आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Venugopal Dhoot Article About Indian Economy, Divya Marathi

भांडवलाचे अर्थचक्र धावण्यासाठी ‘स्टार्ट अप नेशन’चे नवे फंडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय उद्योगक्षेत्राची वाटचाल आता स्टार्ट अप नेशन होण्याच्या दिशेने चालू झाली आहे, ही एक क्रांतिकारक घटना आहे. साचेबंद, पारंपरिक उद्योग व्यवसायांच्या मागे न लागता विविध क्षेत्रातल्या नावीन्यपूर्ण संकल्पनांकडे तरुण उद्योजकांचा ओढा आहे. त्यामुळे दरवर्षी देशभरात हजारो स्टार्ट अप कंपन्या उभ्या राहत आहेत. स्टार्ट अप कंपन्यांसाठी देशात योग्य वातावरण तयार झाले आहे, हे लक्षात घेऊन शेकडो अनिवासी भारतीय भारतात परतून स्टार्ट अप कंपन्या उभ्या करताना दिसत आहेत. स्टार्ट अप कंपन्यांच्या या चळवळीला मोठे बळ दिले आहे, ते अमेरिकेतून आलेल्या आणि भारतात नव्याने सुरू झालेल्या व्हेंचर कॅपिटल कंपन्यांमुळे, पण तरीही हजारो कंपन्यांना अजूनही पाहिजे तसे भांडवल उपलब्ध होत नसल्यामुळे भांडवलाच्या नव्या पर्यायांचा विचार होताना दिसतो आहे.

व्हेंचर कॅपिटल किंवा रिस्क कॅपिटल कंपन्या स्टार्ट अप कंपन्यांना उदारहस्ते भांडवल आणि मार्गदर्शन द्यायला तयार असतात, पण त्यासाठी स्टार्ट अप कंपनीतील इक्विटीचा म्हणजे शेअर्सचा मोठा भाग व्हेंचर कॅपिटल कंपन्यांना द्यावा लागतो :
स्टार्ट अप कंपनी सुरू करताना उद्योजक थोडे भांडवल बरोबर आणतोच, पण उद्योग संकल्पना जेवढी मोठी आणि महत्त्वाकांक्षी असेल, तेवढ्या अधिक भांडवलाची गरज उद्योजकाला भासत असते. बँकांकडे किंवा वित्तसंस्थांकडे भांडवलासाठी उद्योजक गेला, तर त्याला कोलॅटरल सिक्युरिटी द्यावी लागते. म्हणजे घर, जमीन, कारखाना अशी मालमत्ता गहाण ठेवावी लागते. स्टार्ट अप कंपनीकडे अशी मालमत्ता बहुतेक वेळा नसते. त्यामुळे बँका आणि वित्तसंस्थांची दारे बंद होतात किंवा अल्प भांडवलावर समाधान मानावे लागते. दुसरीकडे व्हेंचर कॅपिटल किंवा रिस्क कॅपिटल कंपन्या स्टार्ट अप कंपन्यांना उदारहस्ते भांडवल आणि मार्गदर्शन द्यायला तयार असतात. पण त्यासाठी स्टार्ट अप कंपनीनील इक्विटीचा म्हणजे शेअर्सचा मोठा भाग व्हेंचर कॅपिटल कंपन्यांना द्यावा लागतो. नवी उद्योग संकल्पना प्रत्यक्षात आणत असताना आवश्यक भांडवलासाठी इक्विटीतील असा वाटा द्यायला उद्योजक सहसा राजी नसतात. अशांच्या समोर भांडवल कुठून मिळवायचे, हा प्रश्न शिल्लकच राहतो.

सिडबीही देते तारणाशिवाय भांडवल व निधीही करते खर्च :
अशाच प्रकारचे कर्जाऊ भांडवल देणारी महत्त्वाची संस्था आहे ती सिडबी. स्मॉल इंडस्ट्रिज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया ही केंद्र सरकारने 1990 मध्ये स्वतंत्र कायदा करून स्थापन केलेली बँक आहे. या बँकेचा उद्देशच लहान, मध्यम उद्योगांना आवश्यक असलेले भांडवल पुरविण्याचा आहे. ही बँक मालमत्ता तारणावर कर्ज इतर बँकांप्रमाणेच देत असली, तरी तारणाशिवाय भांडवल पुरवण्यासाठी 100 कोटी रुपयांचा निधी दरवर्षी खर्च केला जातो. आतापर्यंत गेल्या चार वर्षांत 40 स्टार्ट अप कंपन्यांना सिडबीने 1 कोटी रुपयांपर्यंतचे भांडवल पुरवले आहे. स्टार्ट अप कंपनीला सुरुवातीच्या भांडवलाच्या अडचणीतून मुक्त होण्यासाठी सिडबीच्या या योजनेचा चांगला उपयोग होतो. खेळते भांडवल उपलब्ध झाल्याने जमीन, यंत्रसामग्री इत्यादीसाठी लागणारे भांडवल इतर बँका किंवा वित्तसंस्थांकडून मिळू शकते, आणि जमीन आणि यंत्रसामग्री त्यासाठी तारण म्हणून ठेवता येते.

‘क्राऊड फंडिंग’ :
हा चौथा भांडवलाचा पर्याय भारतात नुकताच रुजायला लागला आहे. अमेरिकेमध्ये मुळात हे क्राऊड फंडिंग सुरू झाले तेव्हाही तिथल्या फेडरल बँकेची इक्विटीला परवानगी नव्हती. पण हा चौथा पर्याय उद्योजकांना महत्त्वाचा वाटल्यामुळे त्यांनी मोठा कायदेशीर लढा दिला अणि ‘जम्स स्टार्ट अवर बिझनेस स्टार्ट अप एॅक्ट’ नावाचा कायदा त्यासाठी संमत करून घेतला. त्यामुळे तिथे आता ऑनलाइन क्राऊड फंडिंगचे रूपांतर इक्विटीमध्ये करता येते. भारतात असा कायदा व्हावा, यासाठी तरुण उद्योजकांनी आणि स्टार्ट अप कंपन्यांनी सरकारकडे आग्रह धरला पाहिजे. यामधून छोट्या प्रमाणात गुंतवणूक करू इच्छिणार्‍या लाखो लोकांना स्टार्ट अपमध्ये आपली गुंतवणूक सहज करता येईल. शिवाय क्राऊड फंडिंगला कायदेशीर मान्यता मिळाल्यामुळे ही गुंतवणूक सुरक्षितही राहील.आपल्या विविध उद्योग संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी स्टार्ट अप कंपन्यांना असे नवे आणि वेगळे पर्याय भांडवलासाठी उपलब्ध होत आहेत. यासाठी जेवढी मागणी वाढेल, तेवढ्या तारणाशिवाय कर्ज देणार्‍या कंपन्याही उभ्या राहतील, हे निश्चित.

इक्विटीत वाटा न घेता ही कंपनी स्टार्ट अप कंपन्यांना 15 कोटींचे कर्ज मंजूर करते
आपल्या भांडवलासाठी तिसर्‍या पर्यायांचा शोध घेणार्‍यांच्या मदतीसाठी आता दोन वित्तसंस्था पुढे आल्या आहेत. सिलिकॉन व्हॅली बँकेने 2008 मध्ये मुंबईत एसव्हीबी इंडिया फायनान्स या नावाची कंपनी स्थापन केली. कोणतीही मालमत्ता गहाण न ठेवता किंवा इक्विटीत वाटा न घेता ही कंपनी 6 महिने ते 3 वर्षांसाठी स्टार्ट अप कंपन्यांना 15 कोटी रूपयांचे कर्ज मंजूर करते. इ-कॉमर्स, वैद्यकीय उपकरणांची निर्मिती यांसह अनेक क्षेत्रातील तरूण उद्योजकांना या कंपनीने गेल्या वर्षभरात 120 कोटी रूपयांचे कर्ज मंजूर केले आहे. या कर्जाचा उपयोग स्टार्ट अप कंपन्यांना दुसर्या टप्प्यात पोचून व्हेंचर कॅपिटल मिळवण्यासाठी होतो. अशा कर्जाद्वारे वर्षा-दोन वर्षांत आपली उद्योग संकल्पना प्रत्यक्षात राबवून उद्योजक हे कर्ज तर फेडतातच, पण अधिक मोठे भांडवल व्हेंचर कॅपिटल कंपन्यांकडून मिळविण्यास सज्ज होतात. या कर्जामुळे स्टार्ट अप कंपनीची भांडवलक्षमता म्हणजेच इक्विटी मोठ्या प्रमाणात वाढलेली असते. त्यातून व्हेंचर कॅपिटल कंपन्यांना इक्विटीत वाटा देण्यात स्टार्ट अप कंपन्यांना अडचण वाटत नाही.
वेणुगोपाल धूत, मुंबई
(लेखक व्हिडिओकॉन उद्योगसमूहाचे चेअरमन आहेत)