आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वित्तीय नियोजनात व्हॉट्स इफ सिनारिओचे महत्त्व

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्व साधारणपणे बिझनेस प्रोजेक्टच्या विश्लेषणात व्हॉट्स इफ सिनारिओचा वापर होतो. यात बिझनेस प्रोजेक्टला अस्थिर करू शकणा-या व व्यावसायिक प्रकल्पात आगामी काळात येणा-या अडचणींचा विचार केला जातो. या तंत्रामुळे अशा अडचणीपासून कसे वाचायचे यासाठी चांगली मदत होते. अधिक विचार केल्यास हेच तंत्र व्यक्तिगत आर्थिक नियोजनात वापरून येणा-या समस्यांपासून बचाव करता येतो.


तसे पाहिले तर आर्थिक नियोजन हे व्हॉट्स इफ सिनारिओचाच एक भाग आहे. यामुळे नियोजन काळात अचानक उद्भवणा-या अडचणींपासून आपल्या आर्थिक बाबींचे योग्य व्यवस्थापन उचित रीतीने करण्यासाठी मदत होते. बहुतेक वेळा अनेक जण आपले आर्थिक नियोजन सल्लागारावर सोपवून मोकळे होतात. यामुळेच अनेकदा एखाद्या साधनातून गुंतवणूक काढून घेण्याचा आग्रह असे लोक आपल्या सल्लागाराकडे करताना दिसतात. आर्थिक नियोजनात व्हॉट्स इफ सिनारिओचा वापर कसा करावा याविषयी...
आर्थिक संकटातून वाचण्यास मदत : अचानक येणा-या आर्थिक संकटातून बचाव होण्यासाठीच आपण आर्थिक नियोजन करत असतो. थोडा वेळ डोळे बंद करा आणि आगामी काळात आर्थिक पातळीवर कोणत्या घटकांपासून संकट येऊ शकते याबाबत विचार करा. याचे उत्तर तुम्हाला मिळाले तर चांगलेच. समजा याचे उत्तर मिळालेच नाही तर वित्तीय सल्लागार आहेच. तुम्ही स्वत: अनेक प्रश्न विचारायला हवेत. जसे - माझी नोकरी गेली तर काय होईल? मी अपंग झालो तर काय होईल? माझ्या जिवाचे काही बरे-वाईट झाले तर..? मी जास्त काळ जिवंत राहिलो तर? सल्ल्यानुसार बनवलेला आपत्कालीन फंड कमी पडला तर? सल्ल्यानुसार उतरवलेला टर्म, आरोग्य विमा नंतर माझ्या प्रोफाइलनुसार राहिला नाही तर? अशा प्रकारे व्हॉट्स इफचे अनेक प्रश्न तुम्ही स्वत:ला विचारू शकता, ज्यांचे उत्तर शोधल्यास एकच प्रश्न तुमच्यासमोर येईल - अशा स्थितीत माझे व माझ्या कुटुंबाचे काय होईल आणि याद्वारे याचे उत्तर शोधणे जास्त सोपे जाईल.
वित्तीय लक्ष्य, प्राधान्यक्रम ठरवणे होते सुलभ : निवृत्तीनंतरचे जीवन, मुलांचे शिक्षण, आरोग्य यासारख्या महत्त्वाच्या लक्ष्यांशी निगडित आर्थिक काळजीचे उत्तर मिळण्यास या तंत्रामुळे चांगली मदत होते. काही मूलभूत प्रश्नाद्वारे आपण वित्तीय लक्ष्य आणि त्याचा प्राधान्यक्रम ठरवू शकतो. ते प्रश्न असे...
मला माझ्या कंपनी, कार्यालयाकडून विमा संरक्षण मिळाले आहे. मग मी आयुर्विमा, आरोग्य विमा, अपघात विमा खरेदी टाळावी का? मी माझे कर्ज मुदतीआधी फेडले आणि ईएमआयचा भार हलका केला तर काय होईल? समजा मी ईएमआय सुरूच ठेवला तर काय होईल? मुलांच्या शिक्षणाविषयक बचतीला प्राधान्य देऊन नंतर रिटायरमेंटच्या बचतीचा विचार केल्यास काय होईल? घर आधी खरेदी केले व इतर लक्ष्यांबाबत नंतर विचार केल्यास काय होईल? माझ्या निवृत्तीनंतरच्या जीवनात दरवर्षी विदेशी जाण्याचे उद्दिष्ट ठेवले तर काय होईल? माझे आर्थिक नियोजन अयशस्वी ठरले तर काय होईल? एखाद्या गुंतवणुकीतून अपेक्षित परतावा न मिळाल्यास काय होईल? मी माझ्या उद्दिष्टपूर्तीच्या नजीक असतानाच शेअर बाजार गडगडला
तर काय होईल? अशा रीतीने व्हॉट्स इफ विश्लेषणामुळे आपल्याला जीवनातील प्रत्येक टप्प्यावरील तयारीबाबत मदत मिळते. याद्वारे विभिन्न परिस्थितीचा सामना करण्याच्या दृष्टीने नियोजन करता येते. समजा एखादी योजना अयशस्वी ठरली तर तुमच्यासाठी दुसरी, तिसरी, चौथी असे अनेक पर्याय उपलब्ध राहतात. यामुळे आगामी काळात येणा-या अपेक्षित तसेच अनपेक्षित स्थितीतून सावरण्याचा मार्ग मिळतो आणि आर्थिक उद्दिष्ट यशस्वीरीत्या गाठणे शक्य होते.
लेखक मान्यताप्राप्त गुंतवणूक मार्गदर्शक असून द फायनान्शियल प्लॅनर्स इंडियाचे सदस्य आहेत.