आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाहनाचे स्टि अरिंग मंदीबाईच्या हाती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - गेल्या दोन महिन्यांपासून बाजारातील वाहनांची मागणी घटल्याने एरवी तेजीत असणारी ऑटोमोबाइल इंडस्ट्री काही पावले मागे सरकली आहे. टाटा मोटर्स कंपनी, महिंद्रा व्हेइकल्स या बड्या उत्पादकांनी गेल्या काही दिवसांत शटडाऊन, ब्लॉक क्लोजर जाहीर करून उत्पादनाला कात्री लावली आहे.

वाहनांच्या बाजारपेठेत गेले काही दिवस मंदीचे चित्र आहे. दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे वाहन उत्पादक कंपन्यांनी गेल्या तीन आठवड्यांपासून आपल्या प्रमुख प्रॉडक्ट प्लांटमध्ये सहा दिवस, पाच दिवस अशा कालावधीचे शटडाऊन, ब्लॉक क्लोजर जाहीर केले आहेत. खर्च वाचवण्यासाठी ही उपाययोजना केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या मोठय़ा उत्पादकांवर पूर्णपणे अवलंबून असणारे छोटे, पूरक व्यावसायिक तसेच लघुउद्योजक मात्र संकटात सापडले आहेत.

नुकताच टाटा मोटर्स कंपनीने पिंपरी-चिंचवडमधील कार प्रकल्पात सहा दिवसांचा ब्लॉक क्लोजर जाहीर केला. महिंद्रा व्हेइकल्सने चाकण येथील उत्पादन प्रकल्पात शटडाऊन जाहीर केले आहे. बजाज ऑटोमध्ये कामगारांच्या आंदोलनामुळे काम बंद आहे. काही ठिकाणी कंपनीतील कायम कामगारांना सहा दिवसांची पगारी सुटी घेण्यास सांगण्यात आले. टाटामध्ये हे प्रमाण अडीच दिवस असे आहे. वाहननिर्मिती क्षेत्रातील मोठे उत्पादक थोडे दिवस उत्पादन बंद ठेवून सहज राहू शकतात, पण त्यांच्यावर अवलंबून असणारे अनेक छोटे उद्योग यामुळे हवालदिल झाले आहेत. या कंपन्यांना पूरक सेवा पुरवणारे, माल देणारे लघुउद्योजक संकटग्रस्त झाले आहेत.


लघुउद्योगांवर 20 टक्के परिणाम
मोठय़ा कंपन्यांनी शटडाऊन, ब्लॉक क्लोजर जाहीर केले की, त्यांच्यावर अवलंबून असणार्‍या पूरक व्यवसायांवर त्याचा प्रतिकूल परिणाम होणे अपरिहार्यच असते. तसा तो काही प्रमाणात झाला आहेच. विशेषत: पिंपरी-चिंचवड, भोसरी, चाकण या परिसरात अशी पूरक सेवा, उत्पादने पुरवणार्‍या युनिट्सची संख्या सुमारे सात हजार इतकी आहे. मोठय़ा उत्पादन कंपन्यांना सेवा देणार्‍या पुरवठादारांची साखळी असते. टीअर 1, टीअर 2 अशी त्यांची श्रेणी असते. गेल्या तीन-चार आठवड्यांपासून मोठय़ा कंपन्यांमध्ये चाललेल्या घडामोडींचा थेट परिणाम सुमारे 20 टक्के छोट्या व्यावसायिकांवर झाला आहे. मात्र तीन वर्षांपूर्वी आलेल्या मंदीपासून धडा घेत हे व्यावसायिक आता एकाच मोठय़ा कंपनीवर अवलंबून राहत नाहीत. त्यामुळे असे धक्के सोसण्याची त्यांची काही प्रमाणात क्षमता असते. अनंत सरदेशमुख, महासंचालक, मराठा चेंबर ऑफ कॉर्मस अँड अँग्रिकल्चरल इंडस्ट्रीज.

मंदीच्या काळात उत्पादन बंदीची तरतूद
कंपनी व्यवस्थापन आणि कामगार यांच्यातील करारानुसार मंदीच्या काळात उत्पादन बंद ठेवण्याची तरतूद आहे. त्यानुसारच उत्पादन काही काळ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे वाहननिर्मिती क्षेत्रातील संबंधित कंपनीतील सूत्रांनी स्पष्ट केले. मागणी नसताना उत्पादन बंद ठेवून त्यासाठीचा खर्च वाचवणे हेच धोरण यामागे आहे. मात्र, ही अवस्था किती दिवस टिकेल यावर भाष्य करण्यास त्यांनी असर्मथता दर्शवली.