आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vasant Bhoir Made Air Pollution Controlling Product, Divya Marathi

जिद्द: टाकाऊ वस्तूंपासून वायुप्रदूषण नियंत्रक, आठवी उत्तीर्ण वसंत भोईर यांची कमाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अंगी मुळातच जर कल्पकता असेल आणि ती साकारण्याची ऊर्मी मनात असेल तर वय आणि शिक्षण कधीच अडथळा ठरत नाही. वायुप्रदूषणाचा प्रश्न गंभीर झालेला असतानाच ५८ वर्षांच्या वसंत भोईर यांनी धुरातील कार्बनचे प्रमाण लक्षणीय कमी करणारे उपकरण विकसित केले आहे. त्यांना आता आस आहे ती या उत्पादनाला लवकरात लवकर पेटंट मिळण्याची.

मॅकेम्को इंडस्ट्रीज या डोंबिवलीतील रासायनिक कंपनीत काम करणारे वसंत भोईर फक्त आठवी पास आहेत पण त्यांची बुद्धी मात्र एखाद्या इंजिनिअरसारखी चालते. पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूक असलेल्या भोईर यांना लहानपणापासूनच काही तरी वेगळे करावे असे वाटत होते. त्यामुळे घरी गरिबी असल्याने त्यांनी भंगारातील वस्तूंचा कलात्मक वापर करून अनेक प्रयोगशील उत्पादने तयार केली. इंधनाशिवाय ऊर्जा निर्मिती करणारे एक उपकरण त्यांनी तयार केले. ग्लोबल वॉर्मिंगमुळे वातावरणातील तापमान वाढत चालले असून हवेतील प्रदूषणाचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यावर मात करण्यासाठी देशाचे एक जबाबदार नागरिक या नात्याने भोईर यांनी वाहनांच्या धुरातून निर्माण होणारे कार्बनचे प्रमाण कमी करणारे एक अनोखे उपकरण तयार केले आहे. या उपकरणामुळे कार्बनचे प्रमाण ९५ टक्के कमी होते असा दावा त्यांनी केला आहे. आपल्या कारखान्यातील भंगार साहित्याचा उपयोग करून हे २० किलो वजनाच्या उपकरणाची निर्मिती केली आहे. पण हे वजन १० ते १२ किलोपर्यंत कमी करण्याचा त्यांचा विचार आहे.

प्रदूषण नियंत्रित करणा-या या उपकरणाला पेटंट मिळण्यासाठी त्यांनी अर्ज केला आहे. पेटंट मंजुरी लवकरात लवकर मिळाल्यास अधिक चांगले उत्पादन विकसित करून ते विविध क्षेत्रांना उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे.

असे आहे उपकरण
एका चौकोनी लोखंडी पत्र्याच्या खोक्याच्या दोन्ही बाजूला दोन नळ्या बसवल्या आहेत. एक नळी वाहनातून बाहेर पडणा-या धुराच्या नळीला जोडीली जाते. हा धूर दुस-या नर्ळीतून बाहेर पडतो त्या वेळी त्यातील कार्बन डायॉक्साइडचे प्रमाण लक्षणीय घटते. पेटंट नोंदणीसाठी अर्ज करण्यात आल्यामुळे उत्पादनाची कार्यप्रणाली कळू शकली नाही.
उपकरणासाठी वापरलेले साहित्य:फिल्टर्स, पाइप, धातुचे तुकडे, भांडी घासण्यासाठी वापरण्यात येणारा धातुचा स्क्रब
उत्पादन खर्च: ३,५०० रुपये
कालावधी : आठ महिने
उपयोग कुठे : अवजड वाहने, बॉयलर्सच्या धुरातून बाहेर पडणा-या कार्बन डायॉक्साइड वायूचे निर्मूलन.