आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहन विक्रीची गाडी वेग घेईना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - वाढते व्याजदर, कच्च्या मालाच्या वाढत्या किमती व वाढता उत्पादन खर्च तसेच इंधनाच्या किमतीतील चढ - उतार यामुळे ऑटोमोबाइल क्षेत्रात मरगळीचे वातावरण आहे. त्यातच गेल्या काही महिन्यांपासून विक्रीची गाडीही रुळावरून घसरली आहे. मेमध्येही यापेक्षा वेगळे चित्र नाही. मारुती, टीव्हीएस, टोयोटा, महिंद्रा अँड महिंद्रा, फोर्ड यासारख्या दिग्गज कंपन्यांना विक्रीतील घटीचा फटका बसला.


‘मारुती’च्या विक्रीत 14 टक्के घट
देशातील सर्वात मोठी कार निर्माती मारुती-सुझुकीच्या मेमधील कार विक्रीत 14.4 टक्के घट झाली. गेल्या वर्षी मेमध्ये कंपनीने 98,884 कारची विक्री केली होती यंदाच्या मेमध्ये 84,677 कारची विक्री झाली. कंपनीच्या मिनी सेगमेंट कारच्या विक्रीत 5.1 टक्के वाढ नोंदवण्यात आली. या सेगमेंटमध्ये एम 800, ए-स्टार , अल्टो आणि वॅगन -आर या कारचा समावेश आहे. कॉम्पॅक्ट सेगमेंट (यात इस्टिलो, स्विफ्ट आणि रिटझ मॉडेल्स येतात ) कारच्या विक्रीत 29.4 घट झाली. तर युटिलिटी व्हेइकल्सच्या विक्रीत 44.3 टक्के घट झाली.


ह्युंदाईच्या विक्रीत वाढ : ह्युंदाई मोटार इंडिया लिमिटेड कंपनीच्या मेमधील विक्रीत 2.1 टक्के वाढ झाली. गेल्या वर्षी कंपनीने 55,669 कारची विक्री केली होती. यंदाच्या मेमध्ये 56,856 कारची विक्री झाली. बाजारपेठेतील स्थिती आव्हानात्मक असल्याचे मत कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष (मार्केटिंग) राकेश श्रीवास्तव यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, आव्हानात्मक परिस्थितीत कंपनीने चांगली विक्री केली. एवढेच नव्हे तर बाजारातील हिस्सा वाढवला. पेट्रोल कारची वाढती मागणी लक्षात घेता आगामी काळात कंपनीची स्थिती आणखी सुधारण्याची शक्यता आहे.


टीव्हीएस मोटर्सच्या विक्रीत घट : दुचाकी व तिचाकी वाहन निर्माती टीव्हीएस मोटार कंपनीच्या मेमधील विक्रीत 6.17 टक्के घट झाली आहे. यंदा कंपनीने 1,65,151 वाहनांची विक्री केली. गेल्या वर्षी मेमध्ये कंपनीने 1,76,012 वाहनांची विक्री केली होती. कंपनीच्या दुचाकी वाहन विक्रीत 8 टक्के घट, तर तीन चाकी वाहनांच्या विक्रीत 98.8 टक्के वाढ झाली.


टोयोटा-किर्लोस्करची विक्री घटली : यंदाच्या मेमध्ये टोयोटा-किर्लोस्कर कंपनीच्या विक्रीत 35.33 टक्के घसरण दिसून आली. गेल्या वर्षी मेमध्ये कंपनीने 15,501 वाहनांची विक्री केली होती. यंदा कंपनीने 10,023 वाहनांची विक्री केली. कंपनीचे उपकार्यकारी संचालक (मार्केटिंग) संदीप सिंग म्हणाले, बाजारपेठेत सध्या मंदीचे वातावरण आहे.


जनरल मोटर्सच्या विक्रीत मोठी वाढ: जनरल मोटर्सच्या विक्रीत मेमध्ये 40 टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षी कंपनीने 6,079 वाहनांची विक्री केली होती. यंदा कंपनीने 8,500 वाहनांची विक्री केली.
कंपनीचे उपाध्यक्ष पी. बालेंद्र यांनी या विक्रीवाढीचे श्रेय शेव्हरले सेल आणि एन्जॉय या गाड्यांना दिले. विक्रीत सुधारणा होण्याची शक्यता कमी असल्याचे कंपनीने म्हटले आहे.


महिंद्राला विक्री घटीचा झटका
ऑटो क्षेत्रातील आघाडीची कंपनी महिंद्रा अँड महिंद्राला मेमधील विक्रीत 1.2 टक्का घट आल्याने पुन्हा झटका बसला. गेल्या वर्षीच्या मेमध्ये कंपनीने 43,989 वाहनांची विक्री केली होती. यंदाच्या मेमध्ये कंपनीने 43,460 वाहनांची विक्री केली. कंपनीच्या प्रवासी वाहन विक्रीत 5.15 टक्के वाढ नोंदवण्यात आली. या सेगमेंटमध्ये स्कॉर्पिओ, एक्सयूव्ही 500, झायलो, बोलेरो आणि व्हेरिटो यांचा समावेश आहे. आव्हानात्मक परिस्थितीतही कंपनीने देशातील विक्रीत पाच टक्क्यांची वाढ नोंदवली असल्याचे मत कंपनीचे चीफ एक्झिक्युटिव्ह (ऑटोमोटिव्ह) प्रवीण शहा यांनी व्यक्त केले. आगामी काळात कंपनी चांगली कामगिरी करेल आणि नव्या गाड्या बाजारात येतील, असेही ते म्हणाले.