आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हिडिओकॉन आता बँकिंग क्षेत्रात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - रिझर्व्ह बॅँकेने बॅँकिग परवान्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केल्यानंतर आता नवीन बॅँका सुरू करण्यासाठी कंपन्यांमध्ये चुरस वाढू लागली आहे. विविध उद्योगांत कार्यरत असलेल्या व्हिडिओकॉन इंडस्ट्रीजनेदेखील एका विदेशी भागीदाराच्या मदतीने बँकिंग क्षेत्रात उडी मारण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रस्तावित नवीन व्यवसायासाठी कंपनीने एक हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

लिबर्टी म्युच्युअल इन्शुरन्स या कंपनीबरोबरच्या संयुक्त भागीदारीच्या माध्यमातून कंपनीने अगोदरच वित्तीय क्षेत्रात प्रवेश केलेला आहे. नवीन बँकिंग परवान्यासाठी नियमावली जाहीर झालेली असल्याने आता व्हिडिओकॉनदेखील निश्चितपणे यासाठी अर्ज करणार असल्याची माहिती व्हिडिओकॉनचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांनी दिली.
तोशिबा, पॅनासॉनिकसारखे ब्रॅँड भारतात आणण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडतानाच कंपनीकडे 10 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असल्याचे स्पष्ट करून धूत पुढे म्हणाले की, नवीन बॅँक परवान्यासाठी रिझर्व्ह बॅँक ऑफ इंडियाने आखून दिलेल्या सर्व निकषांची पूर्तता कंपनी करेल आणि विदेशी भागीदार कंपन्यांबरोबरच्या सहकार्याचा अनुभव या नवीन बँक स्थापनेसाठी उपयोगात येऊ शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

एक हजार कोटी रुपयांची तरतूद
रिझर्व्ह बँकेच्या नियमावलीप्रमाणे नवीन बँक सुरू करण्यासाठी किमान 500 कोटी रुपयांची तरतूद करणे गरजेचे आहे. परंतु व्हिडिओकॉनने एक हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. कंपनीचे मुख्य लक्ष्य शहरी भागावर असले तरी ग्रामीण आणि निमशहरी भागात व्हिडिओकॉन ब्रँडने भक्कम स्थान निर्माण केले असून त्याचा फायदा कंपनी घेणार आहे. सध्या कंपनीची देशभरात 500 कार्यालये असून त्या माध्यमातून बँकिंग क्षेत्रात प्रवेश करणार असल्याचे धूत म्हणाले.