आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेट फंडातील गुंतवणुकीचे नेमके काय करावे?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही दिवसांपूर्वी डेट म्युच्युअल फंडात (कर्जरोख्यांवर आधारित फंड योजना) गुंतवणूक केली आहे, असे गुंतवणूकदार सध्या द्विधा मन:स्थितीत आहेत. कारण सध्या डेट म्युच्युअल फंड नकारात्मक परतावा देत आहेत. सुरक्षित, कर बचत साधण्यासाठी आणि निश्चित परतावा मिळवण्यासाठी नव्याने या फंडात गुंतवणूक करणारे निराश आहेत आणि दुसर्‍या साधनांचा विचार करताहेत. आता प्रश्न आहे की, आता काय करावे? डेट फंडातून बाहेर पडायचे की त्यातील गुंतवणूक सुरू ठेवायची की रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर घटवण्याची प्रतीक्षा करायची?

यावर विचार करण्यापूर्वी डेट फंडाने अचानक नकारात्मक परतावा देणे का सुरू केले आहे याचा विचार करू. डेट फंडातील परतावा बाजारातील व्याजदराशी निगडित असतो. व्याजदरानुसार परतावा बदलत असतो. व्याजदर वाढले तर त्यातील गुंतवणुकीचे मूल्य कमी होते, याउलट व्याजदर घटल्यास गुंतवणुकीचे मूल्य वाढते.

देशातील व्याजदर चढे असल्यामुळे आर्थिक विकासावर परिणाम होत असल्याचे गुंतवणूकदार आणि फंड कंपन्यांचे मत गेल्या तीन महिन्यांपासून होते. त्यामुळे रिझर्व्ह बँक प्रमुख व्याजरात कपात करेल आणि त्यामुळे बाजारातील व्याजदर घटतील आणि फंडातील गुंतवणुकीचे मूल्य वाढेल, असा सर्वांचा समज होता. मात्र, रिझर्व्ह बँकेने आपला मोहरा रुपया सावरण्याकडे वळवला. त्यामुळे व्याजदर जैसे थे ठेवण्यात आले. शॉर्ट टर्मसाठी बाजारात रोखतेचे मूल्य वाढवून रुपयाची घसरण थांबवण्यासाठी बँकेने हे पाऊल उचलले आहे. परिणामी शॉर्ट तसेच लाँग टर्मसाठी बाजारातील व्याजदर वाढले. त्याचा परिणाम डेट फंडावर झाला आणि परतावा कमी मिळू लागला. यात एवढी घसरण आली की, डेट फंडात सुरक्षित मानण्यात येणार्‍या इक्विटी फंडावरही त्याचा परिणाम झाला.

अशा स्थितीत डेट फंडातून बाहेर पडायचे की त्यातील गुंतवणूक सुरू ठेवायची? असा प्रश्न निर्माण झाला. एक गुंतवणूकदार म्हणून कोणत्याही साधनात गुंतवणूक करण्यापूर्वी त्यातील जोखीम, उद्देश आणि वेळ याचा संबंध याचा विचार करायला हवा. गुंतवणुकीसाठी कोणत्याही साधनाची निवड या तीन बाबींवरच अवलंबून असते. आर्थिक कारणांचे भाकीत करणे व ते नियंत्रित करणे आपल्या हाती नाही. मात्र, या तीन बाबींच्या आधारे गुंतवणुकीसाठीचे चांगले धोरण नक्कीच ठरवता येते.

वेगवेगळ्या मुदतीचे अनेक डेट फंड बाजारात उपलब्ध आहेत. तुम्ही जर 6 ते 9 महिन्यांसाठी गुंतवणूक करू इच्छिता तर त्यासाठी शॉर्ट टर्म फंडाची निवड करा. समजा एक ते दोन वर्षांसाठी गुंतवणूक करायची असेल तर मध्यम कालावधीच्या फंडाची निवड करा. त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी गुंतवणूक करायची असेल तर लाँग टर्म इन्कम किंवा गिल्ट फंडात गुंतवणूक करा. डेट फंडाची सरासरी मॅच्युरिटी जेवढी जास्त तेवढे चढ-उतार जास्त. फंडातील जोखीम आणि तुमची जोखीम समजून घेऊन योग्य फंडात गुंतवणूक केली असल्यास त्यातून बाहेर पडण्याची गरज नाही. व्याजदर वाढल्याने परतावा कमी झाला असला तरी आगामी काळात चांगला परतावा मिळण्याची शक्यताही वाढली असल्याचे लक्षात घ्या.

व्याजदर केव्हा कमी होतील हे सांगता येत नाही. मात्र, एखाद्या आर्थिक कारणामुळे विकासावर परिणाम होत असल्याचे पाहून रिझर्व्ह बँक केव्हाही व्याजदरात कपात करू शकते. त्यामुळे आपल्या वित्तीय सल्लागाराच्या सल्ल्यानुसार आपल्या जोखमी घेण्याच्या क्षमतेनुसार पुन्हा गुंतवणुकीचे धोरण ठरवणे योग्य राहील.

लेखक मान्यताप्राप्त गुंतवणूक मार्गदर्शक असून द फायनान्शियल प्लॅनर्स इंडियाचे सदस्य आहेत. manikaran.singal@dainikbhaskargroup.com