आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युरोपातील मंदीतही भारतात वाहन उद्योगाला मोठी संधी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- आणखी तीन ते चार वर्षे युरोपातील देश मंदीच्या संकटातून बाहेर पडू शकणार नाहीत. जागतिक पातळीवर वित्तीय संकट अजूनही पूर्णपणे संपलेले नाही, मात्र आशिया प्रशांत विभागात विशेषतः भारत आणि चीनमध्ये यापुढे विकासाने मिळणारी संधी अधिक असेल, असे व्होल्वो ऑटो इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक तोमास अर्नबर्ग यांनी सांगितले.

व्होल्वोच्या क्रॉस कंट्री फोर्टीचे पुण्यात शनिवारपासून वितरण सुरु झाले. त्यानिमित्त ते येथे आले आहेत. मुळ स्वीडिश मात्र जन्म स्पेन मधील आणि कामानिमित्त जगभर प्रवास आणि वास्तव्य करणारे अर्नबर्ग यांना गेल्या वीस वर्षाचा आंतरराष्ट्रीय वाहन उद्योगाचा अनुभव आहे. त्यांना काही अरब देशातील भाषा तसेच युरोपातील चार देशातील भाषा अस्खलित बोलता येतात. अत्यंत मृदुभाषी आणि कुशाग्र बुद्धिमत्ता असलेल्या या तज्ञाला जागतिक आर्थिक स्थितीविषयी छेडले असता ते म्हणाले की, २००८ मध्ये आलेल्या वित्तीय संकटातून युरोप अद्याप सावरलेला नाही. अनेक देश कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले आहेत. स्पेन, इटली सारख्या देशात बेरोजगारीचे प्रमाण चिंताजनक स्थितीत आहे. त्यामुळे तेथील बाजारपेठेत एक प्रकारचे शैथिल्य आले आहे आणि याचा फटका केवळ वाहन उद्योगाला नव्हे तर सर्वाना सहन करावा लागतो आहे. अशा वेळी भारत आणि चीन या विकसनशील देशांच्या बाजारपेठांचा आधार आम्हाला वाटतो आहे.

भारतात राजकीय अस्थिरता आणि आर्थिक स्थिती फारशी चांगली नसताना हे कसे शक्य आहे असे विचारता ते म्हणाले की, पश्चिम युरोप आणि अमेरिकेच्या तुलनेत भारत आणि चीनमधील विकास वेगाने होतो आहे. विशेषतः भारतात वेगाने वाढणारा मध्यमवर्ग आणि त्यांच्या हातात खर्च करण्यास येणारा पैसा हे देशाचे बलस्थान ठरते आहे. व्होल्वोचा विचार केल्यास भारत ही सर्वात वेगाने वाढणारी बाजारपेठ आहे. कारण आरामदायी कारच्या जागतिक बाजाराचा विचार करता भारत सध्या बाल्यावस्थेत आहे मात्र वाढीला मोठा वाव आहे.

येथील राजकीय व्यवस्थेकडून काय अपेक्षा आहेत यावर ते म्हणाले की, वाहन उद्योगाच्‍या वाढीने रोजगार संधी वाढत असल्याने सरकारने उत्पादन शुल्क रचनेत अधिक सुसूत्रता आणायला हवी. मात्र रुपया डॉलरच्या तुलनेत अशक्त होत असल्याने महसुली उत्पन्न कमी होणे परवडणारे नाही अशा वेळी धोरणात मात्र स्पष्टता आणि सातत्य हवे. रुपया आणखी घसरल्यास सर्व कार उत्पादकांना किमती वाढवाव्या लागतील यात शंका नाही.

अमेरिकेत फेडरल रिझर्व्हने नुकतच अधिक रोखे खरेदी न करण्याचा निर्णय घेतला त्याचा परिणाम सर्वच देशांच्या अर्थकारणावर होणे साहजिक आहे. मात्र अमेरिकेतील ग्राहकांची खरेदी क्षमता वाढली तर त्याचा आम्हाला फायदा होईल अशीही पुस्ती त्यांनी जोडली .

चीन या अस्थिर स्थितीत का पुढे जातो आहे यावर ते म्हणाले की, चीनमध्ये श्रीमंतांची संख्या वेगाने वाढते आहे. आमच्या कंपनीने केवळ चीनच्या बाजारपेठेसाठी दोन उत्पादन प्रकल्प गेल्या दोन वर्षात उभारले यावरून त्याचा अंदाज येईल. चीन जगभरातील लक्झरी वस्तू खपण्याचे मोठे केंद्र म्हणून विकसित होणे हे त्यांचे बलस्थान आहे. म्हणूनच आशिया निर्यात वाढीत युरोपीय देशांच्या दृष्टीने महत्वाचा ठरतो आहे. वाहन उद्योग हा पर्यावरणाची हानी करतो यावर आपण काय सांगाल असे विचरता ते म्हणाले की कार्बन उत्सर्जनविषयी जागृती वाढत असून आमच्या सारख्या कंपन्या कमी प्रदूषण करणारी छोटी इंजिने वापरण्यावर भर देत आहोत.

पोलस्टर दोन महिन्यात भारतात
खास रेसिंग साठी वापरली जाणारी पोलस्टर कार येत्या दोन महिन्यात भारतात दाखल होईल अशी माहितीही त्यांनी दिली. भारतात उत्तरप्रदेशात बुद्ध सर्किटवर कार रेसिंग सुरु झाल्याने लवकर या कार धावताना दिसतील असे ते म्हणाले.