आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्येक शहरात होणार महिलांचे टपाल कार्यालय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- महिला बँकेपाठोपाठ आता महिला टपाल कार्यालयाची संकल्पना जोर धरू लागली आहे. ग्रामीण भागात यासाठी उत्सुक असलेल्या महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने अशा भागात टपाल कार्यालये सुरू करण्याची सरकारची योजना आहे. महिलांद्वारे महिलांसाठी चालवले जाणारे टपाल कार्यालय सुरू करण्याचा उपक्रम जगातील पहिलावहिला असाच आहे. देशाच्या अन्य भागांत अशा प्रकारची महिला टपाल कार्यालये सुरू करण्याचा विचार आहे. ज्या भागात महिलांची उपलब्धता आणि नोकरी करण्याचे प्रमाण लक्षात घेऊन टपाल खाते त्या दृष्टीने विचार करणार आहे. ग्रामीण भागात नोकरदार महिलांची संख्या फारशी मोठी नसल्याने सर्वप्रथम शहरांमधून हा उपक्रम राबवण्यात येणार असून त्यानंतर हळूहळू ग्रामीण भागात प्रवेश करणार असल्याचे सिब्बल यांनी स्पष्ट केले.

कपिल सिब्बल यांच्या हस्ते आतापर्यंत नवी दिल्लीतील शास्त्री भवन आणि दिल्ली विद्यापीठ या दोन ठिकाणच्या महिला टपाल कार्यालयांची उद्घाटने झाली आहेत. टपाल खात्याचे सचिव पी. गोपीनाथ यांच्या हस्ते मुंबईतील टाऊन हॉल विभाग आणि हैदराबाद या ठिकाणच्या टपाल कार्यालयांचे उद्घाटन करण्यात आले आहे. देशातील महिलांसाठी रोजगार निर्मिती हा प्रमुख उद्देश यामागे असल्याचे सिब्बल यांनी सांगितले. सर्व महानगरांमध्ये किमान तीन ते चार, तर द्वितीय श्रेणीतील शहरांमध्ये अशा प्रकारचे किमान एक टपाल कार्यालय सुरू करण्याचे भारतीय टपाल खात्याचे सध्या लक्ष्य आहे. ही महिला टपाल कार्यालये पुढील सहा महिन्यांत सुरू करण्यात येणार असल्याचे गोपीनाथ यांनी सांगितले.

टपाल खाते - टीसीएस यांच्यात करार
देशातील टपाल कार्यालयांच्या संगणकीकरणाबाबत आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) आणि भारतीय डाक विभाग यांच्यात करार होणार आहे. यासाठी टीसीएसला 1400 कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले आहे. डाक विभागाचे सचिव पी. गोपीनाथ यांनी सांगितले, संगणकीकरणाची योजना दोन टप्प्यांत राबवण्यात येणार आहे. दोन वर्षांत आयटी योजना कार्यान्वित होईल. सरकारने टपाल कार्यालयांच्या आधुनिकीकरणाच्या दुसºया टप्प्यासाठी 4,909 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या योजनेअंतर्गत टपाल विभाग रिअल टाइम कोअर बँकिंग सेवाही सुरू करणार आहे.

1,54,822 देशातील टपाल कार्यालयांची संख्या
1,39,086 ग्रामीण भागातील टपाल कार्यालये
15,736 शहरी भागातील टपाल कार्यालये


टपाल खात्याचा उद्देश : महिला ग्राहकांची संख्या वाढवणे, नोकरदार महिलांमध्ये काटकसरीची मानसिकता तयार करणे.