आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दलालीने बिघडली भाज्यांची चव, दरात कमालीची तफावत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद - कृषी उत्पन्न बाजार समितीमधून निघालेला भाज्यांचा दर आणि त्याची किरकोळ विक्री यामध्ये कमालीची तफावत दिसून येत आहे. बाजार समिती आणि व्यापा-यांच्या संगनमताने एकीकडे शेतक-यांची लूट होत असताना दुसरीकडे व्यापा-यांकडून शहरातील ग्राहकांचा खिसा कापण्याचा प्रकार होत आहे. विशेष म्हणजे या प्रकारावर कुणाचेच नियंत्रण नसल्याने भाववाढीची ओरड केली जात आहे.


उस्मानाबादच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी कोथिंबिरीची 1 ते 2 हजार रुपये प्रतिशेकडा दराने विक्री झाली. रविवारी वटसावित्री पौर्णिमेचा सण होता. या सणामुळे बाजारात कोथिंबिरीला मोठी मागणी होती. किरकोळ बाजारात कोथिंबीर 30 ते 40 रुपयाला जुडी या दराने विकली गेली. उस्मानाबाद जिल्ह्यात भीषण दुष्काळ असल्याने सर्रास शेजारच्या जिल्ह्यांतून भाज्यांची आवक होत आहे. शेतक-यांनी जोपासलेल्या भाज्यांना काही प्रमाणात समाधानकारक दर मिळत असला तरी त्यांच्याक डून खरेदी केलेल्या आणि किरकोळ बाजारात विक्री होत असलेल्या भाज्यांमध्ये कमालीची तफावत दिसून येत आहे. हे चित्र सार्वत्रिक आणि सवयीचे झालेले असले तरी त्यातून शेतक-यांसह ग्राहकांची मोठी पिळवणूक होत असताना यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मालाला समाधानकारक दर मिळत नसल्याने शेतक-यांमध्ये नैराश्येचे वातावरण आहे. ‘काही प्रमाणात भाजीपाला किंवा शेतमालाचे दर वाढले की सर्वत्र ओरड होते, मात्र खर्च वजा करून शेतक-यांच्या हातात मालाचे किती पैसे पडतात, याचा कुणीही विचार करीत नाही,’ असे भानसगाव येथील शेतकरी हनुमंत पाटील म्हणाले. अवघ्या काही तासांत याच मालावर दुपटीने पैसे कमावतात. व्यापा-यांच्या मनमानीपणामुळे भाज्यांसह धान्याच्या दरातील तफावत वाढतच आहे.


बंधन नाहीच
शेतमालाच्या दरावर कुठल्याही यंत्रणेचे नियंत्रण नाही. त्यामुळे विचित्र स्थिती निर्माण होत आहे. बाजार समितीमध्ये किंवा बाजारात विक्रीसाठी आलेल्या शेतक-यांच्या भाजीपाल्यावर व्यापारी तुटून पडतात. मालाची कवडीमोल किंमत केली जाते. हीन दर्जाचा माल असल्याची सबब सांगितली जाते. मात्र, शेतक-यांकडून एकदा ताब्यात घेतलेला माल अवघ्या काही मिनिटांत ‘नंबर वन’दर्जाचा ठरतो. शेतक-यांच्या डोळ्यांसमोर याच मालाला ग्राहक दुपटीने पैसे मोजतात.


शेतक-यांच्या मालावर व्यापारी गब्बर
चौकामध्ये थांबलेल्या किंवा किरकोळ बाजारात विक्रीसाठी बसलेल्या व्यापा-याकडे भाजीचे दर ऐकल्यानंतर ग्राहकांच्या भुवया उंचावतात. दुष्काळामुळे बाहेरून भाज्या येतात. त्यामुळे दर वाढल्याचे व्यापारी सांगतात. वांगे, गवार, दोडके यापैकी कोणत्याही भाज्यांची विक्री 15 ते 20 रुपये पावकिलो दराने होत आहे. या भाज्यांचा ठोक दर मात्र 10 ते 15 रुपये प्रतिकिलो आहे. दुपटीपेक्षा अधिक दर वाढवून महागाईचा डोंगर उभा करणारे व्यापारी शेतकरी आणि ग्राहकांच्या पैशावर गब्बर होत आहेत.


असे आहे चित्र
रविवारी उस्मानाबादच्या कृषी उत्पन्न बाजार सामितीमध्ये वांगे 8 ते 25 रुपये, कोथिंबीर 10 ते 20 रुपये, चुका 3 ते 5 रुपये, काकडी 13 ते 20 रुपये, टोमॅटो 17 ते 40 रुपये, 14 रुपये ने लिलावात खरेदी केलेली गवार व्यापारी 15 रुपये पावकिलो दराने विक्री करीत होते.किरकोळ बाजारात कोथिंबिरीचा दर 30 रुपयांपासून होता. 14 रुपये किलो दराने लिलावात खरेदी केलेली गवार व्यापारी 15 रुपये पावकिलो दराने विक्री करीत होते.


हे तर कत्तलखाने
सध्याची यंत्रणा कुचकामी असून शेतकरी, ग्राहकांचे खिसे कापण्याचे प्रकार होत आहेत. बाजार समित्या हे शेतक-यांचे कत्तलखाने आहेत. त्यामुळे ग्राहक आणि उत्पादकांची थेट भेट व्हावी. शेतक-यांनी मालाची थेट विक्री करावी. अ‍ॅड. नेताजी गरड, जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना,