आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Within Five Years Share Market Reach On 45000 Points Assumption Of Angel Broking

सेन्सेक्स पाच वर्षांत 45,000 !, एंजल ब्रोकिंगचा अंदाज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- येणारी काही वर्षे भांडवल बाजारासाठी सुगीची ठरणार असून पुढील पाच वर्षांत सेन्सेक्स 45 हजारांचे शिखर गाठेल, असा अंदाज एंजल ब्रोकिंगचे मुख्य गुंतवणूक सल्लागार राजन शहा यांनी व्यक्त केला. मुंबई शेअर बाजार, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि एंजल ब्रोकिंग यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या ‘गुंतवणुकीचे संवर्धन आणि वाढ’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते.

वित्तीय तूट, चालू खात्यातील तूट, महागाई यासारख्या समस्या सध्या जाणवत असल्या तरीही विकास दर 6 टक्क्यांनी वाढेल, पण याच पाच वर्षांच्या कालावधीत अमेरिकेचा विकासदर 1.75 टक्क्यांनी वाढेल. मात्र, त्याच वेळी युरोपची वाढ मात्र खुंटणार आहे. युरोप आणि अमेरिका या दोन्ही देशांचा आर्थिक विकास मंदावला आहे. जगातील जवळपास 65 टक्के संपत्ती या दोन देशांमध्ये आहे. युरोपातील बेरोजगारीचे प्रमाण 20 ते 25 टक्क्यांवर जाऊन पोहोचले आहे. अपेक्षित परतावा मिळत नसल्याने ही संपत्ती विकसनशील देशांकडे वळत आहे. अशा परिस्थितीत सध्या भारत, चीन आणि ब्राझील हे तीनच देश गुंतवणूक करण्यासाठी योग्य आहेत. आगामी काळात ही रक्कम भारतात येणार असल्याचे शहा यांनी सांगितले.

एंजलचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक शार्दुल कुलकर्णी म्हणाले की, सरकारने जाहीर केलेल्या आर्थिक सुधारणानंतर तेजीचे वातावरण आले आहे. तांत्रिकदृष्ट्या विचार करता निफ्टीमध्ये 5,700 पर्यंत सुधारणा होण्याची शक्यता आहे.

क्षेत्रनिहाय विचार केला, तर पुढील 3 ते 6 महिन्यांत माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला खूप फायदा होण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.