आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंतवणुकीत भारतच नंबर वन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या काही महिन्यांत भारतातील शेअरबाजार प्रचंड हेलकावे खात राहिला. परदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात बाजारातून गुंतवणूक काढून घेतली. भारतीय रुपयाही सतत गटांगळ्याच खात आहे. त्यामुळे केंद्र्र सरकारने थेट परकीय गुंतवणुकीसाठी लाल गालिचा अंथरला असला, तरी भारतात परकीय गुंतवणूक होईल की नाही, अशी शंका सर्वांनाच वाटत होती; पण आता ‘अर्न्स्ट अँड यंग’ या सल्लागार संस्थेने केलेल्या जागतिक पाहणीत गुंतवणूक डेस्टिनेशन म्हणून भारतच पहिल्या क्रमांकावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सर्वांनाच मोठा दिलासा मिळाला आहे.
गुंतवणूकदारांना अमेरिका आणि चीनपेक्षाही भारत अधिक विश्वासार्ह वाटत आहे :
‘अर्न्स्ट अँड यंग’ची ही पाहणी व्यापक प्रमाणावर करण्यात आली आहे. 70 देशांमधील मोठ्या नामवंत कंपन्यांच्या 1600 ज्येष्ठ अधिका-यांशी चर्चा करून या पाहणीचे निष्कर्ष प्रसिद्ध करण्यात आले. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुंतवणूकदारांना अमेरिका आणि चीनपेक्षाही भारत अधिक विश्वासार्ह वाटत आहे. त्यामुळे ‘इंडिया ग्रोथ स्टोरी’ संपली, असे मानण्याचे काहीही कारण दिसत नाही. या पाहणीनुसार दूरसंचार, मल्टिब्रँड रिटेल वाहनउद्योग, तंत्रज्ञान, लाइफ सायन्सेस आणि ग्राहकोपयोगी वस्तू अशा सर्व क्षेत्रांत गुंतवणूकदारांना मोठा रस वाटतो आहे. त्यामुळे येत्या काही काळात लाखो कोटींची गुंतवणूक भारतात होऊ शकते.
संकटातच संधी असते, असे नेहमी म्हटले जाते. ते आपल्या आणि इतरांच्या बाबतीतही तेवढेच खरे आहे. गेल्या वर्षा-दोन वर्षांत भारतीय अर्थव्यवस्थेला अनेक लहानमोठे हादरे बसले. शेअरबाजारात गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपये बुडाले. त्यामुळे केंद्र सरकारच्या आर्थिक सुधारणाही मंदावल्या. या सर्वाचा परिणाम म्हणून, भारतीय कंपन्यांनी आपल्या मुख्य उद्योगावरच लक्ष केंद्रित केले. विविध क्षेत्रांत विस्तारासाठी सुरू केलेल्या अनेक उद्योगांचे काम थांबवण्यात आले किंवा मंदावले. भारतात थेट गुंतवणूक करू इच्छिणा-या उद्योगांना यामध्येच फार मोठी संधी दिसते आहे. भारतीय कंपन्यांचे हे छोटे उद्योग ताब्यात घेऊन भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ते करण्यासाठी विलीनीकरण आणि अधिग्रहण नियमांमध्ये अधिक शिथिलता यावी, यासाठी हे उद्योग केंद्र सरकारशी चर्चा करत आहेत. नियमांत अपेक्षित बदल झाले, तर ही संभाव्य गुंतवणूक लवकर येऊ शकते.
भारतीय गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीचे प्रमाण फक्त 2 टक्के, परकीय गुंतवणूक महत्त्वाची :
शेअरबाजारात घडणा-या घडामोडी, हे अर्थव्यवस्थेचे एकमेव मानक (इंडिकेटर) नाही, हे सर्वसामान्य वाचकांना माहीत नसते. त्यामुळे अनेक वेळा या घडामोडींचा ग्राहक आणि गुंतवणूकदार म्हणून आपल्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होतो. थेट परकीय गुंतवणूकही कशाला, असाही एक सूर त्यामध्ये असतो; पण गेल्या 20-22 वर्षांत आपली अर्थव्यवस्था वेगाने सुधारली, यात दीर्घकालीन परकीय गुंतवणुकीचा मोठा वाटा आहे. आत्तापर्यंत साडेसहा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक शेअर्स आणि रोखे यामध्ये झाली आहे. त्यातले भारतीय गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीचे प्रमाण फक्त 2 टक्के आहे. यावरून ही परकीय गुंतवणूक किती महत्त्वाची आहे, हे आपल्या लक्षात येईल.
थेट परकीय गुंतवणुकीमुळे गेल्या 23 वर्षांत मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 20 पटींनी वाढला आहे. 1980 मध्ये निर्देशांकाची पातळी जेमतेम 128 वर होती. माध्यमांचेही शेअरबाजाराकडे आणि एकूणच उद्योग-व्यवसायाकडे फारसे लक्ष नव्हते. परिणामी त्याची बातमीदेखील आपल्या कानांवर येत नसे. भारतात आर्थिक उदारीकरण आणि जागतिकीकरण सुरू झाले. त्याचा परिणाम म्हणून उद्योगाच्या विविध क्षेत्रांमध्ये परदेशांतून मोठी गुंतवणूक होऊ लागली. त्यापूर्वी परदेशी गुंतवणूक नव्हती, असे नाही; पण तिचे स्वरूप सरकारला पायाभूत सुविधा आणि मोठे सार्वजनिक उद्योग उभे करण्यासाठी दिलेल्या कर्जाचे अथवा मदतीचे असे. साहजिकच त्याचे प्रतिबिंब शेअरबाजारावर किंवा अर्थव्यवस्थेत पडताना दिसत नसे.
अलीकडच्या काळात वाहन उद्योगासह अनेक क्षेत्रांमध्ये नामवंत परकीय उद्योगांनी आपली उत्पादनकेंद्रेच भारतात सुरू केली आणि त्यामध्ये मोठी गुंतवणूक केली. याचा परिणाम भारतीय उद्योगांनाही मोठा आधार मिळण्यात झाला आणि अर्थव्यवस्था वेगाने वाढत गेली. घरबांधणी, औषधनिर्मिती, विमानवाहतूक या क्षेत्रांमध्ये भारतीय कंपन्यांनी आपले पाय रोवून मोठे परिवर्तन घडवून आणले आहे; पण आपल्याकडे हे उद्योग वाढण्याची जी मोठी क्षमता आहे, ती पाहता हे उद्योग नक्कीच कमी पडत आहेत, सरकारही इच्छा असून या क्षेत्रांत मोठी गुंतवणूक करू शकत नाही. अशा वेळी सरकारने थेट परकीय गुंतवणुकीचे नियम शिथिल केले, तर विविध क्षेत्रांतली थेट परकीय गुंतवणूक निश्चितपणे वाढू शकते.
चीनमधील आर्थिक प्रगती थंडावल्यासारखी झाली असल्याने गुंतवणूकदारांचे सगळे लक्ष आता भारताकडे आणि ब्राझीलकडे लागले आहे :
शेअरबाजारामध्ये आणि रोख्यांमध्ये परदेशातून गुंतवणूक करणा-यांचे दोन महत्त्वाचे प्रकार आहेत. पहिला प्रकार भारतात दीर्घकालीन गुंतवणूक करू इच्छिणा-यांचा आहे. गेल्या 20 वर्षांत भारतात अनेक मोठे राजकीय बदल झाले; पण त्याचा कोणताही वाईट परिणाम अशा गुंतवणुकीवर झाला नाही. भारतीय अर्थव्यवस्थेची एकूण प्रगती आणि त्यामधून आपल्याला होणारा लाभ डोळ्यासमोर ठेवूनच हे गुंतवणूकदार गुंतवणूक करतात. साहजिकच शेअर बाजारातील तत्कालिक घडामोडींचा त्यांच्यावर परिणाम होत नाही. जे गुंतवणूकदार त्वरित आणि मोठा फायदा कुठे मिळेल हे पाहून गुंतवणूक करत असतात, त्यांना मात्र शेअरबाजारातील घडामोडींचा फटका बसतो. बाजार सुधारेल याची वाट पाहायला ते तयार नसतात. म्हणूनच ते घाईघाईने गुंतवणूक काढून घेतात. अर्थव्यवस्थेची खरी प्रगती अशा लोकांवर अवलंबून नसते. ती दीर्घकालीन गुंतवणूक किती होते, यावर अवलंबून असते. चीनमधील आर्थिक प्रगती थंडावल्यासारखी झाली असल्याने गुंतवणूकदारांचे सगळे लक्ष आता भारताकडे आणि ब्राझीलकडे लागले आहे, हे ‘अर्न्स्ट अँड यंग’च्या पाहणीत दिसून आले आहे. हे भारताच्या दृष्टीने सुचिन्हच म्हणावे लागेल.