आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्वास डळमळल्याने बाजारात सतर्कता हवी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागील आठवड्यात शेअर्स आणि बेंचमार्क निर्देशांकांनी एकतर्फी कारभार केला. मात्र, मागील शुक्रवार ते सोमवार बाजारातील धारणा काही प्रमाणात सकारात्मक झाली आहे. व्यापार तुटीची आकडेवारी अपेक्षेपेक्षा चांगली राहिली, ग्राहक महागाई दरांत घसरण झाल्याने बाजारात खालच्या स्तरावर काही प्रमाणात खरेदी दिसून आली. मागील आठवड्यात मी बाजार घसरणीच्या पकडीत असल्याचे म्हटले होते. तसेच निफ्टीला 6144 वर चांगला आधार मिळेल असेही नमूद केले होते. मागील आठवड्यात निफ्टी या स्तराच्या खाली आला, मात्र या आधार पातळीला निर्णायक तोड देऊ शकला नाही. या स्तरावरून उसळी घेत तो बंद झाला. असे असले तरी, माझ्या अंदाजापेक्षा निफ्टीने थोडी वेगळी चाल दर्शवली, मला निफ्टीत घसरण अपेक्षित होती.
औद्योगिक उत्पादनाच्या आकडेवारीकडे बाजाराने दुर्लक्ष केले. ही आकडेवारी अपेक्षेपेक्षा खूपच कमी असून वास्तविक मोठी धक्कादायक आहे. खासकरून भांडवली वस्तू क्षेत्रातील वाढीची आकडेवारी अर्थव्यवस्था किती संकटात आहे हे दर्शवणारी आहे. मात्र रिझर्व्ह बँक आपल्या आगामी पतधोरणात प्रमुख व्याजदरांत वाढ करणार नाही या आशेवर बाजाराने या आकडेवारीकडे कानाडोळा केला. रिझर्व्ह बँक येत्या 28 जानेवारीला आपल्या पतधोरणाचा आढावा घेणार आहे. बाजारात मोठ्या प्रमाणात तेजी दिसून आली तरी विश्वास मात्र डळमळीत झाला आहे.
कंपन्यांच्या तिस-या तिमाहीच्या आर्थिक निकालांना मात्र सकारात्मक सुरुवात झाली. इन्फोसिसचे निकाल अपेक्षेपेक्षा जास्त चांगले राहिले. कंपनीने आपल्या उत्पन्नाचे लक्ष्य वाढवले आहे. त्यामुळे इन्फोसिससह इतर आयटी कंपन्यांच्या समभागांत तेजी दिसून आली. मात्र, बाजारातील सकारात्मक कलासाठी आगामी काळात आणखी चांगल्या निकालांची आवश्यकता आहे.
जागतिक पातळीवर आर्थिक संकेत संमिश्र आहेत. अमेरिकेतील अकृषी पेरोल आकडेवारीवरून तेथील आर्थिक परिस्थिती आणखी सुदृढ नसल्याचे स्पष्ट होते. चीन आणि युरोपातील आर्थिक संकेत सकारात्मक आहेत. देशपातळीवर आगामी काळात बाजारात सकारात्मक कलासह सतर्कतेचे वातावरण राहील. फंडांकडून होणा-या नव्या खरेदीमुळे बाजारात तेजी दिसण्याची शक्यता आहे. मात्र या तेजीसाठी आवश्यक असणारा विश्वास बाजारात दिसत नाही आणि 6144 ची आधार पातळी अजूनही कायम आहे. अशा स्थितीत गुंतवणूकदारांनी सतर्क राहून खरेदी टाळावी.
तांत्रिकदृष्ट्या निफ्टीला आता 6191 वर चांगला आधार आहे. जोपर्यंत निफ्टी या स्तरावर राहील तोपर्यंत बाजारात तेजीची धारणा दिसून येईल. निफ्टीसाठी 6321 ही पातळी गाठणे हे पुढील लक्ष्य राहील. माझ्या मते हीच पातळी निफ्टीसाठी अडथळा ठरणारी आहे. खालच्या दिशेने निफ्टी 6191 या पातळीखाली बंद होणे घसरणीचे संकेत मानावेत. त्याला नंतर 6144 वर चांगला आधार मिळण्याची शक्यता आहे. ही पातळी तुटल्यास बाजार घसरणीच्या पकडीत येण्याचे संकेत मानावेत. निफ्टीला मग 6057 वर चांगला आधार मिळेल.
शेअर्सच्या बाबतीत, या आठवड्यात सेसा, एचडीएफसी बँक, टाटा मोटर्स आणि टेक महिंद्रा लिमिटेड हे समभाग चार्टवर उत्तम स्थितीत आहेत. एचडीएफसी बँकेचा मागील बंद भाव 672.3 रुपये आहे. त्याचे पुढील लक्ष्य 680 रुपये तर स्टॉप लॉस 663 रुपये आहे. टाटा मोटर्सचा मागील बंद भाव 371.80 रुपये आहे. त्याचे पुढील लक्ष्य 380 रुपये तर स्टॉप लॉस 364 रुपये आहे. टेक महिंद्राचा मागील बंद भाव 1893.25 रुपये आहे. त्याचे टार्गेट 1923 रुपये तर स्टॉप लॉस 1848 रुपये आहे.
लेखक टेक्निकल अ‍ॅनालिस्ट आणि moneyvistas.com
चे सीईओ आहेत.vipul.verma@dainikbhaskargroup.com