आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला, तरुणांनीही घ्यावा शेअर बाजारात रस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्यवसाय म्हणजे आपले कामच नाही, अशी अगदी पक्की ठाम समजूत असते. या परंपरागत समजुतीतून बाहेर पडायला मराठी माणूस धजावतच नाही. योगायोगाने मध्यंतरी काही कामानिमित्त गुजरातमधील बडोदा, अहमदाबाद, सुरत इत्यादी ठिकाणी जाणे झाले. त्यावेळी एक आवर्जुन जाणवलेली गोष्ट म्हणजे आपल्याकडील राजकारणावरील गप्पांप्रमाणेच त्या भागातील सर्वसामान्य गुजराती माणूस एवढेच काय गृहिणी व तरुण वर्ग देखील शेअर बाजाराबाबत चर्चा करताना आढळतात. आज बाजारभाव काय आहे? कोणत्या शेअरचा भाव कधी वाढेल? कोणते शेअर कधी खरेदी करावे? सध्या तेजी आहे की मंदी? याबाबत वाद होत असतात.


कमोडिटीत गुजरातेत मोठी उलाढाल
एकूणच काय तर बहुतेक चर्चा ही शेअर बाजारच काय त्याचा एक उपप्रकार म्हणजे कमोडिटीमध्ये देखील गुजरात राज्यात प्रचंड उलाढाल होते. मी मुद्दामच काही महिलांशी देखील चर्चा केली आणि आश्चर्याचा भाग म्हणजे त्यांना केवळ याविषयीची माहितीच नव्हती तर बहुतेक स्त्रिया या शेअर मार्केट व कमोडिटी मार्केटमध्ये उलाढाल करत होत्या. त्यातून त्यांना चांगले आर्थिक उत्पन्न देखील होत होते. मी महाराष्‍ट्रीय सुरक्षित मध्यमवर्गीय स्त्री व गुजराती स्त्री यांची तुलना करू लागलो तेव्हा मला प्रकर्षाने हे जाणवले की महाराष्‍ट्रीय महिला अत्यंत सुरक्षित व संगणकाच्या ज्ञानामध्ये तरबेज असूनही या शेअर मार्केट व त्याचाच एक भाग असलेल्या कमोडिटी मार्केटबाबत फारच उदासीन आहे.


शेअर मार्केट म्हणजे जुगाड, एक परंपरागत समज :
महाराष्‍ट्रात आल्यावर काही मराठी सुरक्षित तरुणी व महिलांना गुजरातमधील अनुभव सांगून महाराष्‍ट्रीय महिला ट्रेडिंगच्या व्यवसायापासून दूर का? असे विचारले असता बहुतेक जणींनी हे आपले काम नाही. शेअर मार्केट म्हणजे जुगार आहे. या क्षेत्रात फसवणूक होते. नुकसानीचे प्रमाण जास्त आहे. फायदा कमावणारे आपल्याला फायदा कसा कमवावा हे शिकवत नाही. इत्यादी प्रकारची उत्तरे दिली.


कमोडिटीतील व्यवहार माहीत करून घेणे सोपे :
इथे तुलनेचा प्रश्न नाही तर समकालीन स्थितीत दोन शेजारी राज्यातील लोकांचा एकाच संधीकडे पाहण्याचा दृष्टिकोन भिन्न असल्यामुळे आर्थिक प्रगतीला देखील अडसर झालेला आढळतो. या निमित्ताने शेअर बाजारातील कमोडिटी मार्केटमधील व्यवहार कसे होतात? या विषयी माहितीचे आदान-प्रदान करण्याचा माझा प्रयत्न आहे. अद्यापही सामान्यांपर्यंत त्याची माहिती ज्या प्रमाणात पोहोचली नसल्यामुळे शेतकरी, मध्यमवर्गीय गुंतवणूकदार, महिला वर्ग अद्यापही या कमोडिटी मार्केटपासून बराच दूर आहे.


प्रारंभी अर्धवेळ काम करावे
सखोल माहिती, नियमित अभ्यास, तांत्रिक परीक्षण, बाजारातील तेजी, मंदीचा परिणाम आणि आपल्या नेमक्या अपेक्षा तसेच आपली जोखीम उचलण्याची क्षमता या सर्वांचा योग्य तो विचार करून जर आपण कमोडिटी मार्केटमध्ये सुरुवातीला अर्धवेळ नंतर पूर्णवेळ व्यवसाय म्हणून सुरुवात केली तर अगदी थोड्या गुंतवणुकीने या क्षेत्रात यश संपादन करता येऊ शकते.


तेजी-मंदीतही फायदा कमवावा
कमोडिटी मार्केटमध्ये वैशिष्ट्ये म्हणजे तेजी असो व मंदी दोन्ही वेळेस फायदा कमावता येतो. कमोडिटी ट्रिडंगमध्ये सौदा कधी व कसा घ्यावा, तांत्रिक परीक्षण कसे करावे. हेच करणे, रोल ओव्हर करणे म्हणजे काय? इत्यादी बाबत जिज्ञासूंना या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळू शकेल, अशी मला खात्री आहे. सातत्यपूर्वक प्रयत्न केल्यास महाराष्‍ट्रीयन महिला देखील या क्षेत्रात चांगला उत्कर्ष साधू शकतील.


(लेखक कमोडिटी क्षेत्रातील अभ्यासक व तांत्रिक विश्लेषक आहेत.)