आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Venugopal Dhoot Article On Entrapreniership Divlopmant

अमेरिकेत घडते, भारतात का नाही?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

..तर भारतही सहज नवनवीन उद्योजकांचा देश बनू शकतो

अमेरिकेतील सर्व विद्यार्थी बुद्धिमत्तेत, गुणवत्तेत वरचढ असल्याची आपली गैरसमजूत : लेखाचे शीर्षक वाचल्यानंतर हा कल्पनाविलास आहे असे आपल्याला वाटेल; पण हे अमेरिकेत घडू शकत असेल, तर भारतात का नाही, असा प्रश्न मात्र आपण विचारायला तयार नाही. आज संदेशवहन क्षेत्रात खूप मोठी जागतिक क्रांती घडवून आणणारे गुगल आणि फेसबुक हे प्रकल्प मुळात कॉलेजमध्ये सुरू झाले आणि त्याचे आज हजारो कोटींच्या उद्योगांत रूपांतर झाले आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. अमेरिकेत कॉलेजमधल्या मुलांसमोर उद्योगातले, रोजचे प्रश्न, अडचणी आव्हान म्हणून ठेवले जातात आणि त्यावर उपाय शोधणारे नवे तंत्रज्ञान विकसित करायला सांगितले जाते. अमेरिकेतील सर्व विद्यार्थी आपल्यापेक्षा बुद्धिमत्तेत आणि गुणवत्तेत वरचढ असल्यामुळे हे घडते, अशी आपली गैरसमजूत आहे. अमेरिकेत कॉलेजमधल्या मुलांसमोर उद्योगातले, रोजच्या जीवनातले प्रश्न, अडचणी आव्हान म्हणून ठेवले जातात आणि त्यावर उपाय शोधणारे नवे तंत्रज्ञान विकसित करायला सांगितले जाते, म्हणून हे घडते. आपणही तोच आदर्श समोर ठेवला, तर भारतही सहज नवनवीन उद्योजकांचा देश बनू शकतो.
आपल्याकडचे बहुसंख्य उद्योग परदेशातून उत्पादनाचे डिझाइन आयात करून त्यावर उभे राहिले आहेत. ‘मॅन्युफॅक्चरिंग अंडर लायसेन्स’ असे त्याला म्हटले जाते. नव्या उत्पादनांचे डिझाइनिंग कॉम्प्युटरवर करता येते, हेच आपल्याकडे 1980 पर्यंत माहीत नव्हते. कानपूरच्या आयआयटीमध्ये पहिल्यांदा त्यावर प्रयोग झाले आणि त्याचे आज मोठ्या उद्योगात रूपांतर झाले आहे. त्या वेळी नुकतेच प्राध्यापक म्हणून रुजू झालेल्या डॉ.संजय धांडे यांनी हे काम केले आणि त्यानंतर रॅपिड प्रोटोटायपिंग, रॅपिड टूलिंग आणि रिव्हर्स इंजिनिअरिंग या क्षेत्रांचा पाया त्यांनीच घातला. हा सर्व तंत्रज्ञान विकास परदेशी मदत आणि केंद्रसरकारच्या विविध खात्यांच्या विशिष्ट गरजांमधून झाला, हे इथे लक्षात घेतले पाहिजे.
आम्हाला उशिरा जाग, कानपूर आयआयटीचे सरकारी योजनांसाठी प्रकल्प : कानपूर आयआयटीचे मी फक्त उदाहरण दिले. अशाच प्रकारचे अनेक प्रकल्प सरकारी योजनांसाठी इतर आयआयटींनीही राबवले आहेत आणि नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे. विविध देशांशी आपल्या होणार्‍या विविध क्षेत्रांतील सहकार्य करारांमधूनही अनेक नव्या संस्था जन्माला आल्या आहेत. त्याही नवनवीन तंत्रज्ञान विकासाचे काम करत आहेत. याचा अर्थ असा की, आपल्याकडे गुणवत्तेची आणि बुद्धिमत्तेची कमतरता तर नाहीच, या विद्यार्थी आणि शिक्षकांसमोर आपण आपले प्रश्न मांडले, तर त्यावर योग्य आणि सोपी उत्तरे ते शोधून काढतात हे सिद्ध झाले आहे. मग आयआयटीत जसा तंत्रज्ञान विकास होतो, तसा इतर बिझनेस स्कूल्स आणि विद्यापीठांमधून होऊ शकणार नाही का, हा खरा प्रश्न आहे.
अभ्यासक्रमातून प्रयोग व बदल करावे लागतील :
आपल्या विद्यापीठांतून असे प्रयोग होणे सहज शक्य आहे; पण त्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करावे लागतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याकडच्या अभ्यासक्रमात मोठे बदल घडवावे लागतील. आजच्या वास्तव जीवनाशी संबंधित समस्या आणि अडचणी या अभ्यासक्रमातून त्यांच्यासमोर आल्या, तर त्यावर उत्तरे शोधायला हे विद्यार्थी प्रवृत्त होतील. विद्यापीठाच्या जवळ असणार्‍या उद्योगांना आवश्यक असणारे छोटे अभ्यासक्रम सुरू करावे लागतील. एखादा विद्यार्थी उद्योजक बनण्यासाठी धडपडत असेल, तर त्याला बोनस गुण देण्याची व्यवस्था अभ्यासक्रमात असायला हवी. अशा कॉलेजांतून उभ्या राहिलेल्या स्थानिक उद्योजकांचे रोल मॉडेल त्यांच्यासमोर ठेवायला हवे आणि अशा विद्यार्थ्यांतून नवे उद्योग स्टार्ट अप सुरू करणार्‍यांना व्हेंचर फंडबरोबरच सरकारी संस्थांनीही मदत किंवा गुंतवणूक द्यायला हवी. हे बदल घडले, तर कॉलेज पातळीवर विद्यार्थ्यांना नवे तंत्रज्ञान विकसित करण्याचे प्रयोग करता येतील आणि उद्योगही उभे करता येतील.
नोकिया, मायक्रोसॉफ्टचा 152 कोटींचा स्वतंत्र निधी, विंडोज फोनसाठी साडेतीन कोटींची बक्षिसे :
नोकिया आणि मायक्रोसॉफ्टने तर 152 कोटी रुपयांचा एक स्वतंत्र निधी यासाठी उभारला आहे. विंडोज फोन भारतात विकसित करण्यासाठी त्यांनी साडेतीन कोटी रुपयांची बक्षिसे जाहीर केली आहेत. विद्यार्थी विकासकांना प्रशिक्षित करण्यासाठी अभ्यासक्रमही त्यांनी सुरू केले आहेत.
नव्या संकल्पना कोणत्याही उद्योगाचा मूळ पाया : आयबीएमची 150 कॉलेजांत सेंटर ऑफ एक्सलन्स :
नव्या संकल्पना हा कोणत्याही उद्योगाचा मूळ पाया असतो. अशा चांगल्या संकल्पना हजारोंच्या संख्येने पुढे यायला हव्यात, असा प्रयत्न आयबीएम ही कंपनी करते आहे. 150 कॉलेजांत त्यांनी सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू केली असून तिथे विद्यार्थ्यांची ओळख नव्या तंत्रज्ञानाशी करून दिली जाते. ‘द ग्रेट माइंड चॅलेंज’ या कार्यक्रमांतर्गत त्यांनी विद्यार्थ्यांकडून नव्या उद्योग संकल्पना मागवल्या आहेत. सर्वोत्तम 100 संकल्पनांचे उद्योगात रूपांतर व्हावे, यासाठी त्या कल्पना इनक्युबेशन सेंटर्सकडे सोपवल्या जाणार आहेत.
नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग सामाजिक, आरोग्यविषयक प्रश्न सोडवण्यासाठीही
इंटरनेट, मोबाइल आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंध असलेल्या अशा जागतिक उद्योगांनी कॉलेजमधून नवे उद्योजक घडवण्यासाठी पुढाकार घेतला आहेच; पण असे प्रकल्प इतरही विविध क्षेत्रांतल्या उद्योजकांना कॉलेज विद्यार्थ्यांकडे घेऊन जाता येतील. त्यामधून विकसित होणार्‍या नव्या तंत्रज्ञानाचा काही आर्थिक फायदा त्या कॉलेजांनाही झाला, तर अशी नवनिर्मितीची हजारो केंद्रे देशभरातल्या विविध कॉलेजांतून उभी राहू शकतील. अशा नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग सामाजिक आणि आरोग्यविषयक प्रश्न सोडवण्यासाठीही होऊ शकतो, हे कला शाखेतील विद्यार्थ्यांना कळले, तर समाजाचे संपूर्ण चित्रच बदलून जाऊ शकते.

उद्योगांनीच थेट कॉलेजात विद्यार्थ्यांशी संवाद साधावा, गुगलचे 300 कॉलेजांत स्टुडंट अ‍ॅम्बेसेडर :
हे सगळे सरकारने किंवा विद्यापीठांनी करावे, असे म्हणून उद्योगांनी हात झटकण्याचे काहीच कारण नाही. उलट असा बदल घडून यावा, यासाठी उद्योगांनीच थेट कॉलेज कॅम्पसमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी विविध प्रश्नांवर संवाद साधला पाहिजे. ‘गुगल’सारख्या उद्योगाने आपल्या देशातल्या 300 कॉलेजांत स्टुडंट अ‍ॅम्बेसेडर नेमले आहेत. हे प्रतिनिधी त्या त्या कॉलेजांत विविध प्रकारचे कार्यक्रम करतात आणि त्यामधून अँड्रॉइडवर आधारित नवनवीन अ‍ॅॅप्स विद्यार्थ्यांनी तयार करावीत, असा प्रयत्न करतात.