आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तांत्रिकदृष्ट्या शेअर बाजारात तेजीची शक्यता कमीच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोखतेवर स्वार होऊन आलेल्या नव्या आर्थिक संकटाने बाजारातील समभाग बाजार आणि चलन बाजारावर आपला परिणाम दाखवणे सुरू केले आहे. तसे पाहिले तर विकसनशील बाजारांत घसरणीसाठी अमुक एक ठोस कारण सध्या तरी नाही. अमेरिका फेडरल रिझर्व्हने रोखे खरेदीत कपातीचा निर्णय घेतला आहे. त्याचे पडसाद आता उमटत आहेत.
तुर्कस्तानचे लीरा हे चलन आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर आले आहे. तिकडे अर्जेंटिनाच्या पेसोची स्थिती अत्यंत कठीण आहे. भारतीय रुपया त्यामानाने बराच स्थिर दिसतो आहे. याचे सारे श्रेय रिझर्व्ह बँकेला द्यायला हवे. रिझर्व्ह बँकेने अत्यंत आक्रमक धोरण अवलंबून सार्वजनिक बँकांच्या माध्यमातून बाजारात डॉलरची विक्री केली.
मी मागील स्तंभात नमूद केले होते की, निफ्टीला 6348 या पातळीवर कडवा अडथळा होईल. मोठ्या व्हॉल्यूमसह ही पातळी तुटल्यासच निफ्टीत घसरण तेजीची शक्यता आहे. खालच्या दिशेने निफ्टीला 6243 वर चांगला आधार आहे. याचाच अर्थ असा की, निफ्टीतील सकारात्मक कल अत्यंत अल्पकाळ टिकणारा आहे. मी म्हटल्याप्रमाणे निफ्टी 6349.50 या पातळीपर्यंत पोहोचला. मात्र, ही पातळी न तुटल्याने निफ्टीची पुढील चाल खुंटली. निफ्टी खाली घसरला आणि त्याने 6243 ही आधार पातळीही सोडली. त्यामुळे निफ्टी आणखी घसरणार हे स्पष्ट झाले होते. मंगळवारी निर्देशांक 6085.95 पर्यंत खाली घसरला. अशा प्रकारे निफ्टीची हालचाल अपेक्षेनुसार झाली असे म्हणता येईल.
रिझर्व्ह बँकेने मात्र अपेक्षाभंग केला. रेपो दरात पाव टक्का वाढ केली. रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर डॉ. रघुराम राजन व्याजदरात वाढ करणार नाहीत असे वाटणा-या बहुसंख्यांमध्ये माझाही समावेश होता. राजन यांनी मात्र दरवाढीचे संकेत दिले होते. तरीही देशाची आर्थिक वाढ लक्षात घेऊन राजन दरवाढ करणार नाहीत अशी बहुतेक विश्लेषक आणि अर्थतज्ज्ञांची अपेक्षा होती.
जागतिक पातळीवर चीनमधील औद्योगिक उत्पादनाची आकडेवारी निराशाजनक राहिली. त्यामुळे जगातील या दुस-या क्रमांकाची अर्थव्यवस्था डळमळीत झाल्याचे संकेत आहेत. परिणामी अमेरिकेच्या शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री झाली. त्याचेच पडसाद नंतर जगभरातील शेअर बाजारात उमटले. चीन अजूनही चिंतेचा विषय आणि जगभरातील बाजारातील पडझडीचे मुख्य कारण बनला आहे. अमेरिकेतील आकडेवारी समाधानकारक राहिली तर आर्थिक संकटांतून गतीने प्रगती करणा-या ग्रेट ब्रिटनने सर्वांना चकित केले.
तांत्रिकदृष्ट्या बाजार आता कमकुवत वाटतो आहे. सध्याच्या पातळीवरून काही प्रमाणात बाउन्स बॅकची शक्यता वाटते. मात्र, हे फार काळ टिकणारे नाही. निफ्टीतील घसरण कायम राहील. खालच्या दिशेने निफ्टीला 6057 वर चांगला आधार आहे. या स्तरावर टिकण्यात निफ्टी यशस्वी ठरला आणि चांगल्या व्हॉल्यूमसह व्यवहार झाल्यास निफ्टी 6191 पर्यंत सहज जाऊ शकतो. मात्र, घसरण झाल्यास निफ्टीला 5948 वर चांगला आधार मिळेल. हा अत्यंत मजबूत आधार आहे. वरच्या दिशेने निफ्टीला 6191 वर पहिला, तर 6248 वर दुसरा अडथळा आहे. निप्टी जर 6248 च्या वर बंद झाला तर मात्र घसरणीची शक्यता अत्यंत कमी आहे.
शेअर्सच्या बाबतीत या आठवड्यात टायटन इंडस्ट्रीज लिमिटेड, एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेड आणि टाटा मोटर्स लिमिटेड हे समभाग चार्टवर उत्तम स्थितीत आहेत. टायटन इंडस्ट्रीजचा मागील बंद भाव 217 रुपये आहे. त्याचे पुढील लक्ष्य 224 रुपये, तर स्टॉप लॉस 210 रुपये आहे. टाटा मोटर्सचा मागील बंद भाव 356.25 रुपये आहे. त्याचे पुढील लक्ष्य 363 रुपये, तर स्टॉप लॉस 349 रुपये आहे. एलआयसी हाउसिंग फायनान्सचा मागील बंद भाव 199.60 रुपये आहे. त्याचे टार्गेट 206 रुपये, तर स्टॉप लॉस 193 रुपये आहे.
- लेखक टेक्निकल अ‍ॅनालिस्ट आणि moneyvistas.com चे सीईओ आहेत.