आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Venugopal Dhoot Article About Sleet Storm In Marathi

शेती-उद्योग-व्यवसायासह अर्थचक्रासही गारपिटीचा तडाखा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वादळी पाऊस आणि गारपिटीने महाराष्ट्राच्या 28 जिल्ह्यांत तब्बल 20 दिवस थैमान मांडले. त्यामुळे 15 लाख हेक्टर शेती उद्ध्वस्त झाली असून नुकसानीचा आकडा 15 हजार कोटींच्या घरात जाणार आहे. या अस्मानी संकटामुळे केवळ शेतीचेच नव्हे, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेचे अपरिमित नुकसान झाले आहे. त्याची आकडेवारी काढणे मोठे जिकिरीचे आहे. या गारपिटीने ग्रामीण भागाबरोबरच उद्योग-व्यवसायक्षेत्रालाही येणार्‍या काळात जबरदस्त तडाखा बसणार आहे. त्याच्या परिणामी या गारपिटीचे चटके येणार्‍या काळात शहरी भागांनाही सोसावे लागणार आहेत. या गोष्टींकडे अद्याप सरकारचे आणि अर्थतज्ज्ञांचे म्हणावे तसे लक्ष गेलेले नाही. त्यामुळे त्याचाच विचार आपल्याला इथे करायचा आहे.

उत्पादन खर्च वाढला तरी किंमत वाढवता येणार नसल्याचा आर्थिक ताण उद्योगांना पुढे 2-3 वर्षे सोसावा लागेल
आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार धान्यपिकांचे नुकसान सात हजार कोटींवर पोहोचणार आहे, तर फळबागांमध्ये झालेले नुकसान चार ते पाच हजार कोटी असेल, असे चित्र दिसते आहे. शेती आणि फळबागांमधून येणार्‍या उत्पादनांवर आधारित अनेक उद्योग आज राज्यामध्ये उभे राहिले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने अन्न-प्रक्रिया उद्योगांचा समावेश आहे. धान्याची पिठे तयार करण्यापासून ते रेडी टु इट पदार्थ तयार करण्यापर्यंत शेकडो उद्योग या क्षेत्रात उभे राहिले आहेत. वेगवेगळ्या फळांवर प्रक्रिया करून, त्यापासून सिरप, क्रश, तयार सरबते, तयार रस अशी अनेक उत्पादने तयार केली जातात. या उत्पादनांसाठी लागणारा कच्चा मालच आता राज्यामध्ये या गारपिटीमुळे उपलब्ध होणार नाही. हजारो कामगार आणि ग्राहक या उद्योगांवर अवलंबून असल्यामुळे हे उद्योग तर चालू ठेवावेच लागतील. पण त्यासाठी धान्य आणि फळफळावळ हा कच्चा माल बाहेरून, म्हणजे अन्य राज्यांतून आणावा लागेल. त्यासाठी कदाचित किंमत तर जास्त द्यावी लागेलच, पण मोठा वाहनखर्चही सोसावा लागेल. ही सर्व उत्पादने ग्राहकोपयोगी आणि नित्य वापराची असल्यामुळे उत्पादनखर्च वाढला तरी किंमत मात्र वाढवता येणार नाही. त्याचा आर्थिक ताण उद्योगांना पुढे 2-3 वर्षे सोसावा लागेल.

मॉस उद्योगाला संस्कृतीला फटका एकावर एक-दोन फ्री बंद होणार
देशभर मोठ्या आणि मध्यम शहरांतून मॉल संस्कृती उभी राहिली आहे. त्यामध्ये एक महत्त्वाचा घटक ताज्या भाज्या, फळे आणि उत्तम दर्जाचे निवडलेले धान्य, हा आहे. गारपिटीमुळे या दोन्ही क्षेत्रांवर गंभीर परिणाम झाल्यामुळे मॉल्सना थेट शेतकर्‍यांकडून धान्य, फळे, भाज्यांची खरेदी राज्यातून करता येणार नाही. बहुतेक मॉल्स राष्ट्रीय पातळीवरच्या उद्योगसंस्था चालवतात. त्यामुळे इतर राज्यांतून या सर्व गोष्टी त्यांना आणाव्या लागतील आणि त्याचा खर्च वाढेल. पण मॉल संस्कृती ‘एकावर किंवा दोनावर एक फ्री’ अशी असल्यामुळे दर वाढविण्याचा विचारही त्यांना करता येणार नाही. या सगळ्याचा आर्थिक ताण मात्र सोसावाच लागेल.
गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे हे प्रत्यक्ष आणि थेट परिणाम असणार आहेत. पण अप्रत्यक्ष आणि संभाव्य परिणाम अधिक गंभीर आहेत, ज्याकडे कोणाचेच फारसे लक्ष गेलेले नाही.

28 जिल्हे गारपीटग्रस्त असल्याने ग्राहकोपयोगी उत्पादनांच्या विक्रीवर पुढील वर्ष, 2 वर्षे तरी गंभीर परिणाम
ग्राहकोपयोगी वस्तू तयार करणारे उद्योग, हा अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक आहे. या सर्व उद्योगांनी मध्यम व छोटी शहरे आणि तालुका केंद्रांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. बहुतेक उद्योगांना 30 ते 40 टक्के व्यवसाय या क्षेत्रांतून मिळतो. राज्यातील 28 जिल्हे गारपीटग्रस्त झाले असल्याने ग्राहकोपयोगी उत्पादनांच्या विक्रीवर पुढील वर्ष, 2 वर्षे तरी गंभीर परिणाम होणार आहे. सरकारकडून मिळणारी तुटपुंजी मदत शेतकर्‍याला येणार्‍या खरीप हंगामासाठी वापरावी लागेल. तरच त्याला भविष्यात आशेचा किरण दिसणार आहे. येणारे खरीप आणि रब्बी हंगाम चांगले गेले, तरच शेतकरी ग्राहकोपयोगी वस्तू घेण्याचा विचार करू शकेल. म्हणजेच या क्षेत्रातील उद्योगांना नुकसानीचा हा ताण पुढील वर्षभर तरी सोसावा लागेल, अशी शक्यता आहे.

पुनर्वसनासाठी हजारो कोटी रुपये या भागात येणार याचा फायदा निश्चितच शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला होईल
अठ्ठावीस जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे आणि नागरिकांचे पुनर्वसन करताना हजारो कोटी रुपये या भागात येणार आहेत. याचा फायदा निश्चितच शेती आणि ग्रामीण पुनर्वसन क्षेत्रातील काही घटकांना होणार आहे. टी.व्ही., फ्रिजसारख्या ग्राहकोपयोगी वस्तूंची मागणी सध्या वाढली नाही तरी सरकारी मदतीमुळे मोठे आर्थिक चलन-वलन घडेल, हेदेखील तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यामध्येच परिवर्तनाचे किरण शोधावे लागतील.
(लेखक व्हिडिओकॉन उद्योगसमुहाचे चेअरमन आहेत)