आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता जागतिक संकेतांवर ठरणार बाजाराची दिशा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील प्रमुख बाजारांतून फारसे समाधानकारक संकेत नसतानाही फंड आणि व्यापा-यांकडून बाजारात खरेदीचा जोर कायम आहे. यामुळे बेंचमार्क निर्देशांक व शेअर्स आपापल्या सार्वकालीन उच्चांकावर पोहोचले आहेत. हे सर्व काही प्रमाणात अपेक्षेबरहुकूम आहे. युरोझोनकडून जाहीर झालेल्या आर्थिक मदतीमुळे बाजारातील कल मजबूत बनले आहेत. यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात रोकड येण्याची शक्यता आहे.
युरोप आणि अमेरिकेतील बाजारांत यामुळे तेजी दिसून आली. असे असले तरी ग्रीसमधील निवडणुकांच्या निकालाने या सकारात्मक कलाला काही प्रमाणात ब्रेक लावला. तेथे डाव्या विचारसरणीच्या सिराज पक्षाच्या निर्णायक विजयाने युरोपीय समुदायात नवे अस्थैर्य निर्माण होण्याची भीती वाढली आहे. ग्रीस युरोझोनच्या बाहेर पडण्यापर्यंत ही मजल जाऊ शकते. ग्रीसच्या आंतरराष्ट्रीय कर्जदारांशी चर्चेस सिरजा पक्ष तयार आहे. पक्षाचे नेते एलेक्सिस सिप्रस यांनी पाच वर्षांपासून सुरू असलेल्या खर्चात कपात करण्याचे उपाय बंद करून, ग्रीसच्या कर्जाबाबतच्या करारांवर नव्याने चर्चा करण्याचे वचन दिले आहे. अमेरिकेतील कंपन्यांचे निकाल निराशाजनक राहिले. मायक्रोसॉफ्ट व कॅटरपिलर या कंपन्यांचे निकाल खराब राहिल्याने या दोन्ही कंपन्यांचे समभाग गडगडले, तर टिकाऊ वस्तूंच्या मागणीत अचानक घट आल्यानेही कलावर विपरीत परिणाम झाला. अशा रीतीने एकंदरीत जागतिक स्तरावर कल कमकुवत आहे. असे असले तरी भारतीय शेअर बाजार मात्र सर्वोच्च स्थानावर पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारतभेटीचे बाजाराने तेजीने स्वागत केले आहे. त्यांची ही भेट अत्यंत यशस्वी मानली जात आहे.

आगामी काळाचा विचार केल्यास जागतिक स्तरावर फारसे उत्साहवर्धक वातावरण नाही. भारतीय बाजारात काही काळ तेजी दिसून येईल. यात एक छोटे करेक्शनही दिसून येईल. या आठवड्यात, शुक्रवारी अमेरिकेत डिसेंबरचे जीडीपीची आकडेवारी आणि वित्तीय तुटीचे आकडे जाहीर होणार आहेत. यावर सर्वांची बारकाईने नजर राहील. कारण सर्व जग अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेकडे आशेने पाहते आहे. तेथील जीडीपीची आकडेवारी उत्तम राहण्याची अपेक्षा आहे. मात्र आकडेवारी निराशाजनक राहिली तर बाजारांसाठी हे वृत्त नकारात्मक राहील. भारताची वित्तीय तूट पूर्ण वर्षाच्या लक्ष्याच्या आसपास पोहोचली आहे. ३१ मार्च २०१५ रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षात हा आकडा अत्यंत महत्त्वाचा राहील. या आठवड्यातील सर्वात महत्त्वाची घटना बुधवारी होणारी फेडरल रिझर्व्हची बैठक राहील. याकडेही सर्वांचे लक्ष राहील. व्यापक प्रमाणात या बैठकीचा फारसा परिणाम होणार नाही. कारण फेडरल रिझर्व्ह संयमाने स्थिती हाताळण्याची शक्यता आहे. अशा रीतीने हा आठवडा अनेक घटना-घडामोडींचा राहील व बाजाराची दिशा त्यावर निश्चित होईल.

तांत्रिकदृष्ट्या बेंचमार्क निर्देशांक अनचार्टेड टेरिटरीमध्ये आहे. निफ्टी आणि सेन्सेक्स सध्या अनुक्रमे ९००० आणि ३०,००० अंकांच्या मानसिक अडथळा पातळीच्या आसपास आहे. या पातळीच्या आसपास यात काही प्रमाणात कन्सॉलिडेशन दिसून येईल. निफ्टीला वरच्या दिशेने ९००९ वर पहिला मोठा अडसर आहे. हा एक मध्यम स्वरूपाचा अडसर असूनही बाजाराच्या दृष्टीने अत्यंत नाजूक अडथळा राहील. येथून निफ्टी तेजीसह पुढे सरकल्यास ९११२ या पातळीवर पुढील अडसर पातळी आहे. निफ्टीला खालच्या दिशेने ८७७३ अंकांच्या आसपास पहिला चांगला आधार मिळण्याची शक्यता आहे. जोपर्यंत निफ्टी या पातळीच्या वर राहील तोपर्यंत यात वाढीचा कल सुरू राहील. मात्र, निफ्टी या आधार पातळीच्या खाली आला तर बाजाराचा कल नकारात्मक झाला आहे, असे समजावे आणि मग निफ्टी ८५७० पर्यंत खाली येऊ शकतो. समभागांच्या बाबतीत या आठवड्यात सेसा स्टरलाइट लिमिटेड चार्टवर उत्तम भासतो आहे. त्याचा सध्याचा बंद भाव २०७.३० रुपये आहे. त्याचे पुढील लक्ष्य २१२ रुपये आणि स्टॉप लॉस २०१ रुपये आहे, तर टाटा मोटर्स लिमिटेडचा शेअरही काही प्रमाणात वाढ दर्शवण्याची शक्यता आहे. त्याचा सध्याचा बंद भाव ६०४.५५ रुपये आहे. त्याचे पुढील लक्ष्य ५०५ रुपये आणि स्टॉप लॉस ६१७ रुपये आहे.

लेखक तांत्रिक विश्लेषक व moneyvistas.com चे सीईओ आहेत. vipul.verma@dbcorp.in