आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vipul Verma About Stock Market, Business News In Marathi

स्टॉक्स: चांगल्या संकेतांमुळे शेअर बाजार सकारात्मक टप्प्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अर्थसंकल्पानंतर आलेल्या निराशेतून झालेल्या विक्रीनंतर शेअर बाजारात तेजी आली आहे. विदेशी संस्था आणि गुंतवणूकदारांनी इन्फ्रास्ट्रक्चर, बँक, धातू आणि माहिती तंत्रज्ञान यांसारख्या निवडक समभागांची केलेली खरेदी यास कारणीभूत आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांतही चांगली खरेदी दिसून आली. शेअर बाजारात तेजी परतली. ती अत्यंत स्थिर आणि टप्प्याटप्प्याने आली. त्यामुळे सकारात्मक वातावरण तयार झाले. रिझर्व्ह बँकेने इन्फ्रास्ट्रक्चर आणि गृहनिर्माण प्रकल्पांच्या कर्जासाठीच्या नियमात शिथिलता आणत अशा कंपन्यांना दीर्घकालीन रोख्यांद्वारे पैसे उभे करण्याची मुभा दिली आहे. यात पायाभूत क्षेत्रे आणि बँक समभागांतील तेजीने बाजारात वाढ दिसून आली.

याशिवाय मागील आठवड्यात जाहीर झालेल्या आर्थिक आकडेवारीने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केल्यानेही वातावरण सकारात्मक बनले. जूनमध्ये घाऊक महागाईचा दर 5.43 टक्के, तर किरकोळ महागाईचा दर घटून 7.31 टक्क्यांवर आला. महागाईने अपेक्षेपेक्षा जास्त घसरण दर्शवल्याने पतधोरणावरील दबाव कमी झाला आहे. विशेष म्हणजे, बर्‍याच काळापासून महागाई उच्च पातळीत होती. त्यामुळे रिझर्व्ह बँकेचे हात बांधलेले होते. अर्थव्यवस्थेची गती व्यवस्थित राखण्यासाठी कमी व्याज दर, तसेच नाणेनिधी धोरण दीर्घकाळ नरम असणे आवश्यक आहे. मात्र, महागाई नियंत्रणात येईपर्यंत रिझर्व्ह बँकेला ते शक्य नाही. दोन्ही प्रकारच्या महागाईतील घसरण आगामी काळात असे चित्र दिसण्याची शक्यता आहे.

विदेशातून मागणी वाढल्याने व्यापारी तूट कमी होण्यास मदत झाली आहे. मात्र ही तूट अपेक्षेएवढी कमी झालेली नाही. एकूण चित्र पाहता भारताची आर्थिक स्थिती सुधारत असल्याचे संकेत आहेत. देशातील शेअर बाजारासाठी ही सकारात्मक बाब आहे. तिकडे कंपनी जगतात चांगल्या तिमाही आर्थिक निकालांमुळे सकारात्मक वातावरण आहे. नुकतीच रिलायन्स इंडस्ट्रीजची जाहीर झालेली तिमाही आकडेवारी अपेक्षेपेक्षा जास्त चांगली आहे.

या आठवड्यात जागतिक आर्थिक क्षितिजावर सुधारणा दिसून आली. चीनमधून येणार्‍या आकडेवारीने जागतिक अर्थव्यवस्था रुळांवर येत असल्याच्या आशा पल्लवित केल्या. या शिवाय अमेरिकेतूनही चांगली आकडेवारी आली आहे आणि युरोपातील आकडेवारी स्थिर राहण्याच्या अंदाजाचे चांगले चित्र आहे. देशातील शेअर बाजार सकारात्मक टप्प्यात असून तेजीकडे वाटचाल सुरू आहे. याचा अर्थ निर्देशांक एकतर्फी वाढीने वाटचाल करतील असे नव्हे. म्हणजेच व्यापक प्रमाणात सकारात्मक कल असला तरी काही अवधीने नफा वसुली आणि कन्सॉलिडेशन दिसून येईल.

निफ्टीला वरच्या दिशेने 7810 अंकांवर पहिला अडथळा होईल. हा मध्यम स्वरूपाचा मात्र महत्त्वाचा अडथळा आहे. या पातळीनजीक काही प्रमाणात नफा वसुली दिसून येईल. ही पातळी पार केल्यास निफ्टीला 7857 च्या आसपास अडथळा होईल. हा तगडा अडथळा असून येथे कन्सॉलिडेशन दिसून येईल. खालच्या दिशेने निफ्टीला 7677 वर पहिला आधार मिळेल, हा महत्त्वाचा आधार आहे. येथे निफ्टी घसरून व्हॉल्यूमसह खाली आल्यास बाजारात आणखी घसरणीचे संकेत समजावेत. अशा स्थितीत निफ्टीला 7571 या पातळीवर आधार मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर 7534 वर तगडा आधार मिळण्याचे संकेत आहेत.

या शेअर्सवर ठेवा लक्ष : या आठवड्यात जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड, टायटन कंपनी लिमिटेड, स्टेट बँक ऑप इंडिया हे समभागा चार्टवर उत्तम दिसताहेत. जेएसडब्ल्यू स्टीलचा मागील बंद भाव 1214.10 रुपये आहे. त्याचे पुढील लक्ष्य 1249 रुपये आणि स्टॉप लॉस 1176 रुपये आहे. टायटनचा मागील बंद भाव 337.75 रुपये आहे. त्याचे लक्ष्य 346 रुपये आणि स्टॉप लॉस 326 रुपये आहे. तर एसबीआयचा मागील बंद भाव 2524.20 रुपये आहे. त्याचे टार्गेट 2576 रुपये आणि स्टॉप लॉस 2483 रुपये आहे.

(लेखक टेक्निकल अ‍ॅनालिस्ट आणि moneyvistas.comचे सीईओ आहेत.)
(vipul.verma@dainikbhaskargroup.com)