आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रुपयासाठी चांगल्या नसणार्‍या उपायांचा काय फायदा?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एखाद्या मुलाला ज्या वेळी आपण एखादे काम करण्यास नको म्हणतो, त्या वेळी तेच काम करण्याची त्याची उत्सुकता वाढते. ते मूल तेच काम करण्याचा वारंवार प्रयत्न करते. त्याला कितीही रागवा, ते मूल तेच काम करण्यास उत्सुक असते.
मानसशास्त्रातील हा पायाभूत नियम आहे. रुपयाची घसरण थांबवण्याचे उपाय करण्यापूर्वी यूपीए सरकारने याचा विचार करायला हवा होता. सोन्यावरील आयात शुल्कात वाढ, विदेशातून इम्पोर्टेड फ्लॅट स्क्रीन टीव्ही आणण्यावर निर्बंध आणि विदेशात पैसे पाठवण्यावर प्रतिबंध हे उपाय सरकारने केले. कोणत्याही भारतीयाला आता केवळ 75 हजार डॉलर विदेशात पाठवता येणार आहेत. यापूर्वी दोन लाख डॉलर्स पाठवता यायचे. विदेशात मालमत्ता खरेदी करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच आपल्या एकूण भांडवलाइतकीच गुंतवणूक भारतीय कंपन्यांना विदेशात करता येणार आहे. यापूर्वी या कंपन्यांना आपल्या भांडवलाच्या चारपट जास्त रक्कम गुंतवता यायची. या निर्बंधापासून कसे वाचायचे असा अनेक भारतीयांपुढे आता प्रश्न आहे.


भांडवलावर नियंत्रण ठेवण्याचा सरकारचा हेतू नसल्याचे मागील गुरुवारी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी स्पष्ट केले. मात्र, बाजारावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. बाजार सरकारच्या भाष्यांवर नव्हे, तर कृतींवर निर्णय घेत असतो.
सोन्यासारख्या अनुत्पादक संपत्तीत गुंतवणूक न करण्याचे आवाहन सातत्याने सरकार करते आहे. मात्र, त्यावरील आयात शुल्क वाढवून सोने महाग करण्याचे काम दुसर्‍या हाताने होत आहे. सोन्यातील गुंतवणूक चांगली मानणार्‍यांना ही जणू संधीच मिळते आहे. या वर्षाच्या प्रारंभी सोने 26 हजार रुपये तोळा होते. आता ते वाढून 31 हजारांच्या पुढे गेले आहे. आता याचा फायदा तस्करी करणारे उचलण्याची शक्यता आहे.


आता गुंतवणूकदार, बाजारातील कारभारी काय विचार करतील. सरकार विदेशी चलनाच्या देशाबाहेर जाण्यावर नियंत्रण आणत आहे, मग हे चलन देशात गुंतवावे का? हेही रुपयाच्या घसरणीमागील एक कारण आहे. निर्यात तसेच इतर मार्गाने मिळणारे विदेशी चलन बाहेरील देशांतच गुंतवण्यावर अनेकांचा भर आहे. रुपया आणखी घसरेल अशी त्यांची अपेक्षा आहे. जर विदेशात त्यांचा पैसा सुरक्षित राहत असेल तर ते आपल्या देशात कशासाठी पैसे आणतील हा खरा प्रश्न आहे.
विदेशात जास्त पैसे गुंतवण्यास भारतीयांवर टाच आली आहे. त्यामुळे विदेशी गुंतवणूकदार संस्थांची (एफआयआय) अवस्था दोलायमान झाली आहे. आपल्यावरही अशाच प्रकारची बंधने येऊ शकतात व आपला पैसा येथे अडकू शकतो. या मानसिकतेतून एफआयआय पैसे काढून घेत आहेत. विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये आतापर्यंत शेअर बाजारातून 1097 कोटी रुपये, तर डेट मार्केटमधून (बाँड आणि डिबेंचर) 7176 कोटी रुपयांचा उपसा केला आहे. एफआयआयनी 2013 मध्ये रोखे बाजारात आतापर्यंत 29,230 कोटी रुपयांची विक्री केली आहे. मात्र, याच काळात शेअर बाजारात 64,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. भारतीय भांडवली बाजाराच्या दृष्टीने ही बाब सकारात्मक असली तरी त्यामागे वेगळेच कारण आहे. कारण शेअर बाजारात विक्री सुरू केल्यास त्याला खरेदीदार मिळणार नाही हे एफआयआयना पक्के ठाऊक आहे. त्यांनी बाजारातील गुंतवणूक काढल्यास रुपयाची आणखी घसरण होईल. त्यामुळे त्यांचा तोटा आणखी वाढण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे एफआयआय भारतात फसलेले आहेत. त्यामुळेच इक्विटीच्या तुलनेत ते रोख्यांची जास्त विक्री करताहेत. रोखे बाजारात म्युच्युअल फंड आणि बड्या बँका खरेदीदार म्हणून तयार आहेत.


थोडक्यात जगाचा तुमच्यावरील विश्वास घटत आहे, त्यांचा दृष्टिकोन बदलण्यास वेळ लागणार आहे. सद्य:स्थिती लक्षात घेता सरकारने घाईत निर्णय न घेता शांतपणे बसावे. आर्थिक सुधारणांच्या प्रक्रियेत खंड न करता, बाजारात स्थैर्य येईपर्यंत वाट पाहणे केव्हाही चांगले. कृत्रिम पद्धतीने रुपयाची किंमत वाढवण्याचे वाईट परिणाम होऊ शकतात, अधिक पैसा आकर्षित करण्याऐवजी आपण आपल्या मार्गाने पुढे जाणे इष्ट.


लेखक आर्थिक विषयाचे ज्येष्ठ पत्रकार, फस्र्टपोस्ट डॉट कॉमचे संपादक आणि डीएनएचे माजी संपादक आहेत.