आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदानामुळे शेअर बाजारात सावध व्यवहार, सेन्सेक्सची ३४ अंकांनी घसरगुंडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रिलायन्स इंडस्ट्रीजने तिमाही निकालांमध्ये अपेक्षेपेक्षा केलेल्या चांगल्या कामगिरीचा आनंद आणि पाच वर्षांचा नीचांक गाठून महागाईने मोठा दिलासा देऊन देखील बाजाराला फारशी उसळी मारता आली नाही.राज्यात बुधवारी होत असलेल्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता गुंतवणूकदारांनी केलेल्या काहीशा सावध व्यवहारांमध्ये सेन्सेक्स ३४ अंकांनी घसरून २६,३४९.३३ अंकांच्या पातळीवर बंद झाला.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक २६,५३७.४२ सकारात्मक पातळीवर उघडला. रिलायन्स इंडस्ट्रीजचा उत्साहवर्धक निकाल आणि किरकोळ महागाईत झालेली घट यामुळे बाजारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे खरेदीच्या पाठिंब्यामुळे सेन्सेक्स २६,५५०.७९ अंकांच्या कमाल पातळीवर गेला होता.

विक्रीच्या मा-यात सेन्सेक्स ३४.७४ अंकांनी घसरला. राष्ट्रीय शेअर बाजारातही झालेल्या खरेदी- विक्रीच्या मा-यात निफ्टी २०.२५ अंकांनी घसरून ७८६४ अंकांच्या पातळीवर बंद झाला.

बाजार आज बंद
महाराष्ट्रासह हरियाणामध्ये विधानसभेच्या निवडणुकांसाठी बुधवारी मतदान होत असल्याने बाजारात चढ- उताराचे वातावरण होते. िवधानसभा निवडणूक मतदानामुळे बाजाराचे कामकाज बंद राहणार आहे. एक्झिट पोलच्या निकालानंतर गुरुवारी बाजारात चढ- उताराचे वातावरण राहण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला.

डीएलएफच्या शेअर्सचा धुरळा
सेबीच्या बंदीनंतर मंगळवारी डीएलएफचे समभाग ३० टक्के घसरणीसह १०२.७० रुपये या सार्वकालीन नीचांकावर पोहोचले. समभागधारकांचे एकूण ७४३९ कोटी रुपयांचे नुकसान झाले.तर कंपनीचे बाजारमूल्य १८,७०१ कोटींवर आले. गुंतवणूकदारांनी या समभागांची खरेदी टाळावी, आगामी काळातही घसरणीची शक्यता आहे.