आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगभर पाणीटंचाईने उत्पादकतेवर परिणाम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आता जगाच्या पाचही खंडांमध्ये पाण्याचे भीषण दुर्भिक्ष जाणवते आहे आणि आपण खरोखरच जलयुद्धाच्या टप्प्यावर येऊन पोहोचलो आहोत. जगातली ही स्थिती केवळ हवामानबदलामुळे निर्माण झालेली नाही. हा प्रश्न संपूर्णपणे मानवनिर्मित आहे. गेल्या 50 वर्षांत जगाची लोकसंख्या तिपटीने, तर पाण्याची मागणी 800 टक्क्यांनी वाढली. या दोन्हींचा मेळ घालण्यासाठी ज्या प्रकारच्या दीर्घकालीन पाणी नियोजनाची गरज होती ती मात्र कुठेच गांभीर्याने पूर्ण केली गेली नाही. त्यामुळे भरपूर पाऊस पडणार्‍या देशांतही लोकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. आफ्रिका हा सर्वात मोठा खंड, जिथे बहुसंख्य भागात भरपूर पाऊस पडतो. विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूला पसरलेल्या या खंडात इतर खंडांच्या तुलनेने अजूनही घनदाट जंगल आहे आणि म्हणावे तसे नागरीकरणही झालेले नाही. हा सर्व खंड दरिद्री देशांचा म्हणून ओळखला जातो. नैसर्गिक जीवनाकडून नागरीकरणाकडे मोठ्या वेगाने या खंडाचा प्रवास होत असला तरी पाणी योजनांसाठी त्यांच्याजवळ निधीच उपलब्ध नाही. त्यामुळे निसर्ग भरभरून देत असला तरी हे पाणी साठवायला धरणे आणि ते लोकांपर्यंत पोहोचवायला कालवेच उभे राहिलेले नाहीत.

हळूहळू एकेक देश पाणीटंचाईच्या तडाख्यात :
अमेरिका खंडातील 70 टक्के भाग अजूनही पाणीटंचाईपासून दूर असला तरी हळूहळू एकेक देश पाणीटंचाईच्या तडाख्यात सापडत आहे. ब्राझीलचा काही भाग आणि मेक्सिको हे प्रदेश आताच पाणीटंचाईला तोंड देत आहेत. ब्राझीलचा संपूर्ण भाग जंगलव्याप्त आणि भरपूर पावसाचा असला तरी तिथे नव्याने सुरू झालेल्या वेगवान औद्योगिकीकरणामुळे पाण्याची मागणी वेगाने वाढते आहे. तिथल्या नागरीकरण झालेल्या भागात पाणीटंचाईची झळ तीव्र झाली नसली तरी जाणवायला लागली आहे. पेरूसारख्या खनिजसंपत्तीने समृद्ध असलेल्या देशात पाण्याची कमतरता नाही, पण खाणीतून खनिजांचा प्रचंड उपसा होत असल्यामुळे पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या नद्या प्रदूषित झाल्या आहेत. स्वाभाविकच पिण्याचे पाणी विकत घेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. यामुळे खाणकामगारांचे किती हाल होत असतील याची कल्पना आपण सहज करू शकतो.
ऑस्ट्रेलिया खंड भरपूर पावसाचा, दाट जंगल असलेला आहे. पण ऑस्ट्रेलियातील मध्य भागाशी नागरीकरण झालेल्या किनारी प्रदेशांचा संबंध कमी आहे. नागरीकरण झालेल्या दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या भागामध्ये पाणीटंचाईच्या झळा अत्यंत तीव्र आहेत. इतर खंडांच्या तुलनेत युरोप खंडाला मात्र पाण्याची टंचाई अद्याप फारशी जाणवलेली नाही. मात्र, युरोपातील अनेक राष्ट्रांत नद्यांचे पाणी प्रदूषित झाले असल्यामुळे त्यांना बाटलीबंद मिनरल वॉटरचा आश्रय घ्यावा लागतो. नागरीकरण आणि औद्योगिकीकरण सर्वाधिक असल्यामुळे पाण्याचा वापरही येथे अधिक होतो. त्यामुळे पुढील काळात या राष्ट्रांनाही पाणीटंचाई जाणवू शकते, अशी भाकिते वर्तवली जात आहेत.

आशिया खंडात पाणीटंचाई तीव्र :
पाणीटंचाईबाबत सर्वात जास्त तीव्रता आशिया खंडात जाणवते. मध्य आशियातील राष्ट्रांमध्ये पाणीटंचाई तीव्र आहे. अनेक राष्ट्रांत पावसाचे प्रमाण कमी असले तरी खरी अडचण पुरेशी धरणे आणि कालवे नाहीत ही आहे. खरे तर यापैकी बहुतेक देश पेट्रोडॉलरने संपन्न झाले असले तरी सर्वसामान्यांसाठी राबवण्याच्या योजनांकडे सतत दुर्लक्ष होत आहे. एकमेकांशी होणारी युद्धे आणि संघर्ष यामुळेही समान पाणीवाटपाकडे दुर्लक्ष झाले आहे. या सर्वांचा उद्रेक लोकक्षोभातून झालेला, गेल्या 2 वर्षांत आपण पाहत आहोत. त्यामागे पाणीटंचाईचा वाटाही महत्त्वाचा आहे.

भूभागाचा विचार केला तर चीन हे सर्वात मोठे क्षेत्रफळ असणारे राष्ट्र आहे. पाण्याच्या संदर्भात मात्र त्याचे सरळसरळ उत्तर आणि दक्षिण असे दोन भाग पडलेले दिसतात. दक्षिण चीनमध्ये मोठ्या प्रमाणात नागरीकरण आणि औद्योगिकीकरण झाले. त्यामुळे त्यासाठी आवश्यक धरणे आणि कालवे गेल्या 50 वर्षांत तयार झाले. पण त्यामानाने उत्तर चीनमध्ये मात्र प्रगती झालेली नाही. दक्षिण आशियातील व्हिएतनाम वगैरे देश दाट जंगलांचे आणि भरपूर पावसाचे आहेत. तिथल्या नद्या दुथडी भरून वाहत असतात, पण धरणे आणि कालव्यांसाठी या देशांकडे पुरेसा निधीच नसल्यामुळे ग्रामीण भागातील गरीब जनतेला पाण्यासाठी दाही दिशा हिंडावे लागते.

आसाम आणि बांगलादेश या संपूर्ण पट्ट्यातील पाण्यामध्ये रोगजंतूंचे प्रमाण अधिक :
संपूर्ण भारतीय उपखंड पाणीटंचाईच्या कमीअधिक झळा सोसतो आहे. पाकिस्तानमध्ये भरपूर पाऊस पडत असूनही गेल्या 50 वर्षांत नवीन धरणे आणि कालवे तुलनेने कमी बांधले गेले आणि पाण्याची गरज मात्र सतत वाढत गेली. त्याचा परिणाम म्हणून पाकिस्तानात तीव्र दुष्काळ जाणवतो आहे. बांगलादेशामध्ये पाकिस्तानच्या तुलनेत पाणी भरपूर आहे, पण तिथे जमिनीखालील पाण्यात आर्सेनिक हे विषारी द्रव्य सापडते. त्यामुळे ते पिण्यास हानिकारक आहे. आसाम आणि बांगलादेश या संपूर्ण पट्ट्यातील पाण्यामध्ये रोगजंतूंचे प्रमाण अधिक असल्यामुळे पाणी भरपूर असूनही टंचाईला तोंड द्यावे लागते.
(लेखक व्हिडिओकॉन समूहाचे अध्यक्ष आहेत)