आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बेंटलीच्या एसयूव्हीला फॉक्सवॅगनचा हिरवा कंदील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जर्मनीची कार निर्माती कंपनी फॉक्सवॅगनने बेंटली या आपल्या ब्रिटिश सहयोगी कंपनीला अल्ट्रा लक्झरी कारशिवाय स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल (एसयूव्ही) तयार करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. यामुळे ऑटो उद्योग क्षेत्रातील समीकरणे बदलू शकतात. रेसिंग कारशिवाय आकर्षक कार निर्मितीसाठी बेंटलीची ओळख आहे. कंपनीने न्यू फ्लाइंग स्पर कारची नुकतीच फेररचना केली आहे. सहा लिटर, 12 सिलिंडरचे 616 हॉर्सपॉवरचे इंजिन या कारला शक्तिशाली बनवते. या कारची कमाल वेगमर्यादा 200 मैल (सुमारे 322 किलोमीटर) प्रतितास आहे.

बेंटलीची एसयूव्ही 2016 पर्यंत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असेल, अशी घोषणा फॉक्सवॅगनने केली आहे. एसयूव्हीच्या या प्रकल्पावर कंपनी सर्वात जास्त खर्च करणार आहे. आगामी तीन वर्षांत कंपनी या प्रकल्पासाठी 78.72 अब्ज रुपये (1.23 अब्ज डॉलर) गुंतवणार आहे. युरोपातील दुस-या क्रमांकाचे ऑटो मार्केट असलेल्या ब्रिटनमध्ये या प्रकल्पामुळे 1000 नव्या रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. पोर्शेने कयेन एसयूव्ही बाजारात आणून जे यश मिळवले त्या प्रकारचे यश बेंटलीला मिळवायचे आहे. ब्रिटनमधील क्रू येथे बेंटलीचे मुख्यालय आहे. पोर्शेने दशकभरापूर्वी ही एसयूव्ही बाजारात आणली होती. सध्या स्पोटर््स कार निर्मिती कंपन्यांच्या जागतिक स्तरावरील विक्रीत पोर्शेचा निम्मा वाटा आहे.

कार चालवण्याचा शौक असणा-यांचे लक्ष्य समोर ठेवूनच बेंटली एसयूव्हीद्वारे नफा कमावण्याचा विचार करत आहे. फोक्सवॅगन समूहाच्या पहिल्या तिमाहीतील 197.76 अब्ज रुपयांच्या एकूण उत्पन्नात बेंटलीचा हिस्सा एक टक्क्याहून जास्त नाही.

बेंटलीच्या या चार बाय चार एसयूव्हीमध्ये कयेन आणि ऑडी क्यू 7 सह फोक्सवॅगन समूहाच्या एसयूव्हीमधील कंपोनंटचा एकत्रित मिलाफ दिसून येईल. तोपर्यंत लॅम्बोर्गिनी यूरस बाजारात आली तर त्याचीही झलक यात पाहण्यास मिळण्याची शक्यता आहे. बेंटलीची एसयूव्ही रेंज रोव्हरला तीव्र स्पर्धा होण्याची शक्यता आहे. टाटाच्या मालकीची असणा-या जेएलआर समूहाची रेंज रोव्हर ही एसयूव्ही सध्या ब्रिटनमध्ये उपलब्ध असणारी एकमेव फुल साइज प्रीमियम एसयूव्ही आहे.

या एसयूव्हीमुळे विक्रीतच मोठी वाढ होण्याची आशा बेंटली कंपनीला आहे. कंपनीने 2012 मध्ये 8510 वाहनाची विक्री केली होती. नव्या एसयूव्हीची किंमत 1.5 लाख युरोपेक्षा (सुमारे 1.28 कोटी रुपये) जास्त असण्याची शक्यता आहे. दरवर्षी 3 ते 4 हजार एसयूव्ही विक्री करण्याचा कंपनीची योजना आहे. कंपनीची वार्षिक विक्री दुप्पट करून ती 15 हजारांपर्यंत पोहोचवण्यात ही एसयूव्ही महत्त्वाचा वाटा उचलेल, असे कंपनीला वाटते. ही एसयूव्ही कंपनीचे बेस्ट सेलिंग मॉडेल असेल, असे संकेत कंपनीने दिले आहेत. या एसयूव्ही निर्मितीसाठी कंपनीने लक डोंकरवोकची सेवा घेतली आहे. लोम्बार्गिनीच्या अनेक गाड्यांची स्टायलिंग डोंकरवोलने केलेली आहे. फ्लाइंग स्परप्रमाणे मोठ्या आकाराची एसयूव्ही तयार करण्याची जबाबदारी बेंटलीने त्यांच्याकडे सोपवली आहे. पोर्शे केयनच्या निर्मितीत हात असलेल्या तंत्रज्ञांची मदतही बेंटलीने घेतली आहे. यामुळे बेंटलीच्या आगामी एसयूव्हीबाबतचे आकर्षण वाढले आहे.

नव्या एसयूव्हीबाबत फोक्सवॅगनकडे गेल्या 16 महिन्यांत फारच उत्साहवर्धक प्रतिक्रिया आल्या आहेत. फोर बाय फोर श्रेणीत उतरल्यामुळे या कंपनीच्या खासियतवर परिणाम होईल, असे बेंटली आणि फोक्सवॅगनच्या प्रशंसकांचे मत आहे.
लेखक ब्रिटनस्थित ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील पत्रकार आहेत.