंतवणे चांगले.
लेखक मान्यताप्राप्त गुंतवणूक मार्गदर्शक असून द फायनान्शियल प्लॅनर्स इंडियाचे सदस्य आहेत.