आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Venugopal Dhoot Artical In Supebikes Production In India

सुपरबाइक्सचे उत्पादन केंद्र भारतात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टाटांच्या नॅनोपाठोपाठ जागतिक मोटार कंपन्यांच्या छोट्या मोटारींचे उत्पादन केंद्र भारतामध्ये तयार झाले. लक्झरी मोटारीही भारतातच तयार कराव्यात या दिशेने नामवंत कंपन्यांच्या हालचाली सुरू झाल्या असतानाच आणखी एक उत्पादन केंद्र भारतीय भूमीवर अवतरते आहे, ते म्हणजे सुपरबाइक्सचे. मुळात स्कूटर चालवणा-यांचा देश म्हणून ओळखल्या जाणा-या भारतात बाइकची ओळख रॉयल एन्फील्ड आणि होंडा यासारख्या कंपन्यांनी करून दिली; पण आता भारतीय बाइकर्सनी आपली इयत्ता ओलांडत 600 ते 1000 सीसीपर्यंतच्या सुपरबाइक्ससाठी धडाकेबाज मागणी नोंदवल्यामुळे सुपर बाइक्सचे उत्पादन भारतातच करण्यासाठी जागतिक स्तरावरच्या कंपन्यांमध्ये स्पर्धा वाढली आहे. परिणामी, भारत ऑटो प्रॉडक्शन हब होण्याच्या मार्गावर आहे.
2012 मध्ये 1 लाख 12 हजार सुपरबाइक्स भारतात विकल्या गेल्या. त्यामध्ये 50 टक्क्यांनी वाढ होऊन हा आकडा या वर्षी 1 लाख 67 हजारांवर जाईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
गेल्या काही वर्षांत ट्रम्प, हार्ले यासारख्या सुपरबाइक्स भारतातील रस्त्यांवरून धावायला लागल्यानंतर तरुणांमध्ये अशा सुपरबाइक्स विकत घेण्याची चढाओढच लागली आहे. स्कूटर महिलांसाठी आणि बाइक पुरुषांसाठी, अशी एक सोपी विभागणी भारतात अनेक वर्षे झालेली होती. आता तरुणांच्या बरोबरीने तरुणीही सहजपणे बाइकवर स्वार होताना दिसतात. एवढेच नव्हे, तर त्यांच्यातही सुपरबाइक्स चालवण्याची ईर्षा आणि उत्साह निर्माण झाला आहे. आता तर देशातील तरुणवर्ग मोठ्या पगाराच्या नोक-या करणा-यांचा किंवा स्वत:चे उद्योग-व्यवसाय करणा-यांचा आहे. स्वाभाविकच सुपरबाइकवर 8-10 लाख रुपये खर्च करण्यात त्यांना अडचण तर वाटतच नाही, उलट अभिमानच वाटतो.
2012 मध्ये 1 लाख 12 हजार सुपरबाइक्स भारतात विकल्या गेल्या. त्यामध्ये 50 टक्क्यांनी वाढ होऊन हा आकडा या वर्षी 1 लाख 67 हजारांवर जाईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. सन 2022 पर्यंत ही मागणी दरवर्षी 7 लाखांच्या वर पोहोचलेली असेल, असे त्यांचे म्हणणे आहे. मध्यंतरी रुपयाचे मोठ्या प्रमाणात अवमूल्यन झाल्यामुळे बाजारपेठेतील सुपरबाइक्सची किंमत एकदम वाढली. त्याचा परिणाम अर्थातच विक्री घटण्यात झाला. रुपया सुधारेल आणि विक्री वाढेल यासाठी वाट बघत न बसता जागतिक कंपन्यांनी आपली उत्पादन केंद्रेच भारतात सुरू करण्याचे ठरवले आहे. यामध्ये सुपरबाइकची जुळणी आणि सर्व सुट्या भागांचे उत्पादन अशा दोन्ही गोष्टींचा समावेश टप्प्याटप्प्याने होणार आहे. सुटे भाग परदेशातून आणून सुपरबाइकची जुळणी भारतात केली, तर आयात कर 30 टक्क्यांनी कमी होतो. साहजिकच जुळणी केलेल्या सुपरबाइक्सची किंमतही त्या प्रमाणात कमी होईल आणि विक्री वाढेल. संपूर्ण उत्पादन भारतातच केले, तर या किमती आणखी खाली येऊ शकतात. शिवाय लाखो लोकांना रोजगार मिळेल, तो वेगळाच.
स्पोर्टस बाइक विभागामध्ये 250 सीसीच्या बाइक्सना भारतात सर्वाधिक मागणी आहे. बजाज ऑटो, आपली ऑस्ट्रेलियन उपकंपनी केटीएम यांच्या सहकार्याने, सध्या सर्वाधिक 250 सीसी स्पोर्टस बाइक विकत आहे. त्याबरोबर इतरही मोठ्या जागतिक कंपन्या या क्षेत्रातील उत्पादनात उतरत आहेत. ट्रम्प या ब्रिटिश कंपनीने 250 सीसी सुपरबाइक्सचे उत्पादन आपल्या बेंगळुरूच्या उत्पादन केंद्रातून सुरू करण्याचे ठरवले आहे. त्याची जुळणी सुरू असून दोन वर्षांत म्हणजे 2015 मध्ये या सुपरबाइक्स रस्त्यावर धावतील. ट्रम्पची स्पर्धक असलेल्या हार्ले या अमेरिकन कंपनीनेही या क्षेत्रात पदार्पण करायचे ठरवले आहे. पाठोपाठ बीएमडब्ल्यू ही मोटार उत्पादन क्षेत्रातील नामवंत कंपनी चेन्नईमध्ये आपले उत्पादन केंद्र सुरू करत आहे. चेन्नईची टीव्हीएस मोटार कंपनी बीएमडब्ल्यूसाठी हे उत्पादन केंद्र उभे करत आहे.
आशियामध्ये सुपरबाइक्सची बाजारपेठ गेल्या वर्षभरात 20 टक्क्यांनी वाढली आहे. एक हजार सीसी आणि 10 ते 15 लाख किंमत असलेल्या या सुपरबाइक्स आहेत. हार्ले-डेव्हिडसन आता 750 सीसी आणि 500 सीसी क्षमतेच्या सुपरबाइक्सचे उत्पादन करण्याच्या तयारीत आहेत. त्यांची किंमत किमान 7 लाखांच्या जवळपास असेल. 250 सीसीबरोबरच 500 ते 1000 सीसी या सर्व सुपरबाइक्सही सुरुवातीला भारतात जुळणी करून विकण्याचा त्यांचा इरादा आहे. त्याला पुरेसे यश मिळाल्यानंतर संपूर्ण उत्पादन भारतातच करण्याची तयारी सुरू होईल. ट्रम्पच्या भारतात विकल्या जाणा-या 10 पैकी 6 बाइक्सची जुळणी आजही भारतातच केली जात आहे. त्यांच्या मनेसर येथील उत्पादन केंद्रात हे काम सध्या केले जात आहे. हर्ले-डेव्हिडसन ही कंपनीही हरियाणात असलेल्या त्यांच्या जुळणी केंद्राचे रूपांतर संपूर्ण उत्पादन केंद्रात करण्याच्या तयारीला लागली आहे.
दरम्यान, हीरो कंपनीने आपल्या इबीआर या उपकंपनीच्या सहकार्याने भारतात 250 सीसी सुपरबाइक्सचे उत्पादन करण्याचे ठरवले आहे. त्याबरोबरच सीबीआर या कंपनीची स्वत:ची वेगळी मॉडेल्स आहेत, तीही होंडाच्या सहकार्याने भारतात येतील, अशी शक्यता आहे.
भारत स्कूटर्स व बाइक्सचे सर्वात मोठे उत्पादन केंद्र म्हणून पुढे येतो आहे :
भारतातील स्कूटर आणि बाइकची बाजारपेठ आजच 1 कोटी 60 लाखापर्यंत पोचली आहे. येणा-या 10 वर्षांच्या काळात ही मागणी 7 ते 8 कोटींवर पोहोचेल, अशी शक्यता आहे. त्यामुळे नव्या ग्राहकांना अधिक चांगली बाइक पुरवण्यासाठी जागतिक कंपन्यांत तीव्र स्पर्धा सुरू झाली आहे. 100 टक्के आयात कर द्यावा लागू नये, म्हणून या कंपन्या भारतात जुळणी केंद्र आणि संपूर्ण उत्पादन केंद्र उभारण्याच्या मागे आहेत. यामुळे भारत स्कूटर्स व बाइक्सचे सर्वांत मोठे उत्पादन केंद्र म्हणून पुढे येतो आहे. या सर्व कंपन्यांचे लक्ष भारताबरोबरच आफ्रो-आशियाई आणि लॅटिन अमेरिकन देशांकडे आहे. त्यामुळे छोट्या मोटारींपाठोपाठ भारत सर्वाधिक बाइक्स लवकरच निर्यात करू लागेल, अशी शक्यता आहे. या सर्व घडामोडींमुळे भारतीय अर्थकारणाला मोठा वेग येणार आहे. उत्पादन केंद्र आणि निर्यात यामधून रोजगारनिर्मिती तर होईलच, पण वाहतूक व्यवस्था पुरवणारे अत्याधुनिक लॉजिस्टिक उद्योगही मोठ्या प्रमाणात उभे राहतील आणि देशातल्या सर्व बंदरांतील चलनवलनही वाढेल.
(लेखक व्हिडिओकॉन उद्योगसमूहाचे अध्यक्ष आहेत.)