आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत 30 टक्के उद्योजक महिला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अर्थव्यवस्था सेवाक्षेत्राभोवती फिरू लागल्याने महिलांच्या छोट्या-मोठ्या उद्योग व्यवसायांचा समावेश असलेले सेवाक्षेत्रही विस्तारले नुकत्याच झालेल्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला उद्योजकतेची चर्चा सर्वदूर सुरू झाली आहे आणि ते स्वाभाविकही आहे. जागतिकीकरणाच्या आव्हानांना सामोरे जात असताना समाजाच्या विविध थरांतून उद्योजक तयार व्हायला हवेत, तसेच ते अर्धी लोकसंख्या असलेल्या महिलांमधूनही पुढे यायला हवेत. महिला दिनाच्या निमित्ताने चेंबर ऑफ कॉमर्स, रोटरीसह अनेक संस्थांनी राज्यभरात शंभरहून अधिक महिला उद्योजकांचा सन्मान केला, हे या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.

उद्योगविस्तारात नवे युनिट उभारण्याची जबाबदारी क्वचितच महिलांवर टाकली जाई भारतात आर्थिक उदारीकरण आणि जागतिकीकरण सुरू होईपर्यंत स्वतंत्र महिला उद्योजिकांची संख्या अगदीच कमी होती. आपल्याकडचे बहुसंख्य उद्योग ‘कुटुंबाचे’ असल्यामुळे काही महिलांचा समावेश संचालक मंडळात होत असे.

पण उद्योगाच्या विस्तारात एखादे नवे युनिट उभारण्याची जबाबदारी क्वचितच महिलांवर टाकली जात असे. जागतिकीकरणानंतर उद्योगक्षेत्राचा चेहरामोहराच पूर्णपणे बदलून गेला. अर्थव्यवस्था केवळ शेती आणि उत्पादन या दोनच घटकांभोवती न फिरता सेवाक्षेत्राची मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यामध्ये महिलांनी सुरू केलेल्या छोट्या-मोठ्या उद्योग व्यवसायांचा वाटा मोठा आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

भारतातील ‘जागृती यात्रा’ आणि ‘नॅस्कॉम’ या दोन संस्थांचा समावेश
महिला उद्योजक घडविण्यासाठी ‘गुगल सर्च इंजिन’ने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये महिला उद्योजक मोठ्या प्रमाणात तयार व्हाव्यात, यासाठी जगभरातल्या 40 संस्थांना गुगल 6 कोटी रु.देणार आहे. त्यामध्ये भारतातील ‘जागृती यात्रा’ आणि ‘नॅस्कॉम’ या दोन संस्थांचा समावेश आहे. या दोन्ही संस्था विविध क्षेत्रांमध्ये स्टार्ट अप कंपन्या उभ्या राहाव्यात, यासाठी विशेष मदत करतात.

‘नॅस्कॉम’चे 10 हजार स्टार्ट अप कंपन्या उभ्या करण्याचे उद्दिष्ट
‘नॅस्कॉम’चे तर 10 हजार स्टार्ट अप कंपन्या उभ्या करण्याचे उद्दिष्ट आहे. या दोन्ही कंपन्यांच्या कार्यक्रमांतून अधिकाधिक महिला उद्योजक तंत्रज्ञानक्षेत्रात उभ्या राहाव्यात, म्हणून ‘गुगल’ने ही मदत देऊ केली आहे. आपली भूमिका मांडताना ‘गुगल’ने दिलेली माहिती महत्त्वाची आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार अमेरिकेत 30 टक्के महिला उद्योजक आहेत. त्यांनी 78 लाख लोकांना रोजगार मिळवून दिला आहे. या महिलांचे वैशिष्ट्य हे, की त्या कमीत कमी भांडवलात उद्योग उभारतात, पण तुलनेने अधिक रोजगार निर्माण करतात. या महिला उद्योजकांचा तंत्रज्ञानक्षेत्रातील वाटाही 12 टक्क्यांहून अधिक आहे.

‘गुगल’ने तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये महिला उद्योजकता तयार होण्यावर दिला भर ‘गुगल’ने तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये महिला उद्योजकता तयार होण्यावर भर दिला, हे स्वाभाविक आहे. कारण विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधन या क्षेत्रात जगभर महिलाच पुढे आहेत. प्रश्न आहे तो केलेल्या संशोधनाचे रूपांतर उपयुक्त उत्पादनामध्ये करण्याचा. यासाठी आवश्यक असलेले मार्गदर्शन आणि व्हेंचर कॅपिटल महिलांना सहजपणे उपलब्ध होत नव्हते. आता सरकारसह बँका, वित्तसंस्था आणि व्हेंचर कॅपिटल कंपन्या यांचा दृष्टिकोन बदलला आहे. बँकांचे नेतृत्व हळूहळू पण निश्चितपणे कर्तृत्ववान महिलांकडे गेले आहे. म्हणूनच उद्योगक्षेत्रातही महिलांनी समर्थपणे उभे राहावे, यासाठी बँका नव्या नव्या योजना घेऊन समोर येत आहेत आणि त्यांना प्रतिसादही उत्तम मिळतो आहे.

हिना कौसर यांची 153 शाखांची मारुती ड्रायव्हिंग स्कूल, शाखा 500 वर नेण्याचे उद्दिष्ट
उद्योजकतेच्या क्षेत्रातील खास पुरुषांची म्हणून समजली जाणारी क्षेत्रेही महिलांनी पादाक्रांत करण्यास सुरुवात केली आहे. मोटार ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण देणार्‍या संस्था प्रामुख्याने पुरुषच चालवित असत. पण मोटार ड्रायव्हिंग शिकणार्‍या महिलांची सतत वाढती संख्या पाहून, हे चित्र बदलले आहे. दिल्लीची ‘मारुती ड्रायव्हिंग स्कूल’ ही संस्था हिना कौसर चालवतात. त्यांच्या शाखा 153 शहरांत आहेत. पुढच्या 5 वर्षांत त्या 500 वर नेण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. बहुसंख्य महिला प्रशिक्षक इथे आहेतच, पण मागास आणि अल्पसंख्य महिलांवरही त्यांचे विशेष लक्ष आहे. सुनीता धर या मारुती सुझुकीसाठी ‘रेड-डे हिमालया’ या नावाचा कार स्पोर्ट्स इव्हेंट आयोजित करतात. शिल्पी कपूर यांनी तर ‘बॅरियर ब्रेक’ म्हणजे ‘उद्योजकतेतील बंधने तोडा’ अशी संस्थाच सुरू केली आहे. याचा अर्थ एवढाच की महिलांना उद्योजकतेसाठी हजारो क्षेत्रे खुणावत आहेत. ही संधी त्यांनी घ्यावी म्हणून अनुकूलता फक्त हवी.(लेखक व्हिडिओकॉन उद्योगसमूहाचे चेअरमन आहेत)