आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vipul Varma's Artical On American Number, Election Result Define Market Direction

अमेरिकेतील आकडे, निवडणुकांच्या निकालावर ठरणार बाजाराची दिशा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेअर आणि बेंचमार्क सुचकांक मागील आठवड्यात तेजीसह बंद झाले. विदेशी फंडांकडून जोरदार खरेदी आणि भारतीय अर्थव्यवस्थेतील सुधारणांच्या अपेक्षांचा या तेजीत मुख्य वाटा राहिला. दुस-या तिमाहीत जीडीपी विकासदर 4.8 टक्के नोंदवण्यात आला. हा दर फारसा आश्चर्यकारक नाही तसेच अपेक्षेपेक्षाही जास्त नाही. मात्र, आगामी तिमाहीत हा दर चांगला वाढण्याची अपेक्षा आणि आर्थिक आघाडीवर दिसणा-या सकारात्मक संकेतामुळे भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा विकासाच्या दिशेने जात असल्याच्या अपेक्षा करण्यात येत आहेत. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत चालू खात्याच्या तुटीत झालेल्या घटीने या अपेक्षा जास्तच उंचावल्या. या काळात ही तूट घटून 5.2 अब्ज डॉलर किंवा जीडीपीच्या 1.2 टक्के या पातळीवर आली. यात सोन्याच्या आयातीतील घट आणि निर्यातीतील वाढ याचा प्रमुख वाटा राहिला. दुसरीकडे भांडवलाचा ओघ कमी पडल्याने भारताच्या बॅलन्स ऑफ पेमेंट्समधील तफावत वाढली आहे. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत ही तफावत 10.4 अब्ज डॉलरपर्यंत वाढली आहे. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत ही तफावत 20 कोटी डॉलर होती. व्यापारी तूट 33.3 अब्ज डॉलरसह कमी राहिली. एक वर्षापूर्वी ही तूट 47.8 अब्ज डॉलर होती.
सकारात्मक बाबींचा विचार करायचा झाल्यास एचएसबीसीच्या सोमवारी जाहीर झालेल्या सर्व्हेनुसार भारतातील उत्पादन प्रक्रियेला नोव्हेंबरमध्ये गती आली आहे. देशांतर्गत मागणीत वाढ झाल्याने हे शक्य झाले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेसाठी हे निश्चितच चांगले लक्षण आहे. एचएसबीसीचा मॅन्युफॅक्चिरिंग पीएमआय (परचेंजिंग मॅनेजर्स इंडेक्स) जुलैनंतर पहिल्यांदाच वाढला. ही एक चांगली बातमी आहे.
असे असले तरी शेअर बाजारात तीन दिवसांच्या तेजीला मंगळवारी ब्रेक लागला. आशियाई बाजारातील घसरण आणि डॉलरची वृद्धी यामुळे बाजारात घसरण झाली. अमेरिकेतील औद्योगिक आघाडीवरील हालचालीत अपेक्षेपेक्षा जास्त वाढ आणि फेडरल रिझर्व्हकडून रोखे खरेदी योजनेत कपातीच्या शक्यतेत वाढ या कारणांमुळे डॉलर वधारला.
आता शेअर बाजार अमेरिकेच्या तालावर नाचणार आहे. अमेरिकेत शुक्रवारी जाहीर होणा-या अकृषी क्षेत्रातील नोकरीविषयक आकडेवारीवर आता बाजाराची नजर राहील. हे आकडे अपेक्षेप्रमाणे आले तर फेडरल रिझर्व्ह आपला 85 अब्ज डॉलरचा रोखे खरेदी कार्यक्रम स्थगिती करण्याचे संकेत देईल. याशिवाय 8 नोव्हेंबर रोजी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. त्यावरही बाजाराची दिशा अवलंबून आहे. या निवडणुकांना लोकसभेची रंगीत तालीम मानण्यात येत असल्याने निकालांना जास्त महत्त्व आहे.
तांत्रिकदृष्ट्या बाजार आता कन्सोलिडेशनच्या पातळीत आहे. तेजीचा बहर काही अंशी अजून बाकी आहे. वरच्या दिशेने चांगल्या व्हॉल्यूमसह निफ्टी 6211 वर बंद झाला तर हा सकारात्मक संकेत मानावा. असे झाले तर निफ्टीचे पुढील लक्ष्य 6290 राहील. या अडथळा पातळीवर काही प्रमाणात नफेखोरी दिसून येईल. निफ्टीला पुढचा अडथळा 6357 वर होईल. हा निफ्टीचा सार्वकालीन उच्चांकी स्तर आहे. या स्तरावर मोठ्या प्रमाणात अस्थैर्य आणि नफेखोरी दिसून येईल. असे असले तरी अंडरटोन तेजी टिकून राहील आणि निफ्टीचे पुढील लक्ष्य 6419 असेल.
खालच्या दिशेने निफ्टीला 6181 या पातळीवर चांगला आधार आहे. शॉर्ट टर्मसाठी बाजाराचा कल निश्चित करण्यासाठी ही पातळी महत्त्वाची ठरणार आहे. निफ्टी या पातळीखाली आल्यास 6113 पर्यंत घसरू शकतो. येथे काही प्रमाणात कन्सोलिडेशन दिसून येईल. जोपर्यंत निफ्टी मजबूत होऊन 6159 या स्तराच्या वर जात नाही तोपर्यंत मंदीचा कल बदलणार नाही. त्यानंतर निफ्टीला 6067 वर चांगला आधार आहे. त्यानंतर याला 5991 वर चांगला आधार मिळण्याची शक्यता आहे.
या शेअर्सकडे ठेवा लक्ष
शेअर्सच्या बाबतीत या आठवड्यात हॅवल्स इंडिया लिमिटेड, आयसीआयसीआय बँक लिमिटेड आणि एचडीएफसी लिमिटेड हे समभाग चार्टवर उत्तम दिसताहेत. हॅवल्स इंडियाचा मागील बंद भाव 751.75 रुपये आहे. त्याचे पुढील टार्गेट 767 रुपये आणि स्टॉप लॉस 734 रुपये आहे. आयसीआयसीआय बँकेचा मागील बंद भाव 1085.40 रुपये आहे. त्याचे पुढील टार्गेट 1102 रुपये आहे, तर स्टॉप लॉस 1068 रुपये आहे. एचडीएफसीचा बंद भाव 822.40 रुपये आहे. त्याचे पुढील लक्ष्य 834 रुपये आणि स्टॉप लॉस 817 रुपये आहे.
- लेखक टेक्निकल अ‍ॅनालिस्ट आणि moneyvistas.com चे सीईओ आहेत.