आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vehicle Selling Increases By 15.37 Percent In August

वाहन विक्रीची गाडी सुसाट, ऑगस्टमध्ये कार विक्रीत 15.37 टक्के वाढ

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाहन विक्रीची गाडी सुसाट
ऑगस्टमध्ये कार विक्रीत 15.37 टक्के वाढ, दुचाकी विक्रीची धूम
प्रतिनिधी । मुंबई
गेल्या नऊ महिन्यांपासून वाहन बाजाराला लागलेल्या उतरत्या कळेला अखेर ब्रेक लागला आहे. ऑगस्ट महिन्यात मोटारींची विक्री जवळपास 15.37 टक्क्यांनी वाढून ती अगोदरच्या वर्षातल्या याच महिन्यातील 1, 15,705 मोटारींवरून 1,33,486 मोटारींवर गेली आहे.
विक्रीमुळे वाहन बाजारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असले तरी गेल्या वर्षात मारुतीच्या मानेसार प्रकल्पात महिनाभर झालेल्या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर ‘लो बेस इफेक्ट’मध्येही वाढ झालेली असल्याचे मत ‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स ’ (सियाम) या संस्थेने व्यक्त केले आहे.
बाजारातील सध्याच्या वातावरणाचा अंदाज घेता मोटार विक्रीत वाढ झाल्याचे आढळून येत नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत मारुती सुझुकीच्या विक्रीत झालेल्या वाढीचा हा परिणाम आहे. परंतु वाहन बाजारातील कठीण परिस्थिती अद्यापही कायम आहे. चढे व्याजदर आणि आता इंधनांच्या भडकलेल्या किमती त्यामुळे ग्राहकांची खरेदीची मानसिकता कमी असल्याकडे ‘सियाम’चे उप महासंचालक सुगातो सेन यांनी लक्ष वेधले.
ऑगस्टमध्ये वाहन विक्रीत झालेली सकारात्मक वाढ सप्टेंबरमध्ये कायम राहण्याची शक्यता कमी आहे. वाहन बाजारपेठेतील सुधारणा केवळ पुढील काही तिमाहीनंतर बघायला मिळू शकेल, असेही ते म्हणाले.
यंदाच्या आर्थिक वर्षात मोटारींच्या विक्रीत नकारात्मक वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षातील 2.7 दशलक्ष मोटारींच्या विक्रीचा टप्पा गाठण्यासाठी यंदा प्रत्येक महिन्यात दोन लाखांपेक्षा जास्त मोटारींची विक्री करणे जरुरीचे आहे; परंतु गेल्या तीन महिन्यांमध्ये त्यापेक्षा कमी मोटारींचीदेखील विक्री झालेली नाही.
मारुती सुझुकीची हनुमान उडी
मारुती सुझुकीच्या मोटार विक्रीत दुपटीने वाढ होऊन ती मागील वर्षातल्या 31 हजार 653 मोटारींवरून 63,499 मोटारींवर गेली आहे. मारुती सुझुकीच्या एका वरिष्ठ अधिका-याच्या हत्येनंतर कंपनीच्या मानेसार प्रकल्पात हिंसक वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे गेल्या वर्षी संपूर्ण ऑगस्ट महिन्यात या प्रकल्पात टाळेबंदीमुळे काम बंद झाले होते.
दुचाकींचा वेग सुसाट
दुचाकी वाहनांनी विक्रीचा सुसाट वेग कायम ठेवत 6.68 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. अगोदरच्या वर्षातील 10 लाख 57 हजार 925 वाहनांवरून ही विक्री यंदाच्या ऑगस्ट महिन्यात 11 लाख 28 हजार 598 वाहनांवर गेली आहे. स्कूटर्स विक्रीत 21.43 टक्क्यांनी वाढ होऊन ती 2 लाख 33 हजार 180 दुचाकींवरून 2 लाख 83 हजार 142 वाहनांवर गेली आहे.
मोटारसायकलींची धूम
सियामच्या आकडेवारीनुसार देशातील मोटारसायकलींची विक्री 3.82 टक्क्यांनी वाढून ती अगोदरच्या वर्षातल्या 7,66,127 वरून 7,95,378 मोटारसायकलींवर गेली आहे. दुचाकींच्या विक्रीची धूम बघायला मिळत असली तरी बजाज ऑटोच्या विक्रीत लक्षणीय 22.6 टक्के घसरण तर हीरो मोटोकॉर्पच्या विक्रीत 1.61 टक्के तर होंडाच्या विक्रीत 48 टक्के वाढ झाली आहे.
वाढ होऊन ती अगोदरच्या 1,95,093 मोटारसायकलींवरून 1,50,989 मोटारसायकलींवर आली आहे. त्या उलट हीरो मोटोकॉर्पच्या विक्रीत 1.61 टक्क्यांनी वाढ होऊन ती 3,88,903 मोटारसायकलींवरून 3,95,180 मोटारसायकलींवर गेली आहे. होंडा मोटारसायल अँड स्कूटर इंडियाच्या विक्रीत 48.68 टक्क्यांनी जबरदस्त वाढ होऊन ती 96,876 मोटारसायकलींवरून 1,44,039 मोटारसायकलींवर गेली आहे.
व्यावसायिक वाहन विक्री घटली
मध्यम आणि अवजड व्यावसायिक वाहनांची विक्री सलग अठराव्या महिन्यात घटली असल्याचे सेन यांनी सांगितले. या महिन्यात या गटातील वाहनांची विक्री 38.24 टक्क्क्यांनी घसरून ती 15,468 वाहनांवर आली आहे. व्यावसायिक वाहनांची एकूण विक्री 23.11 टक्क्यांनी घसरली आहे.