आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ईपीएस, पीई इत्यादी रेशिओ म्हणजे काय?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका दृष्टिक्षेपात कंपनीची माहिती मिळावी, काही कंपन्याची तुलना करता यावी यासाठी रेशिओ म्हणजे गुणोत्तरे बघण्याची पद्धत लोकप्रिय आहे. हे ईपीएस, पीई, बुक व्हॅल्यू इत्यादी रेशिओ म्हणजे काय, या संज्ञांची ओळख करून घेऊ :
ईपीएस म्हणजे र्अनिंग पर शेअर अर्थात प्रतिशेअर मिळकत
र्अनिंग म्हणजे करोत्तर नफा म्हणून:
ईपीएस = कर दिल्यानंतरचा नफा भागिले इश्यू केलेले शेअर
प्रत्येक शेअरमागे कंपनीला किती नफा होत आहे ते ईपीएसमुळे चटकन कळते.
पीई रेशिओ म्हणजे प्राइस टू र्अनिंग रेशिओ अर्थात शेअरची प्राइस (भाव) भागिले ईपीएस. पीई रेशिओ दर्शवितो प्रतिशेअर मिळकतीसाठी मार्केट किती किंमत देत आहे.
ईपीएस व पीई रेशिओ आता उदाहरणांच्या साहाय्याने बघू: एचडीएफसी लिमिटेड म्हणजे हाउसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पेरशन लिमिटेड ही हाऊसिंग फायनान्स क्षेत्रातील एक मोठी कंपनी. मार्च 2013ला संपलेल्या आर्थिक वर्षात तिचा करोत्तर नफा आहे 4848.34 कोटी रुपये. तिने इश्यू केलेले शेअर्स आहेत 154.635 कोटी (संख्येत) म्हणून तिचा ईपीएस आहे: 4848.34/154.635 = 31.35
थोडक्यात प्रत्येक शेअरमागे नफा आहे 31.35 रुपये. एचडीएफसी लिमिटेडच्या शेअरची फेस व्हॅल्यू आहे 2 रुपये, पण ईपीएस किती आहे. काढताना आपण किती शेअर्स इश्यू केले आहेत. ते फक्त लक्षात घेतो, त्याची फेस व्हॅल्यू नाही. हाउसिंग फायनान्स क्षेत्रातील एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेड हीसुद्धा एक मोठी कंपनी आहे. तुलनेसाठी तिची आकडेवारी बघू. मार्च 2012 ला संपलेल्या आर्थिक वर्षात तिचा करोत्तर नफा आहे 914.20 कोटी रुपये. तिने इश्यू केलेले शेअर्स आहेत 50.47 कोटी म्हणून तिचा ईपीएस आहे: 914.20/50.47 = 18.11
म्हणजे एलआयसी हाउसिंग फायनान्सचा प्रत्येक शेअरमागे नफा आहे 18.11 रुपये. याही शेअरची फेस व्हॅल्यू आहे 2 रुपये. या दोन्ही कंपन्यांच्या ईपीएसची तुलना केली, तर आपल्याला दिसेल की एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेडपेक्षा एचडीएफसी लिमिटेडला प्रत्येक शेअरमागे खूप जास्त नफा होत आहे.
आता या ईपीएसवरून आपण दोन्ही कंपन्यांचा पीई रेशिओ किती आहे ते बघू.
पीई रेशिओ म्हणजे प्राईस टू र्अनिंग रेशिओ काढण्यासाठी शेअरची प्राईस (भाव) भागिले इपीएस हे सूत्र आहे. 2 जून 13 ला एचडीएफसी लिमिटेडच्या शेअर भाव 875.10 रुपये होता. म्हणून त्याचा पीई होतो, 875.10/31.35 = 27.92
एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेडचा भाव होता 253.15. म्हणून त्याचा पीई होतो, 253.15/18.11 = 13.97
दुस-या शब्दात म्हणता येईल मार्केट एचडीएफसी लिमिटेडच्या शेअरना ईपीएसच्या 28 पट भाव द्यायला तयार आहे तर एलआयसी हाउसिंग फायनान्सच्या शेअरना इपीएसच्या 14 पट भाव द्यायला तयार आहे. इपीएस हा फेस व्हॅल्यूपेक्षा जास्त असावा, हा एक निकष साधारण बघितला जातो. पीई रेशिओ किती असावा याचे वेगवेगळ्या सेक्टरसाठी वेगवेगळे प्रमाण आहे. आपण निवडलेल्या कंपनीचा पीई रेशिओ किती आहे व त्या सेक्टरचा किती आहे अवश्य बघावे. वरील उदाहरणातील हाउसिंग फायनान्स सेक्टरचा पीई रेशिओ 26 आहे. तसेच शेअरच्या भावात बदल होत असल्यामुळे त्याचा पीई रेशिओसुद्धा बदलत असतो. भाव खूप खाली आला तर पीई रेशिओसुध्दा कमी होतो.
नवी कंपनी असेल तर तिचे र्अनिंग कमी असते, परंतु कंपनीचे नाव चांगले असेल व मार्केटला इथून पुढे कंपनी प्रगती करेल वाटत असेल तरीही त्या कंपनीच्या शेअरचा भाव वाढलेला असतो. उदा. एल अ‍ॅँड टी फायनान्स होल्डिंग ही कंपनी नव्याने नोंद होऊन बाजारात आलेली आहे. हिचा ईपीएस 1.81 आहे, परंतु हिच्या शेअरचा भाव 78 रुपये आहे म्हणजे पीई रेशिओ आहे 43. या सेक्टरच्या पीई रेशिओ बघितला तर तो आहे 17. याचाच अर्थ एल अ‍ॅँड टी फायनान्स होल्डिंग कंपनी वेगात वाढेल याची मार्केटला अपेक्षा आहे म्हणून या शेअरना इतका भाव मिळत आहे.
बुक व्हॅल्यू म्हणजे कंपनीचे भाग भांडवल अधिक राखीव निधी भागिले शेअरची संख्या. कंपनीकडे राखीव निधी किती आहे बुक व्हॅल्यूमधून सुचित होते. मागील संचित तोटा कंपनी बॅलन्स शीटमध्ये पुढे कॅरी करत असेल तर त्याचे रिझर्व म्हणजे राखीव निधी निगेटिव्ह असतो. त्यामुळे अशावेळेस बुक व्हॅल्यू फेस व्हॅल्यूपेक्षा कमी असेल. हा तोटा जर आणखी भाग भांडवलापेक्षाही जास्त असेल तर बुक व्हॅल्यूही निगेटिव्ह असतो. शेअर खरेदी करताना त्याचा भाव बुक व्हॅल्यूच्या तीन-चार पटीपेक्षा जास्त असू नये असा एक निकष आहे.
गुंतवणुकीसाठी कोणत्या कंपनीचे शेअर खरेदी करावेत ह्याचे आर्थिक बाबींवर आधारित निकष म्हणून हे रेशिओ सर्रास वापरले जातात. तथापि हे कठोर नियम नाहीत, चांगल्या कंपनीबाबत मार्केट अपवाद करते.


kuluday@rediffmail.com