आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ई-कॉमर्स : ‘ऑनलाइन’ खरेदीला वाढती पसंती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
असोचेमच्या पाहणीत ई-कॉमर्समध्ये 250 टक्के वाढ
भारतासारख्या देशात ई-कॉमर्सला प्रतिसाद मिळेल की नाही, अशी शंका अनेकांच्या मनात होती. पण गेल्या काही वर्षांत ‘नेटिझन्स’च्या वाढलेल्या अफाट संख्येमुळे घराघरांत ऑनलाइन खरेदी करण्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे, असे ‘असोचेम’ संस्थेच्या पाहणीत आढळून आले आहे. ई-कॉमर्सच्या दृष्टीने मोठा सुखद धक्का देणारी ही गोष्ट आहे. ‘असोचेम’ ही औद्योगिक संघटना वेळोवेळी विविध प्रकारच्या पाहण्यांमधून बाजारपेठेचा अंदाज घेत असते. या वर्षी दिवाळीच्या निमित्ताने ‘असोचेम’ने देशातील प्रमुख शहरांत ऑनलाइन खरेदीची पाहणी केली आणि त्यात ई-कॉमर्समध्ये 250 टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
पाच हजार कोटींचा व्यवसाय, प्रमुख शहरात खरेदी
‘असोचेम’ने पाहणी केलेल्या शहरांत दिल्ली-एमसीआर., लखनऊ, कोलकाता, चंदिगड, डेहराडून, अहमदाबाद, पुणे, मुंबई, हैदराबाद, कोचीन, चेन्नई, उदयपूर, जयपूर अशा शहरांचा समावेश होता. एकूण ऑनलाइन खरेदीपैकी सर्वाधिक खरेदी याच प्रमुख शहरांतून झाली आहे. गेल्या काही दिवसांत ऑनलाइन शॉपिंगमधून 5 हजार कोटींचा व्यवसाय झाला आहे.
58 टक्के खरेदी फक्त दिवाळी भेटवस्तूंचीच
ऑनलाइन खरेदी करीत असताना ग्राहकांचा कल कोणत्या वस्तूंकडे आहे हेदेखील ही बाजारपेठ समजून घेण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. ही पाहणी दिवाळीच्या काळात झाली. त्यामुळे भेटवस्तूंना प्राधान्य असणार हे स्वाभाविकच आहे. एकूण ऑनलाइन खरेदीच्या 58 टक्के खरेदी फक्त भेटवस्तूंचीच आहे. दिवाळीसारख्या सीझनमध्ये ग्राहकांचा कल इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू घेण्याकडे असतो हे या पाहणीतही दिसून आले. ऑनलाइन खरेदीतून इलेक्ट्रॉनिक्स वस्तूची विक्री 41 टक्के एवढी झाली. दिवाळीचा सण म्हणजे कपडे-लत्ते आलेच. त्यांनाही मोठी, म्हणजे 33 टक्के मागणी होती. ही सर्वच आकडेवारी खूपच आशादायक आहे.
व्यस्त जीवनशैलीमध्ये खरेदीचा ट्रेंडच (ऑनलाइन) बदलला
ई-कॉमर्समध्ये झालेली 250 टक्के वाढ, हा सुखद धक्का आहे, असे मी वर म्हटले, त्याला एक महत्त्वाचे कारण आहे. खरेदी आणि त्यातून दिवाळीची खरेदी म्हणजे आपल्याकडे एक कौटुंबिक सोहळा असायचा. घरातील सर्वजण मिळून खरेदीला बाहेर पडायचे. प्रत्येक वस्तूची, कपड्याची चिकित्सा व्हायची. यंत्र असेल तर ते चालवून पाहिले जायचे. कपडे, दागिने अंगावर घालून पाहायचे आणि सर्वांनी पसंती दिली तर ते घेतले जायचे. आपले ग्राहक चोखंदळ असल्याने एकाच दुकानात त्यांना हवे ते मिळेल आणि पसंत पडेल, असे व्हायचे नाही. ब्रँडेड वस्तू कुठेही घेतल्या तरी सारख्याच. पण मग त्यावर कोणाची काय स्कीम आहे, भेटवस्तू कोणत्या आहेत, याचा शोध घेतला जायचा. कपडे, साड्या खरेदीसाठी तर अनेक दुकाने पालथी घातली जायची. त्यावेळच्या आपल्या जीवनशैलीमध्ये खरेदी हा एक आनंदसोहळा असायचा. पण गेल्या काही वर्षांत आपली विशेषत: मोठ्या शहरांतली जीवनशैलीच पूर्णपणे बदलून गेली आहे. घरातले सदस्य बहुसंख्येने नोकरी करणारे, प्रत्येकाच्या वेळा वेगवेगळ्या. त्यातही नोकरीसाठी लागणा-या प्रवासाचा वेळ वाढलेला. त्यामुळे पूर्वीसारखे, निदान रात्री तरी घरातील सर्वजण जेवायला एकत्र असतील, गप्पा मारतील अशी परिस्थितीच राहिली नाही. पूर्वी आपल्या खरेदीवर थोडाफार सिनेमा-नाटकांचा प्रभाव होता. पण तो खूप मर्यादित होता. आता टीव्ही घरोघरी झाल्यामुळे मालिकांमधून दिसणा-या कपड्यांच्या फॅशन्स, दागदागिने, फर्निचर, इतर वस्तू एवढेच नाही तर आकर्षक फ्लॅट हेदेखील आपल्या खरेदीवर प्रभाव टाकत आहे. पूर्वी संपूर्ण कुटुंब बरोबर असले तरी सर्वसाधारण निर्णय मोठी माणसेच घ्यायची. आता हे चित्रच बदलले आहे. आता मुले आणि तरुणच आपल्याला काय हवे हे ठरवतातच, पण आई-वडिलांनी काय घ्यावे याबद्दलही ते आग्रही असतात.
बाजारात सणासुदीतील प्रचंड गर्दी, पार्किंगची सोय नसणे हेही कारण
बदलत्या जीवनशैलीमुळे लोकांना मिळून खरेदी करण्यासाठी पुरेसा वेळच मिळत नाही. दसरा-दिवाळीसारख्या सणाच्या काळात बाजारपेठेत गर्दीही खूप असते आणि जवळपास वाहनांच्या र्पाकिंगचीही पुरेशी व्यवस्था नसते. त्यामुळे खरेदीसाठी बाहेर जाणे नको, कोण त्या गर्दीत जाणार, अशी मानसिकता तयार व्हायला लागली आहे. त्यामुळे आपल्याला हव्या असलेल्या वस्तू घरबसल्या सहजपणे मिळतील का, असा विचार सुरू झाला. त्यातूनच ऑनलाइन खरेदीकडे लोक वळायला लागले आहेत.
ऑनलाइन खरेदीचा कल पाहून ब्रँडेड कंपन्यांच्या वेबसाइट व ऑनलाइन योजना नेटवर
ऑनलाइन खरेदीकडे लोकांचा कल वाढतो आहे हे पाहून विविध क्षेत्रातल्या ब्रँडेड कंपन्यांनी आपल्या वेबसाइट आणि ऑनलाइन खरेदी योजना नेटवर सुरू केल्या. हळूहळू एकाच विशिष्ट उत्पादनाच्या पलीकडे जाऊन ऑनलाइन मॉल नेटवर सुरू झाले. पूर्वी अनेक ब्रँड आपली प्रदर्शने भरवून लोकांसमोर आपली उत्पादने ठेवत असत. प्रदर्शनाला भेट देणा-यांचे नाव, पत्ते घेऊन पुढच्या प्रदर्शनाची आमंत्रणे पाठवत असत. आता आपण एखाद्या वेबसाइटला भेट दिली की, आपल्या मेल अ‍ॅड्रेसची नोंदणी होते आणि नवीन उत्पादने, योजनांची माहिती मेलवर येऊन पडते. ग्राहक संपर्क हा बाजारपेठेचा महत्त्वाचा मुद्दा इंटरनेटमुळे अगदीच सोपा झाला आहे.
ऑनलाइन खरेदीला महत्त्व येण्यामागे बदलत्या आर्थिक व्यवहाराचाही मोठा वाटा आहे. बहुतेक बँका देत असलेले एटीएम कार्डच डेबिट कार्ड म्हणून वापरता येते. शिवाय क्रेडिट कार्डधारकांची संख्याही अनेक पटींनी वाढली आहे. याबरोबरच ऑनलाइन खरेदीसाठी अनेक कंपन्यांनी ‘कॅश ऑन डिलिव्हरी’चा पर्याय ठेवला असल्याने ग्राहकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. ऑनलाइन खरेदीला मिळणा-या या पसंतीमुळे केवळ कंपन्याच नव्हे, तर हजारो दुकानदारही आपल्या वस्तूंचे प्रदर्शन ऑनलाइन करीत आहेत. पुण्यातील प्रसिद्ध तुळशीबागही आता ऑनलाइन होण्याच्या मार्गावर आहे. याचे महत्त्व तुळशीबागेत किंवा दिल्लीच्या चांदणी चौकात जाऊन आलेल्यांना नक्कीच कळेल.